15 February, 2019

अनुसूचित जमातीतील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना केंद्रवर्ती अर्थसंकल्पावर आधारीत योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन


अनुसूचित जमातीतील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना
केंद्रवर्ती अर्थसंकल्पावर आधारीत योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.15: केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2018-19 अंतर्गत अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी या कार्यालयात उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांचे नावे परिपूर्ण कागदपत्रांसह आपला आवेदन अर्ज 28 फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच सदर योजनांमध्ये पूर्णत:/अंशत: बदल करण्याचा निणर्य प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला असून, इच्छूक लाभार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी केले आहे.
****

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल यांना अभिवादन






जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल यांना अभिवादन

        हिंगोली,दि.15: बंजारा समाजातील समाज सुधारक तथा आदर्श गुरु संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपजिल्हाधिकारी (रोहयो)  खुदाबक्ष तडवी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, नायब तहसिलदार श्री. गळगे, श्री. मिटकरी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी संत सेवालाल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
****




14 February, 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परिक्षा 17 फेब्रुवारी रोजी




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परिक्षा 17 फेब्रुवारी रोजी
* जिल्ह्यातील 12 उपकेंद्रावर होणार परीक्षा.
* परिक्षा उपकेंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू.
                                                                                  
           हिंगोली,दि.14: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍य सेवा परीक्षा 17 फेब्रुवारी  रोजी सकाळी 10.00 ते 12.00 आणि दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत हिंगोली मुख्यालयातील 12 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
            सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यात सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****



12 February, 2019

महिला व बाल कल्याण क्षेत्रातील कार्यासाठी जमनालाल बजाज फाऊंडेशन पुरस्कार-2019 प्रस्ताव करण्याचे आवाहन



महिला व बाल कल्याण क्षेत्रातील कार्यासाठी जमनालाल
बजाज फाऊंडेशन पुरस्कार-2019 प्रस्ताव करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.12: महिला विकास व बाल कल्याणाच्या दिशेने विशेष कार्य करणारी अथवा गांधीवादी रचनात्मक कार्य करणारी महिला करणाऱ्या महिलाना दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप रु. 10 लाख स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र हे असून, त्या अनुषंगाने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव जाहिरात प्रसिध्दीपासून येत्या सात दिवसात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्याल, हिंगोली येथे दाखल करावेत. तसेच संबंधित प्रस्ताव दाखल करण्याकरिता www.jamnalalbajajawards.org या संकेतस्थळावरील निकष, अटी व शर्ती बघुन ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी  http://jamnalalbajajawards.org/nomination-forms या संकेतस्थळावर प्रस्ताव दाखल करावेत. परिपूर्ण प्रस्तावासाठी संबंधित महिलांनी खालीलप्रमाणे महिला व बालकांच्या क्षेत्रातील कार्य केलेले असणे आवश्यक आहे.
महिला तसेच बालकांच्या शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, रोजगार तसेच पुनर्वसन, निरक्षरता निवारणासाठीचे कार्य, महिला तसेच बालकांच्यासाठी नि:शुल्क किंवा कमी खर्चात आरोग्य सेवा, प्रसुतीपूर्व तसेच प्रसुतीनंतरच्या सोयी सुविधा, चांगल्या आरोग्यासाठी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणे, बालकांसाठी योग्य आहार उपलब्ध करुन देण्यासंबंधित कार्य, आपत्तीमध्ये अडकलेल्या बालकांचे पुनवर्सन, झोपडपट्टी च्या भागात सुधार, आपत्तीग्रस्त महिलांसाठी नि:शुल्क्‍ किंवा कमी खर्चात न्यायविषयक सहाय्य, महिलांना त्यांचया अधिकारांचे तसेच अधिकारांशी संबंधित कायद्यांची माहिती करुन देणे, महिलांचा स्तर सामाजिक स्तर उंचावणे या दिशेने केलेले कार्य, मानसिक, बौध्दिक तसेच शारिरीक स्वरुपातील दुर्बल अविकसित व अपंग बालकाची देखभाल शिक्षण पुनर्वसन याबाबतचे कार्य, कुटूंब नियोजन आणि शिक्षण, वैज्ञानिक शोधकार्यात सदर कार्यामध्ये त्यांचा सहभाग तसेच कार्य केलेले आसावे.
या पुरस्कारासाठी नामांकित महिलांचे मुल्यांकन करताना त्यांच्या कार्याचा एकूण परिणाम किंवा प्रभाव क्षेत्र तसेच ते कार्य करताना महिला आणि बालकांना मिळालेला विशिष्ट लाभांचा प्रभाव बघितला जाईल. तसेच मानसिक, शारिरीक, लैंगिक शोषणापासून पिडीत, अत्याचारग्रस्त, परितक्त्या, शोषित व आजारी महिला, विधवा यांची मदत विशेष करुन ग्रामीण भागातील महिला, उपेक्षित, निष्काशित, निराश्रित, शोषित तसेच अनाथ (विशेष करुन ग्रामीण भागातील) बालकांची मदत केली आहे काय ? तसेच विधीसंघर्ष ग्रस्त बालकांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी काय प्रयत्न केलेल्या माहिलांनी या पुरस्कारकरीता आपले प्रस्ताव जाहिरात प्रसिध्दीपासून येत्या सात दिवसात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्याल, हिंगोली येथे दाखल करावेत असे आवाहन केले आहे.
****


10 February, 2019





अटल आरोग्य महाशिबिर ; 1 लाख रुग्णांची तपासणी

हिंगोली,दि.10: अटल आरोग्य  महाशिबिरातंर्गत नोंदणी झालेल्या विविध आजारांच्या सुमारे 1 लाख रूग्णांनी प्रत्यक्ष उपस्थिती राहून तपासणी करून घेतल्याची माहिती शिबिर संयोजन समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसेच जलसंपदा मंत्री  गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य विनामूल्य ‘अटल आरोग्य  महाशिबीर’ रविवारी  10 फेब्रूवारी रोजी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील 25 हेक्टरच्या भव्य मैदानात पार पडले. 
यावेळी आरोग्य महाशिबिरास येणारा प्रत्येक रुग्ण व नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. येणारा प्रत्येक रुग्ण समाधानाने परत जाईल याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली होती. या शिबीरासाठी 65 हजार रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात आली होती. त्या सर्व रुग्णांची राज्यातील नामांकित डॉक्टरांमार्फत शिबिरात तपासणी झाल्यानंतर नागपूर येथेच सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिरासाठी येणाऱ्या गरीब व गरजू सर्व रुग्णांना नि:शुल्क भोजन व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली होती. सर्व रुग्णांना औषध व आवश्यक साहित्य देखील यावेळी पूरविण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये प्रारंभी रुग्णांची नोंदणी झाल्यानंतर त्यांची तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यकतेनुसार औषध, एमआरआय, सीटीस्कॅन, रक्ताच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व आवश्यकतेनूसार यंत्रांची देखील उपलब्धता यावेळी शिबीरात करण्यात आली. संपूर्ण शिबिरामध्ये विविध पॅथीचे सुमारे दीड हजार डॉक्टर्स आणि 29 ओपीडींमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी दंतचिकित्सा व शस्त्रक्रियेसाठी चार मोबाइल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या होत्या.  तपासणीशिवाय एकही रुग्ण येथून परत जाणार नाही. यांची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. स्वतंत्र व्यवस्था करुन येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
यावेळी शिबिरात आलेल्या रुग्णांची नामाकिंत डॉक्टरांमार्फत तपासणी करुन सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात आल्या. तसेच सुमारे सव्वा कोटी रुपयांची औषधी याठिकाणी वितरण केली. याशिवाय रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी जेवण, चहा, पाणी याची ही व्यवस्था करण्यात आली होती. या आरोग्य शिबीरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही, अशा रुग्णांना नागपूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे नेवून त्यांच्यावर अत्याधूनिक  पध्दतीचे उपचार केले जाणार आहेत. महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच समाजातील दानशुर व्यक्ती यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
या महाआरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे, रामेश्वरजी नाईक, संदीप जाधव, गजानन घुगे, शिवाजी जाधव, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, तहसीलदार गजानन शिंदे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधीकारी रामदास पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग, विविध खासगी दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना, वैद्यकीय संघटना, सामाजिक संघटना आदींनी यशस्वी नियोजनासाठी सहकार्य केले.
****

09 February, 2019

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचा हिंगोली जिल्हा दौरा


 वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली दि. 09 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री श्री. गिरीष महाजन हे दि. 10 फेब्रुवारी, 2019 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
श्री. महाजन यांचे रविवार,  दि. 10 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 10.20 वाजता अटल मैदान, हिंगोली रेल्वे स्टेशन जवळ हिंगोली येथे आगमन व अटल महाआरोग्य शिबीरास उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने नांदेड एअरपोर्ट कडे प्रयाण.
*****



हिंगोली येथे आज भव्य अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन


हिंगोली येथे आज भव्य अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन

हिंगोली,दि.09: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अटल मैदानावर आज जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विनामुल्य सकाळी आठ ते चार या वेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत सकाळी 10:30 वाजता या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील 25 हेक्टर जागेवर या अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभागातून होऊ घातलेले या शिबिरात महाराष्ट्रातील नामाकिंत तज्‍ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून, जवळपास दिड हजार डॉक्टर याठिकाणी आरोग्यसेवा देणार आहे. यात ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी आदी पद्धती या ठिकाणी रुग्णांना मिळणार आहेत. 19 प्रकारच्या विविध आजारांची यावेळी तपासणी होणार आहे. याठिकाणी 100 बाह्यरुग्ण विभाग ज्यामध्ये प्रामुख्याने हृद्य रोग, कर्करोग, नेत्र, त्वचारोग, कान नाक घसा, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग लठ्ठपणा, वृद्ध विकार, मूत्ररोग, आदी बाबींचा समावेश या शिबिरांमध्ये आहे.
रुग्णांना सेवा देण्यासाठी सुमारे दिड हजार पॅरामेडिकलचा स्टाफ , सात हजार स्वयंसेवक कार्यकर्ते, विद्यार्थी व समाजसेवी संस्था याठिकाणी आपल्या सेवा देणार आहेत. रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर ज्यांना उपचार शक्य असतील अशा रुग्णांना तात्काळ निशुल्क औषधे  देण्यात येणार असून, त्याकरीता सुमारे दीड कोटी रुपयांची औषधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांना तात्काळ उपचार शक्य नसल्यास  दिनांक 13 तारखेला पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर त्यांना उपचार देण्यात येणार आहेत तेथे ही  शक्य नसेल तर जिल्हास्तरावर आणि त्या ठिकाणी ही शक्य नसेल तर औरंगाबाद, नागपूर, पुणे, नांदेड, मुंबई येथे रुग्णांना नेवून त्यांना मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती शिबिर संयोजन समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सर्व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय पूर्वतपासणी सप्ताह दरम्यान आज पर्यंत सुमारे 65 हजार 367 रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात आली असून, प्रत्यक्ष्‍ शिबिरात एक ते सव्वा लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्व नियोजन करण्यात आले असून, या शिबीरात सुमारे दीड हजार डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी या ठिकाणी होणार आहे. तसेच ऐनवेळी  येणाऱ्या  रुग्णांची देखील  तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांसाठी नाष्टा, चहापाणी तसेच दुपारी जेवणाची व्यवस्था विविध सेवी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 25 हेक्टर जागेत शिबिर मंडप, 10 रुग्णवाहिका, वाहतूक व्यवस्था चार अग्निशामक वाहन, 10 पाणी पिण्याचे टँकर्स, मोबाईल टॉयलेट्स, डस्टबिन आदींची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे.
अतिशय सुसज्ज व नियोजनपूर्वक असे हे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न होत असून, या महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
                                                *****