17 December, 2023

 

जल जीवन मिशनच्या जाणीव जागृतीसाठी विविध स्पर्धा

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीकरिता जिल्हा स्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच महाविद्यालयीन स्तरावर वत्कृत्व स्पर्धा व जिल्हास्तरावर स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजय दैने यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

निबंध व चित्रकला स्पर्धा :- या स्पर्धांचे आयोजन प्राथमिक स्तरावर (1 ते 7 वी ) व माध्यमिक स्तरावर (8 ते 10 वी ) विद्यार्थ्यांसाठी करावयाचे असून सर्व शाळांमध्ये या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी उत्कृष्ट निबंध व चित्र तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवायचे असून तालुकास्तरावर प्राप्त निबंध व चित्रांपैकी प्राथमिक गटातील सर्वोकृष्ट 3 निबंध व चित्र, माध्यमिक गटातून सर्वोकृष्ट 3 निबंध व चित्र, तालुकास्तरीय समितीमार्फत निवडले जातील व ते जिल्हास्तरावर पाठविले जातील. जिल्हास्तरावर निवड समितीमार्फत प्राप्त निबंध व चित्रांपैकी विजेत्या प्राथमिक गटातील 3 व माध्यमिक गटातील 3 विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जातील. या स्पर्धा 30 डिसेंबर, 2023 पर्यंत सर्व शाळांमध्ये संपन्न होणार आहेत.

निबंध व चित्रकला स्पर्धा जिल्हास्तरीय बक्षीस व पारितोषिक स्वरुप : प्राथमिक व माध्यमिक गटासाठी प्रथम - 21 हजार रुपये व पारितोषिक, व्दितीय- 11 हजार रुपये व पारितोषिक व तृतीय - 5 हजार 500 रुपये व पारितोषिक याप्रमाणे राहील.

वक्तृत्व स्पर्धा :- महाविद्यालयीन तरुण, तरुणींमध्ये वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून जल जीवन मिशनबाबत अधिक प्रभावीपणे जनजागृती व्हावी, यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांचे आयोजन ज्युनिअर स्तरावर (11वी व 12वी) व सिनिअर स्तरावर (पदवीधर ) विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत आहे. या स्पर्धेतून देखील महाविद्यालयीन स्तरावरील ज्युनिअर व सिनिअर गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय अशा प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड होणार असून प्राचार्यांनी निवडलेले ज्युनिअर गटातील प्रथम 3 व सिनिअर गटातील प्रथम 3 विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेस पात्र ठरतील. तालुकास्तरावर या स्पर्धकांची स्पर्धा संपन्न होईल. यामध्ये तालुकास्तरीय निवड समितीमार्फत मुल्यमापन करुन विजेते प्रथम 3 विद्यार्थी (ज्युनिअर गटातील प्रथम 3 व सिनिअर गटातील प्रथम 3 विद्यार्थी) जिल्हास्तरीय स्पर्धेस पाठविले जाणार आहेत. सर्व तालुक्यातून जिल्हास्तरावर पाठविलेल्या स्पर्धकांची वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित केली जाणार असून यातील जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत मुल्यमापन करुन विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित केली जातील.

वक्तृत्व स्पर्धा बक्षीस व पारितोषिक स्वरुप : ज्युनिअर गट व सिनिअर गट - प्रथम- 21 हजार रुपये व पारितोषिक, व्दितीय- 11 हजार रुपये व पारितोषिक, तृतीय 5 हजार 500 रुपये व पारितोषिक याप्रमाणे राहील.

स्पर्धेसाठी  पात्र व निवडीचे अधिकार जिल्हास्तरीय निवड समितीचे असतील. अशी माहिती जिल्हा परिषद हिंगोली ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रीती माकोडे व जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आत्माराम बोंद्रे यांनी दिली आहे.

*****

No comments: