13 February, 2022

 


रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी घेतला

मनरेगाच्या विविध कामाचा आढावा

वैयक्तीक सिंचन विहिरीची कामे दोन महिन्यात पूर्ण करावेत

                            - अपर मुख्य सचिव नंद कुमार

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील वैयक्तीक सिंचन विहिरीचे कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिले.

            येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक अपर मुख्य सचिव नंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना श्री. नंदकुमार म्हणाले, राज्यातील ज्या कुटुंबाला विहिरींची गरज आहे, अशा सर्व कुटुंबाला वैयक्तीक विहिरी टप्प्याटप्याने मंजूर करुन शंभर टक्के कुटुंबाला विहिरी मंजूर करावेत. या योजनेसाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपये वापरण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच कमी खर्चात जास्तीचे उत्पादन कसे घेता येईल यासाठी ठिबक सिंचन वापर कसा करता येईल, यावषियी माहिती सांगितली व विविध योजनेची माहिती प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना द्यावी. योजनेचे महत्व समजावून सांगावे. प्रत्येक कुटुंब लखपती झाला पाहिजे यासाठी काम करावेत, अशा सूचना केल्या.

तसेच कयाधू नदीचे पुनरजीवन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पाणी म्हणजे काय याचे महत्व पटवून सांगावे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, मातीचा पोत सुधारण्याचे काम करणे गरजेचे आहे. यापासून आपला काय फायदा होणार आहे. यातून आपला आर्थिक विकास कसा साध्य होणार आहे, याची माहिती दिल्यास नदीचे पुनरजीवन करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक गावचा विकास करावा. यासाठी प्रत्येक गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा करुन मागणी नोंदवावी. तसेच पाणी, माती आणि आपणाकडे असलेल्या संसाधनाचा योग्य वापर करुन समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामी अधिकारी आणि स्वयंसेवी सस्थेंच्या प्रतिनिधीने समन्वयाने काम केल्यास आर्थिक मागासलेपण दूर होऊन जिल्ह्याचा, राज्याचा विकास करता येणार आहे, असेही श्री. नंद कुमार यांनी सांगितले.

            यावेळी मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर कुशल निधी, सार्वजनिक व वैयक्तीक कामासाठी कुशल निधी, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीसाठी अर्धकुशल निधी, वैयक्तीक सिंचन विहीर, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर यासह शेततळे, जनावरांचा गोठा, शेळीपालन शेड यासह या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे यांनी मनरेगाच्या योजनांची सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ्‍ कसा घेता येईल. कयाधू नदीच्या पुनरजीवन कार्यक्रमातून प्रत्येक कुटुंबांचा विकास कसा साधता येईल, यासाठी काय केले पाहिजे याची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव यांनीही मनोगत व्यक्त केले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: