12 September, 2018

शासनाच्या योजना पोहचविणारे ‘लोकराज्य’ मासिक प्रभावी माध्यम- तहसिलदार पांडुरंग माचेवाड









शासनाच्या योजना पोहचविणारे ‘लोकराज्य’ मासिक प्रभावी माध्यम
                                                                                     - तहसिलदार पांडुरंग माचेवाड
            हिंगोली,दि.12: महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाला अनेक वर्षांची परंपरा असून, शासनाच्या कल्याणकारी योजना, उपक्रम, निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे ते प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन तहसिलदार पांडुरंग माचेवाड यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली आणि आणि नागनाथ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराज्य वाचक अभियानाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास गट विकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्राचार्य व्ही. बी. कानवटे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            पुढे तहसीलदार माचेवाड म्हणाले, 'लोकराज्य' मासिकाच्या माध्यमातू शासनाचे निर्णय, विकासाच्या कल्याणकारी योजना, विविध उपक्रम यासह विविध विषयांची उपयुक्त माहिती दरमहा प्रसिध्द केली जाते. लोकराज्य मासिक हे स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच आपले लक्ष्य ठरविणे आवश्यक आहे. कोणतेही लक्ष्य साध्य करण्यासाठी ज्ञान, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. आपणांमध्ये खूप सामर्थ्य आणि ऊर्जा असून आतापासूनच आपण आपले लक्ष्य ठरवून त्या‍ दिशेन वाटचाल करावी.
            गट विकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे म्हणाले की, लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून शासकीय योजना घरोघरी पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परिक्षाची तयारी करतांना लोकराज्य मासिक अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन कालावधीतच तयारी सुरु करावी. याकरीता अवांतर वाचनास अत्यंत महत्व असते. आणि याकरीता लोकराज्य मासिक हे अत्यंत उपयुक्त आहे. याकरीता जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन ही श्री. ठोंबरे यांनी यावेळी केले.
            घरोघरी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकराज्य वाचक अभियानातंर्गत सप्टेंबर महिन्यात हिंगोली जिल्ह्यात लोकराज्य वाचक अभियानाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिराळ यांनी केले तर प्रा. वाघ यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****

No comments: