28 December, 2023

 ग्राहक कल्याणाच्या सर्व उपक्रमात सर्वांचा सहभाग महत्वाचा

- जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर                             

 





हिंगोली (जिमाका), दि. 28 :  ग्राहक कल्याणाच्या सर्व उपक्रमात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे ग्राहक कल्याणासाठी विविध माध्यमांचा वापर करुन समाजामध्ये जागरुकता निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी केले.                                  

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष ॲड.आर.एन.अग्रवाल, सचिव परसराम हेंबाडे, सहसचिव एम.एम.राऊत, प्रसिध्दी प्रमुख डॉ.विजय निलावार, जिल्हा संघटक सुभाष लदनिया, ॲड.शोएब, जेठानंद नेंनवानी, माजी उपप्राचार्य विक्रम जावळे, प्रा.जी.पी.मुपकलवार, सुभाष नागरे, स्वस्त धान्य दुकानदार संघाचे भिकूसेठ बाहेती, कांनबाळे, श्रीमती ॲड.पाटील, अधीक्षक जकाते आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. धरमकर म्हणाले, ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी ग्राहक चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायतीला योग्य ते सहकार्य करण्यात येईल, यासाठी आपण पुढे यावे असे त्यांनी यावेळी आपण सांगितले.

याप्रसंगी परसराम हेंबाडे, एम. एम. राऊत, डॉ.विजय निलावार यांनी येत्या नववर्षात विद्यार्थी वर्गासाठी ग्राहक चळवळ आणि हक्क व कल्याण संदर्भात उदबोधन उपक्रम राबवण्यात बद्दल सूचित केले.

ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष ॲड. आर. एन. अग्रवाल यांनी याबाबत प्रशासन, शिक्षण विभाग आणि सर्व संबंधितांना सोबत घेवून व्यापक मोहीम राबवण्यासाठी शासकीय यंत्रणेने पाठबळ द्यावे, त्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने वक्त्यांची एक फळी निर्माण करता येईल, असे सांगून ग्राहक पंचायत सज्ज असल्याचे म्हंटले.

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना अनेक हक्क प्राप्त झाले असून या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी व ग्राहक चळवळ लोकाभिमुख होण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी साजरा करण्यात येत असल्याचे हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.

याप्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य, जागरुक व ज्येष्ठ नागरिक, ग्राहक कल्याण क्षेत्रातील अन्य मंडळी, हिंगोली जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तहसील कार्यालय आणि संबंधित विभागातील अधिकारी. कर्मचारी, शिक्षण, आरोग्य, व्यापार क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन पत्रकार डॉ.विजय निलावार यांनी केले.

******

No comments: