03 September, 2018

शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाय योजना


शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाय योजना

हिंगोली,दि.3: कापूस हे हिंगोली जिल्ह्यातील  महत्वाचे नगदी पिक असून, हिंगोली जिल्ह्यात 42,611 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. त्यामध्ये बहुतांशी बिटी वानाचा वापर होतो. मागील वर्षी  कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. यावर्षी शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी  खालीलप्रमाणे  उपाययोजना करण्यासाठी  आवाहन करण्यात येत आहे.
लागवड झालेल्या कपाशीच्य सभोवती  नॉन बीटी  कपाशीच्या आश्रित ओळी लावल्या नसल्यास  कपाशी  पिकाच्या शेतातील मोकळ्या जागी  नॉन बीटी  कपाशीचे बियाणे  लावावे. कपाशीला पाते , फुले व बोंडे  लागण्यास सुरुवात झाल्यापासून त्यातील शेंदरी बोंड अळीची  अंडी अळीचे छिद्र याची नियमित बारकाईने पाहणी करावी,  अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळी सारखी दिसणारी  फुले  तोडून नष्ट करावी, कापूस पिकामध्ये  एकरी दोन फेरोमेन सापळे लावावेत. प्रत्येक फेरोमेन  सापळ्यात  सलग  तीन दिवस  8 ते 10  पतंग आढळून आल्यास किंवा 10  टक्के  बोंडाचे नुकसान झाल्यास  किडीचा प्रादुर्भाव  आर्थिक  नुकसानीच्या  पातळीवर  आढळून आल्यास  सुरुवातीला क्लोरोपायरीफॉस 50 ईसी 20 मिली किंवा प्रोफेनोफॉस  50 ईसी 20 मिली किंवा थायडोकार्ब 75 डब्ल्यूपी  20 ग्रॅम या किटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये  मिसळून फवारणी करावी.
कापूस पिक 45 दिवसाचे  झाल्यावर सुरुवातीला 5 टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा, निंबोळी अर्क उपलब्ध नसल्यास  अझारडिरेक्टीन 300 पीपीएम (100 मिली) किंवा अझारडिरेक्टीन 1500 पीपीएम ( 50 मिली) किंवा अझारडिरेक्टीन 50 हजार पीपीएम (5 मिली) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रस शोषणाऱ्या  किडीच्या  नियंत्रणासाठी  मोनोक्रोटोफॉस, प्रोफेनिल व असीफेट सारख्या किटकनाशकाचे  मिश्रण करुन फवारणी  करु नये , शिफारस  केलेली औषधे, किटकनाशके त्यांचे प्रमाणानुसारच वापर करावा ,  हिंगोली जिल्ह्यातील  नियमित किडरोग  सर्वेक्षणाद्वारे  औंढा तालुक्यातील वगरवाडी, वसमत तालुक्यातील कुडाळा, रेणकापूर, वाखारी कळमनुरी तालुक्यातील  टोव्हा, हिंगोली  तालुक्यातील  माळधामणी  या गावातील कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव  अर्थिक नुकसान पातळीच्या वर आल्याचे दिसून येत आहे. तेव्हा सदर  गावातील व आसपासच्या परिसरातील  शेतकऱ्यांनी  वरीलप्रमाणे  उपाययोजना  त्वरीत  करुन किड नियंत्रणात  आणावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
सोयाबीनमध्ये  जूनच्या सुरुवातीला  पेरणी झालेल्या  भागात पाने खाणारी उंटअळी व चक्रीभुंग्याचा  प्रादुर्भाव  दिसून येत आहे. तो सध्या  ईटीएल च्या जवळ असून पाने खाणारी  अळीसाठी  क्लोरॅनट्रॉनीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली किंवा इन्डोक्झाकार्ब 15.8 ईसी 7 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे, चक्रीभुंगाच्या नियंत्रणासाठी  ट्रायझोफॉस 40 ईसी 12 मिली किंवा क्लोरॅट्रॉनीलीप्रोल 15.5 एससी 3 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करुन किडीचे नियंत्रण करावे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
****

No comments: