22 February, 2022

 

दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी

सामाजिक न्याय विभागाच्या महा-शरद संकेतस्थळावर नोंदणी करावी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 2 (झेडसी) अन्वये दिलेल्या परिशिष्टामध्ये दिव्यांगत्वाचे 21 प्रकार विनिर्दिष्ट केले आहेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन सुगम्यतायुक्त जगणे सुलभ व्हावे यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. जेणेकरुन ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करु शकतील व जनसामान्याप्रमाणे जीवन जगू शकतील. त्यांना दिव्यांगत्वार मात करण्यासाठी कोणत्या सहायक उपकरणांची आवश्यकता आहे हे जाणून घेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करुन घेणे व त्याआधारे सहाय्यक उपकरणे निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यानंतरही मर्यादित साधनसंपत्तीच्या अभावी त्याची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्याचवेळी समाजातील दानशूर व्यक्ती , सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करुन देण्यासाठी आवश्यक सहायक साधनांचा पुरवठा करु इच्छितात. मात्र दानशूर व्यक्ती व दिव्यांग लाभार्थी यांच्यामध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या सहायक साधनांची उणीव भासते.

त्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीमध्ये जनजागृती करुन त्यांची माहिती उपलब्ध करण्यासाठी व या दिव्यांग व्यक्तींना समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांकडून मदत मिळवून देण्यासाठी अथवा उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी जनजागृती अभियान राबवून माहिती संकलित करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्ती व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक, सेवाभावी संस्थांमध्ये दुवा साधण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने दि 11 डिसेंबर, 2020 च्या शासन निर्णयान्वये दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत संयुक्तपणे महा-शरद (MAHASHARAD – Maharashtra System for Health and Rehabilitation Assistance for Divyang) या वेब बेस्ड पोर्टल अंतर्गत अभियान राबविण्यात येत आहे. 

यासाठी  दिव्यांग व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करु इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांची नोंदणी www.mahasharad.in या संकेतस्थळावर करणे गरजेचे आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणाली अंतर्गत प्रमाणपत्र (UDID Card) असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्था या प्रणालीद्वारे मदत करतील त्यांना आयकरामध्ये 80-जी अंतर्गत सूट असेल.

जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांनी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आर. एच. तिडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

*****

No comments: