07 January, 2017

माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर-अनुभव लेखन स्पर्धा-2016
            हिंगोली, दि. 7:- माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी दिनांक 12 ऑक्टोबर  2005 पासून सुरु झाली आहे. या कायद्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, शासनव्यवस्थेत माहितगार नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच पादर्शकता व उत्तरदायित्वाची प्रक्रिया सुरु व्हावी यासाठी केंद्र शासनाने माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर- अनुभव लेखन स्पर्धा 2015 चे आयोजन करण्यात आले असून याकरिता आपले अनुभव 15 जानेवारी, 2017 पर्यत यशदा, पुणे येथे पाठविण्याचे आवाहन माहिती अधिकार केंद्राचे संचालक मिलिंद टांकसाळे यांनी  केले आहे.
                महिती अधिकार कायद्यांच्या माध्यमातून देशभरात विविध नागरी संघटना शासकीय कारभार अधिकाधिक उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कायद्याच्या माध्यमातून सामाजिक लेखापरीक्षणाद्वारे तळातील माणसापर्यंत सुप्रशासन पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. माहिती अधिकाराचा वापर करुन गेल्या नऊ वर्षात समाजहिताच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली आहे. एकूणच या कायद्याच्या माध्यमातून पादर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग ही त्रिसूत्री जनसामान्यंपर्यत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना व माहिती पुरवणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षात अनेक अनुकूल-प्रतिकूल अनुभवांना तोंड द्यावे लागले आहे. त्या दृष्टीने कायद्याचे, आपल्या अनुभवाच्याव्दारे परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
                माहिती अधिकाराचा समाजहितासाठी उपयोग करताना आलेले चांगले अनुभव म्हणजे यशोगाथा तसेच प्रतिकूल अनुभव शब्दबध्द करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. यासाठी यशदामार्फत अनुभव लेखन स्पर्धा आयोजीत करण्यात येत असून विषय पुढीलप्रमाणे - 1) माहिती अधिकार अर्ज व अनुषंगिक उपलब्ध माहिती आणि माहितीचा उपयोग, 2) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 आणि माहितीचा अधिकार अधिनियम, 2005, 3) माहितीचा अधिकार अधिनियम कलम 4 चे प्राधिकरणाने करावयाचे स्वयंप्रकटीकरण सद्यस्थिती 1 हजार शब्दांमध्ये आवश्यक पुराव्यासह पाठवावीत तसेच निबंधलेखन स्पर्धेसाठीचे विषय पुढीलप्रमाणे - 1) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वापर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संदर्भ तूलनात्मक आढावा, 2) डिजीटल इंडिया (माहिती तंत्रज्ञान) पार्श्वभुमीवर माहिती अधिकारी अधिनियम 2005, 3) माहिती अधिकारी अधिनियम 20052 संबंधित परिणामकारक महत्वाचे न्यायनिवाडे.
या स्पर्धेसाठी गेल्या अकरा वर्षातील माहितीच्या अधिकाराचा वापर करताना आलेल्या अनुभवाचे लेखन पात्र समजण्यात येईल. सुवाच्य अक्षरात 1 हजार शब्दांपर्यत हस्तलिखित अथवा टंकलिखित केलेले अनुभव व निबंध स्वीकारले जातील. त्यासोबत आवश्यक ते पुरावे जोडावेत. आपले अनुभव लेखन दि. 15 जानेवारी, 2017 पर्यंत प्रकल्प अधिकारी, माहिती अधिकार केंद्र, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे 411007 या पत्यावर पाठविण्यात यावेत.
                प्रवेशिका कशी पाठवावी याबाबतचा तपशील व नमुना यशदाचे www.yashada.org  या संकेस्थळावर उपलब्ध आहे. या विषयातील मान्यवर तज्ञ अनुभव लेखनाचे परीक्षण करतील, यशस्वी स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांकास रु. 5 हजार, द्वितीय क्रमांकास रु. 3 हजार, तृतीय क्रमांकास रु. 1 हजार पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. तर निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास रु. 3 हजार, व्दितीय क्रमांकास रु. 2 हजार व तृतीय क्रमांकास रु. 1 हजार उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच तज्ञ मान्यवरांना वाटल्यास एक प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेचा निकाल यशदाच्या उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार केंद्र, यशदा येथील पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा (020)- 25608130, असे असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                                                                *****

06 January, 2017

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 साठी
 प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
हिंगोली , दि. 6 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2017 असा आहे.
स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.inया संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.  
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे  अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

                                                                        *****
जिल्हास्तरीय माजी सैनिक / विधवा मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि. 06 : जिल्हास्तरीय माजी सैनिक/विधवा मेळाव्याचे आयोजन मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 10 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

***** 
पुणे येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि. 06 : सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उ हिंगोली जिल्ह्यातील मेदवारांसाठी दि. 06 फेब्रुवारी, 2017 ते 11 फेब्रुवारी, 2017 रोजी सोल्जर (जनरल ड्युटी) व क्लर्क या पदासाठी 101 इन्फ्रटी बटालीयन (टी.ए.) मराठा लाई, पुणे येथे भरती घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा व जास्तीत-जास्त उमेदवारांनी भरतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

***** 
जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा
                हिंगोली, दि. 06 : मराठी पत्रकारीता सृष्टीचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतीत पहिले वृत्तपत्र दर्पण दि. ६ जानेवारी सुरु केले होते त्यानिमित्त हा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जातो. जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, श्रीमती शांताबाई मोरे, एहसानखान पठाण, प्रल्हाद शिंदे, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी कऱ्हाळे, अनिस अहमद, विलास जोशी, नंदकिशोर कांबळे, चंद्रकांत वैद्य, श्रीमती रेणुका तम्मलवार, विवेक डावरे, अनिल चव्हाण, श्री. सुर्यवंशी, चंद्रकांत गोधणे, श्रीमती कविता राठोड यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

 

05 January, 2017

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 5 :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2016 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 01 जानेवारी ते 31 जानेवारी, 2017 पर्यंत पाठविता येणार आहेत. दि. 01 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2016 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात, तसेच मुंबई वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2016 नियमावली प्रवेशिका’ या शीर्षाखालीही व ‘What’s new’ या सदरात ‘Late yashwantrao Chavan State Literature Award 2016 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पुर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 31 जानेवारी, 2017 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबईतील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई  400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई वगळता अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2017 पर्यंत पाठवावे, असे आवाहन, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेखक/प्रकाशकांनी मंडळांकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/पाकिटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2016 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर (दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2017) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.
अधिक माहिती करिता माहिती पुस्तिका, प्रवेशिका बाबतचे माहिती करिता जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेशी संपर्क करावा.

*****
शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
हिंगोली, दि. 5 :- विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या कार्यक्रमानुसार बुधवार दि. 4 जानेवारी, 2017 रोजीपासून आचारसंहिता लागु करण्यात आली आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. दि. 3 फेब्रुवारी, 2017 ला मतदान घेतले जाणार असून दि. 6 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दि. 10 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. दि. 17 जानेवारीला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. दि. 18 जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. दि. 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. दि. 3 फेब्रुवारीला  सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. सहा फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


*****