25 June, 2025

आणीबाणीच्या अनुषंगाने घटनांवर आधारित विशेष प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले उद्घाटन

• आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव • 25 व 26 जून या दोन दिवशी नागरिकांना पाहता येणार चित्रमय प्रदर्शन • शिवाजीराव देशमुख सभागृहात सर्वांसाठी खुले चित्रप्रदर्शन हिंगोली (जिमाका), दि. 25 : देशात दि. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज बुधवार (दि.25) रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात दोन दिवशीय चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, हयात आणीबाणी धारक लक्ष्मीकांत शिरडकर, उपसंपादक चंद्रकांत कारभारी यांच्यासह हयात आणीबाणी धारक आणि त्यांचे वारस, नागरिक उपस्थित होते. या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने विविध घटना व घडामोडी, आणीबाणी विरोधी संघर्षात सहभागी झालेले विविध मान्यवरांची छायाचित्रे, तसेच छायाचित्रांसोबत अनुरुप व औचित्यपूर्ण असा मजकूर, आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष याची माहिती संक्षिप्त स्वरुपात दिली आहे. या प्रदर्शनामध्ये छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त व माहितीपूर्ण मजकूर, घटनाक्रम, माहितीफलक यांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह विविध मान्यवर यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. हे चित्रमय प्रदर्शन दि. 25 व 26 जून, 2025 या दिवशी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असून, जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील योगदान दिलेल्या हयात आणीबाणीधारक आणि त्यांच्या वारसांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व नागरिकांना देशभक्तीपर माहितीचे चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी कैलास लांडगे, श्रीकांत देशमुख उपस्थित होते. *****

No comments: