12 August, 2022

 

हर घर तिरंगा मोहिमेत दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत

आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून त्याची जपणूक करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना 75 ध्वजाचे वितरण

* ग्रंथालय दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

* द असियाटिक सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रंथ संजीवनी पोर्टल सेवेचे उद्घाटन

* डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा

 




हिंगोली, (जिमाका) दि. 12 : हर घर तिरंगा मोहिमेत दीड लाख घरावर झेंडे लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी जिथे ध्वज उपलब्ध होतील तेथून ध्वज घेऊन आपल्या घरावर लावावेत. या तिरंगा झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून त्याची जपणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना 75 ध्वजाचे वितरण, द असियाटिक सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रंथ संजीवनी पोर्टल सेवेचे उद्घाटन, ग्रंथपाल दिनानिमित्त 75 वाचकांना ग्रंथ भेट तसेच ग्रंथपालाचा सत्कार कार्यक्रम आदी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्री. पापळकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठी साहित्य परिषदेचे अशोक अर्धापूरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांची उपस्थिती होती . 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. द आसियाटिक सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे ग्रंथ संजीवनी पोर्टलच्या डिजिटीलायझेशनच्या माध्यमातून पुस्तकाचा भांडार वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा स्तूत्य उपक्रम आहे. सध्या इंटरनेटच्या युगात मिळणारी सर्वच माहिती खरी असेल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे या पोर्टलची जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करुन ते वाचकापर्यंत पोहोचवावेत. ग्रंथ हेच खरे गुरु आणि मित्र आहेत. त्यामुळे ग्रंथ वाचनाची सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रमाणे संपूर्ण मराठवाड्यात मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने उपलब्ध असलेली पुस्तके ग्रंथालयाच्या माध्यमातून गावागावात पोहोचविण्याची गरज आहे. यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची व त्यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेत ग्रंथच आपल्याला मदत करणार आहेत. त्यामुळे ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. होतकरु विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी हिंगोली येथे जिल्हा ग्रंथालयाची सूसज्ज अशी इमारत उभारण्यात येत आहे. हा चांगला योग आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी ग्रंथपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचे योगदान आहे त्यांची आठवण करुन देण्याची गरज आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना खंडेराव सरनाईक यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने उपलब्ध माहिती लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी आपल्या प्रास्ताविकात द ॲसियाटीक सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे ग्रंथ संजीवनी पोर्टलची सुविधा जिल्ह्यातील चार ग्रंथालयामध्ये उपलब्ध असून यामध्ये जिल्हा शासकीय ग्रंथालय, बियाणीनगर येथील नूतन साहित्य मंदिर, वसमत येथील सार्वजनिक वाचनालय आणि सेनगाव येथील विश्वास वसेकर सार्वजनिक वाचनालयात वाचकासाठी मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पोर्टलवर 30 हजार 527 पुस्तके, 73 हजार 622 वृत्तपत्रे, 1919 हस्तलिखिते, 6 हजार 917 मासिके, 459 नकाशे आणि 21 वृत्तपत्रीय कात्रणे असे एकूण 1 लाख 18 हजार 398 साहित्य डिजिटल स्वरुपात वाचनासाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली.

यावेळी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना 75 ध्वजाचे वितरण करण्यात आले. ग्रंथपाल दिनानिमित्त 75 वाचकांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शालेय ग्रंथपाल गजानन शिंदे, महाविद्यालयीन ग्रंथपाल ज्योती शंखपाळे, सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष ससे, सुरेश बल्लाळ, शेख इब्राहीम यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

****

No comments: