30 June, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

• सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी समिती नेमावी • भूसंपादनाच्या प्रलंबित मावेजांचे 15 जुलै पर्यंत वाटप करावेत • जिल्ह्यातील नेटवर्क नसलेल्या गावात टॉवर बसविण्याची कार्यवाही करावी • शाळांतील बालकांसाठी शिबीरे आयोजित करुन आधार नोंदणी पूर्ण करावी हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यातील आर्थिक गैरव्यवहार झालेल्या सहकारी बँका, पतसंस्थामधील ठेवीदारांच्या आर्थिक गैरव्यवहाराची विशेष तपासणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी. या समितीमार्फत आर्थिक गैरव्यवहार झालेल्या सहकारी बँकाची, पतसंस्थांचे रेकॉर्ड तपासून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करण्यासाठी समितीला वेळ ठरवून द्यावी. समितीकडून प्राप्त अहवालानुसार संबंधित बँका, पतसंस्थावर योग्य ती कार्यवाही करुन ठेवीदारांच्या रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिले. ठेवीदाराच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत आढावा घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व सहकारी बँका, ठेवीदार यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे, जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक उपस्थित होते. भूसंपादनाच्या प्रलंबित मावेजांचे 15 जुलै पर्यंत वाटप करावेत राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे व इतर सर्व प्रकारच्या भूसंपादनाच्या प्रलंबित असलेल्या मावेजाचे 15 जुलै पर्यंत वाटप करुन त्याचा अहवाल सादर करावा. मावेजा वाटपाची माहिती भूमिराशी ॲपवर अपलोड करावी. तसेच न्यायालयीन प्रकरणाची माहिती मॅनेज माय ला सूट ॲपवर तात्काळ भरावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले. भूसंपादन प्रकल्पाची सद्यस्थिती व मोबदला वाटप रकमेबाबत आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसीद्वारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा या उपस्थित होत्या. तर सर्व उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे व रेल्वे प्राधिकरणाचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. जिल्ह्यातील नेटवर्क नसलेल्या गावात टॉवर बसविण्याची कार्यवाही करावी जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात नेटवर्क नाही. त्या ठिकाणी टॉवर बसविण्याची कार्यवाही करावी. यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानगीसाठी काही अडचण येत असल्यास लेखी कळवावे. असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हास्तरीय दूरसंचार समितीच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी टॉवर उभारणी, ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी आपणास लागणाऱ्या सर्व परवानग्यासाठी येत असलेल्या अडचणीबाबत लेखी पत्राद्वारे आयटी विभागाला कळवावे. लवकरच बैठकीचे आयोजन करुन आपणास आवश्यक असणाऱ्या परवानग्या देता येईल. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांना बोलवावेत, अशा सूचना दिल्या. यावेळी आयटी विभागाचे जिल्हा व्यवस्थापक उमाकांत मोकरे, एअरटेल, जीओ, बीएसएनल, व्होडाफोन यासह विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. शाळांतील बालकांसाठी शिबीरे आयोजित करुन आधार नोंदणी पूर्ण करावी जिल्ह्यातील शाळांमध्ये शिबीरे घेऊन बालकांची आधार नोंदणी पूर्ण करावी. सर्व बालंकाचे बँक खाते आधार संलग्न करुन घ्यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हास्तरीय आधार नियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीस महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी, बँकाचे प्रतिनिधी यांच्यासह महाआयटीचे जिल्हा व्यवस्थापक उमाकांत मोकरे उपस्थित होते. *******

No comments: