02 December, 2023

 

मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

   

हिंगोली, (जिमाका) दि. 02  :  येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने व महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 20 डिसेंबर, 2023 पासून आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मुलाखती दि. 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सामाजिक न्याय भवन सभागृह हॉल, समाज कल्याण विभाग, हिंगोली येथे होणार आहेत. या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या उद्योग संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, दाल मिल, ऑईल मिल, हळद पावडर, मिरची पावडर, मसाले उद्योग, पापड उद्योग, बेकरी उत्पादन, शेवया उद्योग, वेफर्स, गारमेंट, केस व त्वचा निगा इत्यादी उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासोबतच उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, विविध व्यवसाय संधी, संवाद कौशल्य, शासकीय, निमशासकीय व इतर महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजना, बँकेची भूमिका, प्रकल्प अहवाल, मार्केटींग, व्यवसाय व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण नियमितपणे उपस्थित राहून पूर्ण केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी सिध्दार्थ थोरात (मो. 9552183038), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांना दि. 15 डिसेंबर, 2023 रोजीपर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.    

***** 

No comments: