05 January, 2019

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अंतर्गत समिती गठीत करण्याचे आवाहन




कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण
 अधिनियम 2013 अंतर्गत समिती गठीत करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.5: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 च्या कलम 4(1) नुसार कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी व त्याचे निवारण करण्याकरिता तक्रार समिती गठीत करणे आवश्यक आहे. सदर तक्रार समिती गठीत न केल्यास उपरोक्त कायद्यात कलम 26 अंतर्गत रु. 50 हजार दंड आकारण्याची तरतूद दर्शविली आहे.
याकरीता जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी कलम 26 व कलम 4(1) चे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी, शासकीय, निमशासकीय, हॉटेल, खानावळ, भोजनालय, लॉज, मंगल कार्यालय येथे ही समिती तात्काळ गठीत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दूसरा मजला एस-7, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे संपर्क साधावा.

********

सिंचन विहिरीतील गौण खनिज वाहतूक व विक्री करीता परवाना आवश्यक - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


                                                         

सिंचन विहिरीतील गौण खनिज वाहतूक व विक्री करीता परवाना आवश्यक
-    जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

        हिंगोली, दि.5: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहीरींचे कामे झालेली आहेत. तसेच काही प्रमाणात प्रगती पथावर आहेत. आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, रोहयो प्रभाग यांचे शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2018 अन्वये शेतकऱ्यांच्या शेतातील पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतामधील कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण करण्याकरिता उपयोगात येतात. अशा ठिकाणी ने आण करण्यासाठी शेत, पाणंद रस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे सदर ठिकाणी सदर गौण खनिजाचा वापर जल सिंचन विहीर व जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामातुन उपलब्ध झालेले गौण खनिज शेतरस्ता, पाणंद रस्ता बांधकामासाठी उपयोग करीत असल्यास अशा गौण खनिजाकरीता कोणत्याही प्रकारचे स्वामीत्व शुल्क न आकारता सदरचे गौण खनिज  वापरण्याची परवानगी देण्याबाबतचे निर्देश आहेत. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 12 जानेवारी, 2018 अन्वये नळमार्ग किंवा केबल टाकण्याकरिता जमीन खोदल्यावर त्या खोदकामातून उपलब्ध होणारी माती त्याच ठिकाणी भराव टाकण्यासाठी व समतल करण्यासाठी वापरण्यात येत असल्यास अशा मातीवर स्वामित्व धन भरणे आवश्यक असणार नाही. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 11 मे, 2015 अन्वये उपविभाग, तहसिल अंतर्गत सिंचन विहीरीतून निघालेला दगड, मुरुम , माती याचा संबंधित शेतकऱ्यांना स्वत:च्याच शेतामध्ये ज्या जमिनीच्या गट नंबरच्या ठिकाणी विहीरीचे खोदकाम केलेले आहे व त्यांना त्याच जमिनीच्या गट नंबरमध्ये गौण खनिजाचा वापर करावयाचा असल्यास जसे की, गोण खनिज बंधाऱ्यावर टाकणे, जमिनीचा भराव करणे यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे स्वामित्वधन वसूल करण्यात येणार नाही, परंतू संबंधित शेतकरी यांना सिंचन विहिरीचा निघालेल्या गौण खनिजाची इतरत्र ठिकाणी वाहतुक करावयाची असल्यास किंवा विक्री करावयाची असल्यास संबंधित शेतकऱ्यांकडून नियमानुसार विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात सादर करुन स्वामित्वधन शासन जमा करुन तात्पुरत्या गौण खनिज परवाना हस्तगत करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांनी कळविले आहे.

****


जिल्हा वार्षिक योजना छाननी समितीची बैठक संपन्न




जिल्हा वार्षिक योजना छाननी समितीची बैठक संपन्न

हिंगोली,दि.5: जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 च्या प्रारुप आराखड्याची छाननी करण्यासाठी आमदार तान्हाजी मुटकूळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या छाननी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज संपन्न झाली.  
यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह  सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.   
सर्व प्रशासकीय यंत्रणानी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रस्ताव सादर करतांना सर्वसामान्य जनतेचे हित व गरजा लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. तसेच उपलब्ध झालेल्या निधीचा विनियोग चांगल्या कामासाठी करुन सदर निधी वेळेत खर्च करावा. तसेच विहित वेळेतच  प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना आमदार मुटकुळे यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना प्रारुप आराखडा 2019-20 ची छाननी संदर्भात तसेच अद्ययावत 2018-19 मध्ये खर्च झालेला निधी व 2019-20 मध्ये प्रस्तावित कामे यासंदर्भात आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आढावा घेतला.
यावेळी जलसंधारण, कृषी विभाग, नगर विकास, आरोग्य विभाग, वन विभाग, शालेय, पाणी पुरवठा, ग्रामीण पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदी विभागाच्या योजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. छाननी केलेला आरखडा आगामी जिल्हा नियोजन समितीची मंजूरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

****

बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक


विशेष लेख क्र.1                                                                                 दिनांक : 5 जानेवारी 2019
बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक
‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे; इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा 1832 ते 1846 या काळात उमटवला.
भारतात ब्रिटिशांनी येताच कलकत्यामध्ये पहिलं वृत्तपत्र 'बेंगाल गॅझेट' नावानं इंग्रजी साप्ताहिक 29 जानेवारी, 1780 रोजी सुरु केले. ब्रिटिश सरकारने आपल्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी मुद्रणालयं सुरु केली. समाज प्रबोधन करण्यासाठी हे महत्वाचं साधन आहे. त्याकरीता समाजाचे विचार परिवर्तन न होणारे वृत्तपत्र निघू नये अशी त्यांची धारणा होती. परंतू कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याची भारतीयांना जाणीव झाली. यानंतर अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. बंगालीनंतर मराठी असा भाषिक वृत्तपत्रांचा क्रम लागतो.
            ब्रिटीशांनी भारतात आपलं बस्तान सार्वजनिक केल्यानंतर पाश्चिमात्य संस्कृती मूल्यांचा भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संषर्घ निर्माण झाला. तथापि, पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळं भारतीय पंडितांना समाजातल्या घडामोडींची भौतिक दृष्टीनं कारणमीमांसा करण्यास प्रोत्साहनही मिळालं. समाजातील वर्णव्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडलं  यातूनच एकसंध समाज निर्माण करण्यासाठी समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत. याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनांची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांच आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली. ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या कलकत्ता, मद्रास (चेन्नई), मुंबई येथे इंग्रजी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. परंतू जनतेच्या अस्तित्वाला या वृत्तपत्रात विशेष स्थान देण्यात येत नसे. या वृत्तपत्रांवर सरकारचे विशेष लक्ष होतं. जहाजांची ये-जा, जाणाऱ्या - येणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावं, सरकारी जाहिराती आदी मजकूर वृत्तपत्रांत प्रसिध्द करण्यात येत असे. यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही कल्पना रुजू लागली आणि तर इंग्रजी भाषेत वृत्तपत्रं निघतात तर भारतीय भाषांतही अशी वृत्तपत्रं का निघू नयेत असा प्रश्न निर्माण झाला. आणि कलकत्त्ता येथे पहिलं इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यामुळं या शहरात पहिल्या भाषिक वृत्तपत्राचाही प्रारंभ झाला. भारतीय समाजानं नवीन वैचारिक जागृती आणि नवी जाणीव निर्माण होण्यास या वृत्तपत्रामुळे मदत झाली.
            ब्रिटिश अधिकारी जेम्स ऑगस्ट हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट' च्या अगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकानंतर म्हणजेच 52 वर्षांनी 6 जानेवारी, 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानानं ' दर्पण ' च्या रुपानं पहिलं मराठी वृत्तपत्रं सुरु केलं. मुंबईत बाळशास्त्री जांभेकरांनी ' दर्पण ' च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमित रुजण्यास सुरुवात झाली.
एक उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी
बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.
दर्पणाचा पहिला अंक 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने  साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नांचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. 1840 मध्येच त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. 1845 मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.
साधारणपणे 1830 ते 1846 या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या 33 वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत, मौल्यवान व अद्‌भूत  ठरते. 6 जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केलाय त्याच बरोबर जातीभेद निर्मुलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळंच त्यांचा उल्लेख "अद्य समाजसुधारक" असा केला जातो. परंतु कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले येथे 1812 च्या उतरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांच वयाच्या अवघ्या 33 वर्षी  1846 मध्ये निधन झालं.

जिल्हा माहिती कार्यालय
हिंगोली
***********

03 January, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी





जिल्हाधिकारी कार्यालयात
सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
        हिंगोली, दि. 3 : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी,जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणविरकर,जिल्हा नियोजन अधिकारी श्री.कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी श्री. सुर्यवंशी, नगर पालिका प्रशासन अधिकारी श्री.सोनवणे आदिंसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी -कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****



01 January, 2019

टंचाई सदृश्य परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणानी संवेदनशीलरित्या कामे करावी -डॉ. पुरुषोत्तम भापकर








टंचाई सदृश्य परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणानी संवेदनशीलरित्या कामे करावी
-डॉ. पुरुषोत्तम भापकर

हिंगोली,दि.1: यावर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी संवेदनशीलरित्या कामे करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित टंचाईसदृश परिस्थिती व इतर योजनांचा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,  मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. एच.पी तुम्मोड, अप्प्‍र जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बनसोडे, सहायक आयुक्त (विकास) अनंत कुंभार, अधिक्षक कृषि अधिक्षक (रोहयो) पोपट शिंदे, सहायक संचालक (रेशीम) श्री. हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तूलनेत हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परंतू पावसाने ओढ घेतल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थितीत निर्माण झाली आहे. या परिस्थीतीत काम करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत अनेक लोकहिताची कामे करण्याची संधी प्रशासनाकडे आहे. या संकटाला संधी मानून सर्व यंत्रणानी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. सर्व विभागाच्या ग्राम, तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वयाने ग्राम विकासाच्या योजना राबविल्यास नागरिकांना या योजनचा फायदा मिळेल. हिंगोली जिल्ह्याला 10 हजार विहिरी मंजूर झाल्या असून, या विहिरीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच प्रत्येक तालुक्याला ग्रामसंपर्क अधिकारी नेमण्यात आला असून, ग्रामस्तरावर ग्राम संपर्क अधिकारी हा त्या गावाचा पालक अधिकारी असल्याने त्या गावातील सर्व विकासात्मक कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आठवड्यातील एक दिवस सर्व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी एकत्र येवून गावातील विविध प्रश्न मार्गी लावावेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीं मध्ये या माध्यमातून ग्राम विकासाच्या योजना राबविल्यास गाव आणि नागरिकांना याचा फायदा होण्यास मदत होईल.
टंचाई सदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक हे कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरीत होत आहे. अशा नागरिकांची गाव निहाय माहिती तयार करावी. तसेच त्यांना रोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत. सर्व यंत्रणांनी टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी नाविन्यपूर्ण कामे करावीत. तसेच टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनाकरीता चारा-पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याकरीता संरक्षीत चाऱ्याचे योग्य नियोजन पशुसंवर्धन व कृषी यंत्रणांनी समन्वयाने करण्याचे निर्देश ही डॉ. भापकर यांनी यावेळी दिले.
यावेळी डॉ. भापकर यांनी पर्जन्यमान्य, पाणी टंचाई,  टँकर, चारा नियोजन, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना, वृक्ष लागवड, वनीकरण, पशुसंवर्धन, रेशीम विकास, रोजगार हमी योजना आदी विषयांची सविस्तर माहिती संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
            प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजना, टंचाई सदृश्य परिस्थिती तसेच विविध उपक्रमांची माहिती सादरीकरणांद्वारे दिली. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीचा कालबध्द कार्यक्रम आणि सहायक संचालक (रेशीम) श्री. हाके यांनी तूती लागवड विषयक सविस्तर माहिती दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****



ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे - डॉ. पुरुषोत्तम भापकर



ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे
- डॉ. पुरुषोत्तम भापकर

हिंगोली, दि.1:  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे विशेष मोहिम हाती घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान नागरिकांनी सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण आज हिंगा्रली तालुक्यातील संतूक पिंपरी येथे आयोजित प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, उपविभागायी अधिकारी अतुल चोरमारे आणि श्री. फुलारी, तहसिलदार गजानन शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. नागरिकाच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून व्हीव्हीपॅट यंत्रणेची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्याच्या उद्देशाने नागरिकांसाठी सर्वत्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृतीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणारे यंत्र असून, मतदान कक्षातील बॅलेट युनिटसोबत ते जोडलेले राहील. मतदार जेव्हा मतदान करतील तेंव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले होईल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडल्याची खात्री मतदार करू शकणार आहे. इतकी ही सुस्पष्ट व पारदर्शी प्रक्रिया आहे. ज्या नागरिकांचे मतदान यादीत नाव नाही किंवा नुकतेच ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली, त्यांनी तत्काळ मतदान यादीत आपले नाव नोंदवावे. नागरिकांनी त्यात सहभागी होऊन निवडणुकीच्या पवित्र व राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे ही डॉ. भापकर यावेळी म्हणाले.
प्रारंभी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांकडून मतदान करण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिकात ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मत मिळाल्याची खात्री नागरिकांना करता येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
****