30 December, 2023

 

विकसित भारत संकल्प यात्रेला फाळेगाव येथील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घराघरात पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा

- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव 

 

 




हिंगोली (जिमाका), दि. 30 :   शासनाच्या विविध योजनेचा लाभ घराघरात पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यांनी यावेळी केले.

आज हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव  बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, सरपंच लक्ष्मीबाई आसोले, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रक्लप संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे, गणेश वाघ, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले आदी उपस्थित होते. फाळेगाव येथील आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, सन 2047 पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान कार्ड देण्यात येत आहे. शासन आपल्या सर्व संकटात आपल्यासोबत असून या कार्डाच्या माध्यमातून आजारी नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत्‍ उपचार करण्याची सोय झाली आहे. तसेच प्रत्येकाला पक्के घर, हर घर नल से जल, शौचालय, वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला पक्के घर देण्याचे काम शासन करीत आहे. प्रत्येक समाजातील नागरिकाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना सुरु केली आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा. सर्व वंचित घटकातील समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या गावापर्यंत येत आहे. शासनाने 85 लक्ष महिला बचतगटाची निर्मिती करण्याचे लक्ष ठेवले आहे. या बचगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी बवनून दोन करोड लखपती दीदी बनविण्याचे स्वप्न आहे.  तसेच प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त भारत बनविण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. अगोदर आपले घर स्वच्छ करावे त्यानंतर गाव स्वच्छ करावे आणि आपला देश स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यांनी यावेळी केले.

            आमदार मुटकुळे यांनी अखेरच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन सन 2047 पर्यंत विकसित राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपला हातभार लावावा. तसेच बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी व सक्षम करण्याचे काम करावे, असे आवाहन केले. 

           यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, दिव्यांगाना ग्रामपंचायततर्फे धनादेश वाटप, थोडेसे मायबापासाठी अंतर्गत ब्लँकेट वाटप, शिक्षण विभागातर्फे गणवेश व सायकल वाटप, उज्वला गॅस योजना, आधार कार्ड योजना, संगायो/इंगायो निराधार अनुदान योजना, उत्पन्नाचे, वय व अधिवास, रहिवास, राष्ट्रीयत्व व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचे वितरण, फेरफार, सातबाराचे वितरण, महिला व बालकल्याण विभागाचे लाभ, आरोग्य, कृषि, उमेद, कामगार कल्याण, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, समाज कल्याण विभागाचे लाभ, जिल्हा शल्यचिकित्सक द्वारा युडीआयडी प्रमाणपत्राचे व लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी मेरी कहानी, मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शासनाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी हमारा संकल्प विकसित भारतची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या विकसित भारत संकल्प यात्रेत उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. यानंतर आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच या परिसरात मंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमात वाशिम येथील एनसीसीच्या पथकाने कचरा मुक्त भारत जागरुकता कार्यक्रम सादर केला.

            आज विकसित भारत संकल्प यात्रेत आज फाळेगाव येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता शासनाने पाठविलेल्या एलईडी रथामधून देण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष मंडळींनी या एलईडी रथासोबत आलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला.

            या कार्यक्रमास जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

******

No comments: