24 February, 2022

 दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) दि. 4 मार्च, 2022 ते        30 मार्च, 2022 या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दि. 15 मार्च, 2022 ते 4 एप्रिल, 2022 या कालावधीत पार पडणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी  सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले.

दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक आज दि. 24 फेब्रुवारी, 2022 रोजी जिल्हाधिकारी  तथा दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक व्ही. जी. श्रीमनवार, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी परीक्षेचे संचालन सुयोग्य व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रांना, विशेष उपद्रवी केंद्राना भेटी देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच सर्व खाते प्रमुख यांनी भेटी द्यावेत. तसेच परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कार्यवाही करावी प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्राना, उपकेंद्राना परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भेटी द्यावेत, असे निर्देश दिले आहेत.

तसेच सद्यस्थितीत कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी व इतर गोष्टीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी , तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी परीक्षा केंद्रावर परिक्षेच्या एक तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दि. 4 मार्च, 2022 रोजी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी घोषित केलेली आहे. परंतु परीक्षा संचलनामधील सर्व कर्मचाऱ्यांना ही सुटी घेता येणार नाही. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हयगय किंवा हलगर्जी केल्यास कर्मचाऱ्यांच्या विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले.

इयत्ता बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 32 मुख्य परीक्षा केंद्र व 74 उपकेंद्र अशा एकूण 106 परीक्षा केंद्रावर 13 हजार 439 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर इयत्ता दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 53 मुख्य परीक्षा केंद्र व 149 उपकेंद्र अशा एकूण 202 परीक्षा केंद्रावर 16 हजार 134 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय मंडळ औरंगाबाद यांच्यामार्फत जिल्ह्यात 7 भरारी  पथकाची  नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी  यावेळी  दिली .

 

******  

No comments: