14 December, 2023

 

तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

8 लोकांकडून 5 हजार 100 रुपयांचा दंड वसूल

 

हिंगोली, (जिमाका) दि. 14  :  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. 14 डिसेंबर, 2023 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या सुचनेनुसार जिल्हा पोलीस, जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक व  मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या पथकाने हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंप परिसर, रेल्वे स्टेशन रोड, पोस्ट ऑफिस रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन उल्लंघन करणाऱ्या आणि शालेय परिसरातील तंबाखू विक्रेते तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, बाळगणे व विक्री करणे आणि शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये यांच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाडळकर, पोलीस उप निरीक्षक आगलावे व पोलिस उप निरीक्षक ठेंगे यांच्या सहकार्याने पो. शि. संतोष करे, मराठवाडा ग्रामीण विकास  संस्था, छत्रपती संभाजीनगरचे  विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड व जिल्हा रुग्णालयातर्फे श्री. कुलदीप केळकर, आनंद साळवे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने  परिसरातील ठिकठिकाणी उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत एकूण 08 लोकांकडून 5 हजार 100 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

कोटपा 2003 च्या नुसार कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी, कलम 6 - 'अ'  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई. कलम 6 'ब'  शैक्षणिक संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी, कलम 7 - कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी.

*******

No comments: