15 February, 2022

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या

स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 15 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांनी आयोगामार्फत आयोजित परीक्षांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सह सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

No comments: