01 November, 2017

बेळगाव येथे सैनिकांच्या पाल्यांकरीता
युनिट कोटा सैन्य भरतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यातील सर्व आजी / माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यासाठी दि. 13 ते 28 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत मराठा रेजीमेंटल सेंटर बेळगाव कॅम्प येथे सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
            सदरील भरतीमध्ये जनरल ड्युटी, सोल्जर ट्रेडसमॅन व सोल्जर कार्ल्ककरीता दि. 13 नोव्हेंबर, 2017 पासून भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी भरतीचे ठिकाणी सकाळी 6 वाजण्यापूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाशी संपर्क साधावा.

***** 
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी
हयात प्रमाणपत्र कोषागारास किंवा बँकेत सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी व कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र कोषागारास सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंगोली कोषागार कार्यालयाने सर्व संबंधित बँकांना अशा निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या याद्या पाठविलेल्या आहे. त्या यादीच्या नावांसमोर संबंधित निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी स्वाक्षऱ्या कराव्यात, असे आवाहन जिल्हा‍ कोषागार अधिकारी पी. डी. पुंडगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
किड नियंत्रणाकरिता क्रॉपसॅप प्रकल्प

क्रॉपसॅप प्रकल्‍पामुळे राज्‍यातील शेतक-यांना विविध पिकांतील कीड व रोगांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यातांना निश्चितच मोठा फायदा झाला असुन हा प्रकल्‍प महा‍राष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभाग व कृषि विद्यापीठे यांचा एक महत्‍वकांक्षी प्रकल्‍प राष्‍ट्रीय पातळीवर देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रकल्प राबविल्या जात आहे. सदर प्रकल्पाचे सर्वेक्षण अहवाल मोबाईल ॲपव्दारे एनआयसी पुणे व कृषी विद्यापीठास सादर केला जाते. जिल्ह्यात 22 किड सर्वेक्षक काम करीत असून त्यांच्यावर संनियंत्रण उपविभाग स्तरावरून श्री. बोथीकर के. एच. व खंदारे एम. पी. कृषी पर्यवेक्षक करत असून सद्या कापूस व तुर पिकाचे सर्वेक्षण केल्या जात आहे. सर्वेक्षण अहवालाव्दारे विद्यापीठाकडून प्राप्त Advisory सल्ला विविध माध्यमाव्दारे शेतकऱ्यांना देण्यात येतो.
तुर : उत्पादन वाढीसाठी एकात्मिक किड व्यवस्थापन मर रोगास बळी न पडणाऱ्या जातीचा वापर करावा. बागायती तुरीचे क्षेत्र वाढवून उत्पादनात वाढ करावी. तुर पिकावर पाने गुंडाळणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंग ढेकून, पट्टेरे भुंगरे, खोड ढेकून, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
एकात्मिक किड व्यवस्थापन : शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची तणे कोळशी, रानभेंडी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. पुर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षीथांबे लावावेत जेणेकरून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील. रासायनिक किटक नाशकांची फवारणी पट्टा पध्दतीने अथवा खंड पध्दतीने केल्यास परोपजीवी किडीच्या संवर्धनास मदत होते.
तुरीवरील शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण : नुकसानीचा प्रकार पिकाच्या कळी फुलोऱ्या पासून काढणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी तुर पिकाची सर्वाधिक नुकसान या किडीमुळे होते. लहान अळी सुरूवातीस तुरीची कोवळी पाने खाते. फुलोरा लागल्यावर प्रथम व व्दितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलावर होतो. नंतरच्या अवस्थेत शेंगावर होतो. त्या शेंगा भरतांना शेंगावरील कोवळी दाने खातात. एक अळी साधारणत: 20 ते 25 शेंगाचे नुकसान करते. प्रतिझाड एक अळी असल्यास उत्पादनात हेक्टरी 138 किलो इतकी घट होते.
किडीची आर्थिक नुकसान पातळी : 10 अळ्या प्रती 10 झाडे फुलोऱ्याच्या अवस्थेत किंवा 2 ते 3 अंडी प्रती झाड किंवा 5 टक्के शेंगाचे नुकसान.
कापूस : कपाशीवरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी बायोफेनथ्रीन 10 ईसी 16 मी. ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी 10 मी. ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. बोंडसड नियंत्रणासाठी कार्बेनडॅझिम 50 डब्ल्युपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. लाल्या नियंत्रणासाठी मॅग्नेशीयम सल्फेट 1 टक्के आणि युरिया 2 टक्के ची फवारणी करावी. किटकनाशकाच्या मात्रा योग्य प्रमाणात घेऊन फवारणी करतांना योग्य ती  काळजी घ्यावी.
हरभरा : बियाणे जमीनीत पेरणीपूर्व जमीनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्याची उगवणक्षमता वाढविण्यासाठी रोते सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधाची प्रक्रिया करावी त्यासाठी अ) कार्ब्रोक्झीन 75 टक्के पाण्यात मिसळणारे किंवा कार्बेन्डेझिम 50 टक्के किंवा थायरम 75 टक्के 20 ग्रॅम प्रती 10 किलो ग्रॅम बियाणे या प्रमाणात चोळून पेरणी करावी. आणि ब) रायझोबीयम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणु प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रती 10 के. जी. बियाण्यावर बिज प्रक्रिया करावी बियाणे 30 मिनिटे सावलीत सुकवून पेरणी करावी.
शेतकऱ्यांनी फवारणी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी : शासनाने / कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेलेच किटकनाशक फवारणीसाठी स्विकारावेत व त्यातील फवारणीसबंधीची संपूर्ण माहिती वाचून घ्यावी. किटकनाशकाला हुंगने किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणी मिश्रण करतांना अथवा फवारणीच्यावेळी तंबाखु खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबनाने स्वच्छ धुऊन खाने पिने करावे. किटकनाशकाच्या रिकाम्या बॉटल / डब्बे वापरानंतर नष्ट करावीत. किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये. डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे.

जिल्हा माहिती कार्यालय
हिंगोली

*****

31 October, 2017

हिंगोली येथे राष्ट्रीय एकता दौड संपन्न
            हिंगोली दि.31:  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याहस्ते राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ झाला यावेळी पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्यासह अधिकारी-कर्मचारी तसेच जेष्ठ नागरिक व महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.
            प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आणि राष्ट्रीय ऐकतेची शपथ घेण्यात आली. हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. सदर दौड अग्रसेन चौक येथून इंदिरा गांधी चौक मार्गे जाऊन महात्मा गांधी चौक येथे विसर्जन करण्यात आले.

*****
जिल्हाधिकारी कार्यालयात
सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

        हिंगोली, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पुढीलप्रमाणे राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली : मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुध्दा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.

*****

27 October, 2017

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व
प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 27 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींना सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता शासन निर्णय आदेशाचे अधीन राहून खालील अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्याच उमेदवारांची निवड करण्यात येईल.
1) उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा. 2) उमेदवार हा 18 ते 25 वयोगटातील असावा. 3) उमेदवाराची उंची पुरुष 165 से.मी. महिला 155 से.मी. असावी. 4) उमेदवाराची छाती पुरुष 79 से.मी. फुगवून 84 से.मी. असावी. 5) शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. 6) जातीचा दाखला, रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी दाखला ओळखपत्राची सत्यप्रत आवश्यक राहिल. 7) उमेदवार शारिरिक दृष्टया निरोगी सक्षम असावा. 8) वार्षिक कौंटुंबिक उत्पन्न 1 लाख पर्यंत असावे.
उमेदवारांना दिनांक 06 नोव्हेंबर, 2017 पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण हे शासनाच्या वतीने होणार आहे. प्रशिक्षणार्थीस जाण्या-येण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
वरील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे अधिकृत पत्र मिळविण्यासाठी दिनांक 03 नोव्हेंबर, 2017 पर्यंत कार्यालयात विहीत नमून्यात अर्ज सादर करावा. सदर अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत नि:शुल्क उपलब्ध असून विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.    

***** 
बळीराजाला साथ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची

        प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त करण्यासाठी ई-ठिबक आज्ञावली दि. 1 मे 2017 पासून सुरु करण्यात आलेली आहे. या आज्ञावलीद्वारे दि. 31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती जाणुन घेऊ या...
केंद्र व राज्याचे अर्थसहाय्याचे प्रमाण : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 2015-16 पासून राज्यामध्ये राबविण्यात येत असून सन 2017-18 मध्ये सदर योजना राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्यासाठी 380 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. केंद्र हिस्सा रक्कम 380 कोटी व त्यास पूरक राज्य हिस्सा रक्कम 240.67 कोटी असा एकूण 620.67 कोटी निधी उपलब्ध होणार आहे.
मराठवाडा विभागासाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना : दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2016-17 पासून मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांसाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना तीन वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सन 2017-18 वर्षासाठी 143.50 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याप्रमाणे सन 2017-18 साठी एकूण रुपये 764.17 कोटी निधी सूक्ष्म सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतून सन 2017-18 वर्षामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत 2.61 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 2.10 लक्ष हेक्टर क्षेत्रावर तर मराठवाड्यात सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 60 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 48 लक्ष हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संच बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. 
अनुदान मर्यादा : सन 2017-18 साठी या योजनेअंतर्गत अनुदानाचे प्रमाण अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55 टक्के व इतर भूधारक शेतकरी 45 टक्के प्रमाण आहे. 
जलद व पारदर्शक अंमलबजावणीकरिता कागदपत्रांची संख्या कमी : राज्य शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणून योजना पारदर्शकरित्या व अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून शेतकऱ्यांना शासनास सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. योजना अंमलबजावणीतील काही टप्पे कमी करण्यात आलेले आहेत.
अर्ज स्वीकृतीचा कालावधी : सन 2017-18 मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकृती करण्यासाठी ई-ठिबक आज्ञावली दि. 1 मे 2017 पासून सुरु करण्यात आली असून दि. 31 डिसेंबर, 2017 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज : सन 2017-18 पासून लाभार्थींना नोंदणीसाठी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थींचा आधार क्रमांक हाच युजर आयडी असेल. शेतकऱ्यांकडून अर्ज फक्त ई-ठिबक आज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत.
                                                                                                                                    --2
                                                            --2--
एसएमएसद्वारे माहिती : लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पूर्वसंमती प्रदान करण्यात येणार आहे. लाभार्थीने योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्यापासून प्रत्यक्षात सूक्ष्म सिंचन संच बसवून अनुदानाची मागणी केल्यानंतर योग्य ती पडताळणी करुन अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभधारकास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभधारकास सन 2017-18 मध्ये नोंदणीस/नोंदणी नुतनीकरणास मान्यता देण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन संच उत्पादकामधून त्यांच्या पसंतीच्या उत्पादकाकडून त्यांनी प्राधिकृत केलेल्या वितरक/विक्रेत्याकडून 30 दिवसाच्या आत सूक्ष्म सिंचन संच बसविणे आवश्यक असणार आहे. लाभार्थीने सूक्ष्म सिंचन संच बसविल्यानंतर बील इन्व्हाईस ऑनलाईन प्रणालीत नोंदवायचे आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
अनुदान प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रे : अनुदान प्रस्तावासोबत शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा 7/12 व 8 अ उतारा, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (ईएफटी) प्रणालीची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत, शेड्यूल्ड किंवा सहकारी बँकेत खाते उघडल्याचा पुरावा. शेतकऱ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत, उत्पादक कंपनीने/कंपनी प्रतिनिधीने ग्राफ पेपरवर स्केलसह तयार केलेला सूक्ष्म सिंचन संचाचा आराखडा, सूक्ष्म सिंचन संच साहित्याचे सर्व करासहीत कंपनीच्या अधिकृत वितरकाने स्वाक्षरीत केलेले बील. शेतकऱ्यांनी निवड केलेल्या उत्पादक कंपनीशी अथवा कंपनी प्राधिकृत प्रतिनिधीशी केलेला करारनामा ही प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा : लाभधारकाने पूर्वमान्यता मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सूक्ष्म संच न बसविल्यास त्याची पूर्वसंमती आपोआप रद्द होईल. तथापि त्याला पुन्हा अर्ज करता येईल. तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करतील. तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षकांमार्फत त्या त्या कृषी पर्यवेक्षकाच्या कार्यक्षेत्रातील बसविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन संचाची 10 दिवसात मोका तपासणी करुन तपासणी अहवाल संगणकीय प्रणालीवर नोंदवतील. त्यानंतर अनुदानाची परिगणना करुन तालुका कृषी अधिकारी लाभधारकास देय असणाऱ्या अनुदानाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करतील.
पूर्वसंमती आवश्यक : पूर्वमान्यता न घेता शेतकऱ्याने सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी केली असल्यास व अनुदानासाठीचा प्रस्ताव सादर केला असेल तर अशा शेतकऱ्यांस अनुदान अनुज्ञेय असणार नाही.
पाच हेक्टर क्षेत्राला लाभ देय : सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसविण्यासाठी प्रती लाभार्थी 5 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देय राहील. सूक्ष्म सिंचन संच घटकाचे आयुर्मान सात वर्षे करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ज्या लाभधारकाने 5 हेक्टर मर्यादेत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा लाभधारकास सात वर्षांनंतर पुन्हा सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येईल.
आयुर्मान संपण्यापूर्वी संचाची विक्री करता येणार नाही : सूक्ष्म सिंचन संचाचे निश्चित केलेले आयुर्मान संपण्यापूर्वी लाभधारकास सूक्ष्म सिंचन संचाची विक्री करता येणार नाही. सूक्ष्म सिंचन संचाचे निश्चित केलेले आयुर्मान संपण्यापूर्वी संचाची विक्री केल्यास अशा लाभधारकाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित लाभधारकास भविष्यात शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत शासकीय सहाय्य मिळणार नाही, अशा लाभधारकाचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल. उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करुन जास्तीत जास्त पिकांना सूक्ष्म सिंचन उपलब्ध करुन देवून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय थांबवून कमी पाण्यावर उत्पादन क्षमता वाढविणे व जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. 

                                                                                                                         जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                                   हिंगोली

*****