01 December, 2023

 

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी

शासन खंबीरपणे उभे

--- पालकमंत्री अब्दुल सत्तार

  • शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन 7 डिसेंबरपर्यंत वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश

 



हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करुन त्यांना मदत करण्यासाठी शासन नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार नामदेव ससाने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी महसूल, कृषि विभागाने तातडीने एकत्रिरित्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन 7 डिसेंबरपर्यंत वस्तुनिष्ठ पंचनामे करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देणार आहे, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे एक रुपया भरुन शेतकऱ्यांडून शंभर टक्के विमा नोंदणी 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावेत. यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना माहिती द्यावी व शंभर टक्के पीक विम्याची नोंदणी होईल याची दक्षता घेण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

पालकमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये व व्याजामध्ये ही रक्कम वजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये जमा झालेले पैसे कपात करु नयेत. सातत्याच्या पाऊस व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पावसामुळे एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान हे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. रास्तभाव दुकानदारांच्या मागण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील वीज पडून मयत झालेल्या राजू जायभाये यांच्या कुटुंबियांना शासनाच्या ज्या ज्या योजनांचा लाभ मिळवून देता येईल त्या त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील मंडळामध्ये नुकसान झालेल्या पिंकाचे व नुकसानीची माहिती दिली. तसेच यलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची त्यासाठी लागणाऱ्या अनुदानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

*****

No comments: