19 September, 2018



माहिती अधिकार हा जनतेला अधिकार देणारा कायदा
-- माहिती आयुक्त दिलीप धारुरकर
·         माहिती अधिकाराच्या 352 प्रकरणाची सुनावणी

            हिंगोली,19: लोकशाही मध्ये माहिती अधिकार कायद्यास महत्वाचे स्थान आहे. माहिती अधिकार देणारा कायदा असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत श्री. धारुरकर बोलत होते. यावेळी आयोगाचे सहसचिव श्री. सरोदे, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.
            पुढे श्री. धारुरकर म्हणाले की, समाज उभारणीसाठी माहिती अधिकाराचा उपयोग शस्त्र म्हणून झाला पाहिजे.
प्रशासकीय पातळीवरील व्यक्तीगत स्वरुपाच्या अडचणी सोडवण्यासाठी या कायद्याचा पंचवीस ते तीस टक्के उपयोग केला जातो. समाज उभारणीसाठी आणि विकास प्रक्रिया गतीमान करण्यासाठी या अधिकाराचा शस्त्र म्हणून उपयोग होणे आवश्यक असून, या माहिती अधिकाराचा वापर हा जनहितासाठी होणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेने माहितीचा अधिकार कायद्याची माहिती करुन घेवून स्वयंस्फूर्तीने माहिती प्रकट करावी. तसेच या कायद्याची सकारात्मक  अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूला समतोल असणे आवश्यक आहे.
            माहिती अधिकारातंर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 400 प्रकरणे दाखल झाली होती. याकरीता आयोगाने हिंगोलीत येऊनच सदर प्रकरणांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ग्रामीण भागातील प्रकरणे जास्त होती. योग्यरितीने किंवा नियमानुसार राबविण्यात न आलेल्या शासकीय योजना आणि शासकीय अभिलेखांचे नीट जतन न केल्याबाबतच्या प्रकरणांचा समावेश होता. माहिती अधिकाराचा कायदा संवेदनशील असून, यामुळे शासकीय कामकाज योग्यरितीने  होण्यास आणि शासकीय योजना व्यवस्थित नियमानुसार राबविण्यास मदत होत असल्याचे ही माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी सांगितले.
            या उपक्रमातंर्गत औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी हिंगोली जिल्ह्यातील 400 प्रकरणांवर सुनावणी घेवून निपटारा करण्यासाठी 18 आणि 19 सप्टेंबर, 2018 रोजी येथील डी.पी.सी. सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दोन दिवसीय सुनावणी घेतली. यामध्ये पहिल्या दिवशी 202 तर दूसऱ्या दिवशी 150 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्याची माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी दिली.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या मार्फत प्रकाशित होणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा अंक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी यावेळी माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांना भेट दिला.
****


No comments: