05 August, 2022

 

अन्न व्यवसायिकांनी स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे

उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व अन्न सुरक्षा सप्ताह (सुरक्षित आहार देई आरोग्याला आधार) अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  प्रत्येक अन्न व्यवसायिकांनी परवाना/ नोंदणी घेऊनच अन्न व्यवसाय करावा. तसेच व्यवसायिकाने ग्राहकास अन्न पदार्थ विक्री करतांना त्याची विक्री बिले, अन्न पदार्थ स्वच्छ, निर्भेळ असल्याबाबतची  खात्री करुन त्याची विक्री करावी. तसेच ग्राहकांनी पॅकींग अन्न पदार्थ खरेदी करतांना पॅकींग वरील उत्पादन दिनांक, बॅच नंबर, मुदत बाह्य दिनांक पाहुनच अन्न पदार्थाची खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य हिंगोली कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यवसायिक, मिठाई भांडार, चाट भांडार, पाणी पुरी तसेच भेळ विक्रेते या व्यवसायीकांनी अन्न पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा वारंवार वापर न करता त्याचा वापर केवळ दोन वेळेसच करावा. तसेच तयार अन्न पदार्थ पॅकींगसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यात येऊ नये. त्यामुळे कॅन्सर सारख्या दर्धर आजार होण्याचा संभव आहे. तसेच पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व हॉटेल व्यवसायिक, मिठाई भांडार, चाट भांडार, पाणी पुरी तसेच भेल विक्रेते या व्यवसायिकांनी अन्न पदार्थ, पिण्याचे पाणी, स्वच्छता या बाबीकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे, या बाबींचे उलंघन केल्यास त्या व्यवसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त भा. भि. भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: