28 February, 2022

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे

ऐनवेळी दोन बालविवाह रोखण्यात यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे कळमनुरी तालुक्यातील मौजे बेलथर येथील ऐनवेळी 02 बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी दिली आहे.  

दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कळमनुरी तालुक्यातील मौजे बेलथर येथील 2 बालविवाहातील 3 अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती हिंगोली चाईल्ड लाईन (1098) ला मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, तसेच हिंगोली चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक आकाश शिखरे, टीम मेंबर राजरत्न पाईकराव, विकास लोणकर, समुपदेशक पुनम अंबोरे आदींनी विवाहस्थळी भेट दिली व बालविवाहातील 03 अल्पवयीन बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले आणि होणारे बालविवाह थांबविले. या वेळी ग्राम बाल संरक्षण समिती, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पुंड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.जे.चव्हाण यांच्या समक्ष कुटुंबियांकडून आम्ही बालकाचे वय 21 वर्ष व बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब घेण्यात आले.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह प्रतिबंध समिती स्थापन आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलीचे लग्नाचे वय 18 वर्ष व मुलाचे लग्नाचे वय 21 वर्ष ठरविले आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी नागरिक आपल्या मुलांचे कमी वयात लग्न लावून देत आहेत, असे चित्र पाहावयास मिळत आहे. बालविवाह होत असल्यास गोपनीय माहिती कोणताही नागरिक 1098 या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

******

No comments: