31 December, 2023

 

सामान्य नागरिकांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा

- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव 

 






हिंगोली (जिमाका), दि. 31 :   शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा विकास करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी केले.

आज कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव  बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, सरपंच निता प्रल्हाद घुगे, उपसरपंच कल्पना सुनिल घुगे, श्रीकांत पाटील, फुलाजी शिंदे, महंत शाम भारती, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रक्लप संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे, गणेश वाघ, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार सुरेखा नांदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, सन 2047 पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, आदिवासी बांधवासाठीच्या योजना, जात प्रमाणपत्र यासारख्या विविध योजनाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठीच शासन आपल्या दारात आले आहे. शासनाने पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक लाभ डिजिटल स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक गावात रस्ते, वीज, सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे आपल्या गावातच आपल्या रोजगार मिळण्याची सोय झाली आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावातील छोट्या वर्गासाठी विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून परंपरागत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासनाने स्त्री-पुरुष समानतेवर जोर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला आधारित विकासाचे स्वप्न आहेत. आतापर्यंत 85 लाख महिला बचतगटाची स्थापना केली आहे. या माध्यमातून दोन करोड महिलांना लखपती दिदी बनवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांनी दीनदलितांच्या शिक्षणासाठी अहोरात्र काम केले आहेत. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु केली आहे. देशातील गरीबी दूर होण्यासाठी शासनाचे पैसे खऱ्या अर्थाने गरीब माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा गावागावात नेण्यात येत आहे. सामान्य माणसांचा शंभर टक्के विकास करण्यासाठी शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचारी यांची आहे. तसेच प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त भारत बनविण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. अगोदर आपले घर स्वच्छ करावे त्यानंतर गाव स्वच्छ करावे आणि आपला देश स्वच्छ करण्यासाठी गावागावात व्यवस्था निर्माण करुन स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यांनी यावेळी केले.

            यावेळी आमदार संतोष बांगर व माजी आमदार गजानन घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार सुरेखा नांदे यांनी मानले.  

           यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, दिव्यांगाना ग्रामपंचायततर्फे धनादेश वाटप, थोडेसे मायबापासाठी अंतर्गत ब्लँकेट वाटप, शिक्षण विभागातर्फे गणवेश वाटप, उज्वला गॅस योजना, महसूल विभागातर्फे विविध लाभाचे वाटप, महिला व बालकल्याण विभागाचे लाभ, आरोग्य, कृषि, उमेद, कामगार कल्याण, समाज कल्याण विभागाचे लाभ, जिल्हा शल्यचिकित्सक द्वारा युडीआयडी प्रमाणपत्राचे व लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी मेरी कहानी, मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शासनाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी हमारा संकल्प विकसित भारतची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या विकसित भारत संकल्प यात्रेत उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. तसेच यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

            आज विकसित भारत संकल्प यात्रेत आज सेलसुरा येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता शासनाने पाठविलेल्या एलईडी रथामधून देण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष मंडळींनी या एलईडी रथासोबत आलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांना ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

            या कार्यक्रमास जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

******

No comments: