11 August, 2022

 

घरोघरी तिरंगा फडकवताना

नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविताना नागरिकांनी संहितेचे पालन करावेत

* जिल्ह्यात दीड लाख राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन

 


हिंगोली, (जिमाका) दि. 11 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या तीन दिवसांच्या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार राबविला जाणार आहे.  घरोघरी तिरंगा फडकाविताना जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकांचा सहभाग आवश्यक आहे. या तीन दिवसाच्या कालावधीतील मोहिमेचे महत्व लक्षात घेवून उत्साही वातावरणात हा उपक्रम यशस्वी करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा या मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात दीड लाख राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून 01 लाख एक हजार राष्ट्रध्वज प्राप्त झाले आहेत. खाजगी वितरकाकडून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे 50 हजार व डोनरकडून 2 हजार झेंडे असे एकूण 1 लाख 53 हजार झेड्यांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 38 हजार ध्वजाचे वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 01 लाख 5 हजार ध्वजाचे वितरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिली.

तिरंगा ध्वज लावताना त्याचा साईज 3x2 असणे आवश्यक आहे. तिरंगा ध्वज बांबूकाठीसह 25 रुपये दराप्रमाणे विक्री करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासकीय कार्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत कार्यालयाच्या इमारतीवर ठळक ठिकाणी लावण्यात यावा. नमूद कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयाने ध्वज संहितेनुसार सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत ध्वज ठेवावे व ध्वज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर उतरविणे आवश्यक आहे.

तसेच जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये नागरिकांनी स्वत:च्या घरावर बांबूच्या काठीने तिरंगा ध्वजाची उभारणी करावी. नागरिकांनी ध्वज उभारताना ध्वजासह बांबूच्या काठीला वरच्या टोकाला व खालच्या टोकाला सुई दोराने शिवून टाकावे. जेणेकरुन वारा, हवेच्या वेगाने ध्वज काठीपासून वेगळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. तसेच ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. सदरील ध्वज खाली पडणार नाही. चुरगळणार नाही, खराब होणार नाही, काठी वाकणार नाही इत्यादीबाबत दक्षता घ्यावी. सदरील कालावधीत तिरंगा ध्वज लावताना सर्वप्रथम वरती केशरी रंग व खाली हिरवा रंग असणे आवश्यक आहे. याप्रमाणे ध्वजाची उभारणी करण्यात यावी. नागरिकांनी दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वत:च्या घरावर उभारण्यात आलेला तिरंगा ध्वज दररोज खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. हा कालावधी संपल्यानंतर तो ध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवावा. चुरगळलेले, फाटलेले ध्वज रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी टाकून देण्यात येवू नये. राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा  अवमान होईल अशा रितीने त्याची विल्हेवाट लाऊ नये. परंतु अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा अन्य रितीने तो संपूर्णत: नष्ट करावा. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे , बांधण्याचे अगर वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांनिमित्त अमृत सरोवर अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  16 तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या तलावातील गाळ काढल्यामुळे त्या सर्व 16 तलावातील पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होणार आहे. तसेच त्याचे बाजूने वृक्ष लावगड करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या सर्व 16 तलाव परिसरात स्वातंत्र्यदिनी दि. 15 ऑगस्ट रोजी संबंधित गावातील स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, सरपंच यापैकी एकाच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात येणार आहे. तसेच दि. 14 ऑगस्ट रोजी येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरुन 75 कि.मी. भव्य सायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पापळकर यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनीही दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकाविताना जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहभागी व्हावे आणि या मोहिमेचे महत्व लक्षात घेवून उत्साही वातावरणात हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले.

****

 

No comments: