06 October, 2018


‘युवा माहिती दूत’ उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनासोबत काम करण्याची संधी
                                                                - प्राचार्य डॉ. कानवटे

हिंगोली जिल्हास्तरीय ‘माहिती दूत’ कार्यशाळा संपन्न

हिंगोली,दि.4: ग्रामीण आणि दूर्गम भागातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती पोहचविण्यासाठी ‘युवा माहिती दूत’ म्हणुन राज्य शासनासोबत काम करण्याची संधी या उपक्रमाद्वारे प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन नागनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. कानवटे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आणि नागनाथ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा नागनाथ येथील नागनाथ महाविद्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय ‘युवा माहिती दूत’ कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कानवटे बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. डी. डी. पवार, हिंगोलीचे जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजनाचे हिंगोली जिल्हा समन्वयक प्रा. दत्ता कुंचेलवाड आणि प्रा. वसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. कानवटे पूढे म्हणाले की, महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणारा ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम उत्कृष्ट असून, या उपक्रमाद्वारे राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती ग्रामीण आणि दूर्गम भागातील जनते पर्यंत पोहचत नाही. परंतू ‘युवा माहिती दूत’ या मोबाईल ॲप द्वारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीना माहिती दूत होवून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली  असल्याचे ते यावेळी म्हणाले.
 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार यावेळी म्हणाले की,  राष्ट्रीय सेवा योजना सुरु झाल्यापासून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमात उस्फूर्त सहभागी होवून सर्व उपक्रम यशस्वी करण्याचे काम करत आहे. त्याअनुषंगानेच राज्‍य शासनाच्या ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची देखील अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये समावेश असलेल्या जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होवून शासनाच्या योजना वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.
हिंगोली जिल्हा समन्वयक प्रा. दत्ता कुंचेलवाड यांनी प्रास्ताविकात माहिती दूत उपक्रमाची यावेळी माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती दूत’ विषयी तयार केलेल्या तीन चित्रफितीद्वारे उपक्रमाची माहिती देवून कार्यक्रम अधिकारी आणि समन्वयकाच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
यावेळी कार्यशाळेत सहभागी कार्यक्रम अधिकारी आणि समन्वयक यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, समन्वयक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.
****


No comments: