12 October, 2018

मुद्रा बँक योजनेतंर्गत लाभार्थ्यांना कर्ज तात्काळ मंजूर करावे -जिल्हाधिकारी अनिल भंडारी





 मुद्रा बँक योजनेतंर्गत लाभार्थ्यांना कर्ज तात्काळ मंजूर करावे
                                                                         -जिल्हाधिकारी अनिल भंडारी
           
            हिंगोली, दि.12: मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या संवेदनशीलरित्या विचार करुन पात्र प्रस्ताव तपासून तात्काळ कर्ज मंजूर करण्याच्या सूचना मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.
             येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड,  जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक शांताराम सौदल्लू, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलावार, आरसेटीचे संचालक प्रविण दिक्षित, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.    
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु, किशोर आणि तरुण या गटा प्रमाणे गटनिहाय मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून, काही बँकानी यामध्ये चांगले काम केल आहे. इतर बँकांनी देखील ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टाप्रमाणे आपले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देवून नवीन उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयन्त करावा. याकरीता सर्व बॅंकांनी मेळाव्याच आयोजन करुन पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशा सूचना ही श्री. भंडारी यांनी यावेळी दिल्या.
            मुद्रा बँक योजने अंतर्गत सन 2015-16 मध्ये शिशु गटात 844 लाभार्थ्यांना 3 कोटी 52 लाख रुपये, किशोर गटात 686 लाभार्थ्यांना 12 कोटी रुपये आणि तरुण गटात 73 लाभार्थ्यांना 6 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच सन 2016-17 मध्ये शिशु गटात 18,115 लाभार्थ्यांना 35 कोटी 89 लाख रुपये, किशोर गटात 1,166 लाभार्थ्यांना 25 कोटी 13 लाख रुपये आणि तरुण गटात 151 लाभार्थ्यांना 12 कोटी 58 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर सन 2017-18 मध्ये शिशु गटात 28,405 लाभार्थ्यांना 61 कोटी 99 लाख रुपये, किशोर गटात 1,297 लाभार्थ्यांना 30 कोटी 92 लाख रुपये आणि तरुण गटातील 268 लाभार्थ्यांना 18 लाख 97 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
            मुद्रा बँक योजने अंतर्गत व्याजाचे दर कमी असून, बँक निहाय दर वेग-वेगळे आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा प्रकल्पनिहाय कमी व सुलभ ठेवण्यात आला असल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक शांतराम सोदल्लू यांनी दिली.
            यावेळी बैठकीस समिती सदस्यांसह सर्व बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती
****







No comments: