17 August, 2022

 

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये

3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपयांची प्रकरणे निकाली

 



हिंगोली, (जिमाका) दि. 17 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि. 13 ऑगस्ट, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 188 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका, घरकुल योजनेची दाखलपूर्व 245 प्रकरणे जडजोडीआधारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपये  रक्कम ठरवून तडजोडी आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आली.

वयोवृध्द महिलेची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश पॅनलवरुन उतरले खाली

या लोकन्यायालयामध्ये शांताबाई जिजाबा वसू या 65 वर्षीय वयोवृध्द महिला त्यांच्या मोटार अपघात वाद निवारण मंचासमोरील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी हजर होत्या. वयोवृध्द महिलेला चालता येत नसल्याने व जिल्हा न्यायालयातील वरील मजल्यावर पोहोचणे शक्य होत नसल्याने हिंगोली जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश  आर. व्ही. लोखंडे यांनी स्वत: पॅनलवरुन उतरुन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये लॉबीमध्ये बसलेल्या वयोवृध्द शांताबाई जिजाबा वसू यांच्याजवळ जाऊन त्यांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्या प्रकरणात 9 लाख 50 हजार नुकसान भरपाई रकमेवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढण्यात आले. 

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विविध समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.

या लोकअदालतीमध्ये तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-1 आर.व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री. व्ही. बुलबुले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यु.एन.पाटील, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत, आय. जे. ठाकरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कु.पी.आर.पमनाणी,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.के.आर.नर्सीकर,कार्याध्यक्ष ॲड.मतीन पठाण, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

*****

 

No comments: