16 February, 2022

 

मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोना नियमाचे पालन करुन साजरी करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना दि. 19 फेब्रुवारी, 2022 रोजी शिवज्योत वाहण्यासाठी 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवासाठी 500 भाविकांना परवानगी दिली आहे.

अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड, किल्ल्यावर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी, 2022 रोजी मध्यरात्री 12.00 वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. 

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करु नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करावी.

प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टंसींगचे पालन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना , मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करत असताना त्याठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोविड-19 च्या विषाणूच्या  प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल. तसेच जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना परवानगी देण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक हिंगोली, संबंधित उपविभागीय अधिकारी, संबंधित तहसीलदार यांची असेल.

*****

No comments: