11 September, 2018

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन


कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.11: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांत 100 टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करुन देण्याकरीता शासन निर्णय क्रमांक जमीन 015/ प्र.क्र. 64 अजाक दिनांक 14 ऑगस्ट, 2018 अन्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे.
            या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्‌रयरेषेखालील भुमीहीन  कुटुंबाला  खालीलप्रमाणे जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.4 एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल रुपये 5.00 लक्ष प्रती एकर तर 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल रुपये 8.00 लक्ष प्रती एकर. या योजनेच्या  निवड होण्याकरीता लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, लाभार्थी दारिद्र रेषेखालील भुमिहीन असावा, लाभार्थ्यांचे वय किमान 18 वर्षे  व कमाल 60 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच दारिद्‌र रेषेखालील भुमिहीन  परितक्त्या स्त्रीया, दारिद्र्य रेषेखालील भुमिहीन विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत  अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्ताना निवडीचा प्राधान्यक्रम असेल
            या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जमीन विकण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी दिनांक 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: