12 March, 2019


दिव्यांग व्यकतींची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहिम
                                                               -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
·   दिव्यांगाकरीता PwD ॲपद्वारे मतदार नोंदणी सुविधा

हिंगोली,दि.12: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दिव्यांग व्य़क्तींची मतदार नोंदणी वाढविण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी  यांनी दिली.
दिव्यांग व्य़क्तींची मतदार नोंदणी करुन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दिव्यांग व्यक्तीकरीता कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाची बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी भाऊसाहेब जाधव आणि डाएटचे प्राचार्य गणेश शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी जयवंशी पुढे म्हणाले की, येणाऱ्या कालावधीत दिव्यांग व्यक्तींसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन दिव्यांग मतदारांची नाव नोंदणी करणार आहेत. जिल्ह्यात सुमारे 22 हजार दिव्यांग व्यक्ती असून, त्यातील केवळ 2 हजार 417 जणांची नावे मतदार यादीत आहेत. ज्या दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी झालेली नाही त्यांची मतदार नोदंणी करुन हे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर रॅम्प निर्माण करणे, व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच काही दिव्यांग व्यक्ती हे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येऊ शकत नाहीत. अशा दिव्यांग व्यक्तींसाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर येण्यासाठी व घरी जाण्यासाठी स्वतंत्र वाहनांची सोय केली जाणार आहे. त्यासाठी निवडणुकीपूर्वी दिव्यांग व्यक्तींने प्रशासनाकडे नोंद करायची आहे. दिव्यांग व्यक्तीकरीता कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी देखील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी  व्हावी याकरीता प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधकारी यांनी यावेळी केले.
तसेच दिव्यांग मतदारांवर यावर्षी विशेष लक्ष देण्यात येत असून भारत निवडणुक आयोगाने तयार केलेल्या PwD ॲपद्वारे दिव्यांग व्यक्ती आपला मोबईल क्रमांक आणि पत्ता याची नोंद करावयाची आहे. तसेच मतदान केंद्रावर व्हीलचेअर आदी सुविधांसाठी ऑनलाईन नोंदणी करु शकणार आहेत. 1950 या मतदार हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, मतदार यादीतील नाव तपासणे तसेच अन्य मदतीसाठी या हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे.

****


09 March, 2019

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती कार्यक्रम संपन्न



ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती कार्यक्रम संपन्न

हिंगोली, दि.9:  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध माध्यमांचे पत्रकार आणि लोक प्रतिनिधी यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती देवून जनजागृती करण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर व जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन संबंधी माहिती देतांना उपविभागीय अधिकारी श्री. चोरमारे म्हणाले की, व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणारे यंत्र असून, मतदान कक्षातील बॅलेट युनिटसोबत ते जोडलेले राहील. मतदार जेव्हा मतदान करतील तेंव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले होईल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडल्याची खात्री मतदार करू शकणार आहे. इतकी ही सुस्पष्ट व पारदर्शी प्रक्रिया आहे.    
तसेच यावेळी त्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनीचे विभाग, मशिनीची सुरुवातीला घेण्यात येणारी मॉक परीक्षा,  इत्यादी विषयी थेट प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. नागरिकाच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून या नवीन व्हीव्हीपॅट यंत्राची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात विविध ठिकाणी नागरिकांसाठी सर्वत्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृतीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही चोरमारे यांनी सांगितले.
प्रारंभी संपादक, जिल्हाप्रतिनिधी, इलेक्टॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली. तसेच संपादक, जिल्हाप्रतिनिधी, इलेक्टॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी डेमो मतदान केले. यावेळी प्रात्यक्षिकात ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मत मिळाल्याची खात्री करता येत असल्याचे ही जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्टॉनिक मिडीयांच्या प्रतिनिधींना निर्देशनात आणून देण्यात आले.
                                                                          ******

07 March, 2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पूर्वतयारी बैठक संपन्न



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पूर्वतयारी बैठक संपन्न

हिंगोली,दि.07: आदर्श आचारसहितेच्या अनुषंगाने आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पूर्वतयारी बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समिती सभागृहात  संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दाताळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  रामदास पाटील,  यांच्यासह सर्व उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.
सदर बैठकीत जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी आदर्श आचारसहिंतेच्या अनुषंगाने स्थापन केलेली पथके, यामध्ये भरारी पथक (Flying Squad), बैठक पथक (Static Surveillance Team (SST)), व्हिडीओ चित्रिकरण पथक (Video Surveillance Team (VST)), व्हिडिओ पाहणी पथक (Video Viewing Team (VVT)) यांची  व या पथकांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत कलम 123, भारतीय दंड सहिता कलम 171 याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
तर अप्पर पोलीस अधिक्षक श्री. काळे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या निर्माण होणा-या परिस्थिती विषयी मार्गदर्शन करतांना गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया, मुद्देमाल जप्तीबाबत, उमेदवारांच्या सभेच्या देण्यात येणा-या परवानगीबाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्व आराखडा तयार करण्याच्या सूचनाही यावेळी दिली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिनियार यांनी आदर्श आचारसंहिता  या विषयी सविस्तर माहिती देतांना निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसहितेची अंमलबजावणी सुरु होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

****




बचत गटांनी संकुचित विचार न ठेवता
जागतिक बाजार पेठेत आपले महत्व दाखवून द्यावे
                                               - मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड

हिंगोली,दि.06: ग्रामीण भागात कल्पकता असून ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी संकुचित विचार न ठेवता जागतिक बाजार पेठेत आपले महत्व दाखवून द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी केले.
येथील महावीर भवन येथे आयोजित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , हिंगोली  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तुंचे कयाधु जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नरवाडे, आमदार सर्वश्री तान्हाजीराव मुटकुळे, संतोष टारफे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण व अर्थ सभापती संजय देशमुख, कृषि व पशुसंवर्धन सभापती  प्रल्हाद राखोंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. प्रविणकुमार घुले व मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. तुम्मोड म्हणाले की, ग्रामीण भागातील कल्पकतेला वाव देण्यासाठी सदर प्रदर्शनाचे दिनांक 06 ते 09 मार्च 2019 या कालावधीत आयोजन करण्यात आले असून महिला बचतगटांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण  भागातील जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागातील महिला भगिनींना चालना देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी आपल्या भागातील विविध वस्तु विक्री बरोबरच आपल्या कल्पकतेतून नवनवीन वस्तुंची निर्मिती करुन उत्पनांचे साधन या ठिकाणी उपलब्ध करावे, असे आवाहनही यावेळी श्री. तुम्मोड यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. घुले यांनी जिल्ह्यातील एकूण बचत गटांची माहिती, त्यांच्या विविध योजना, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण,  इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार संतोष टारफे व आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही बचत गटातील महिलांना  समयोचित मार्गदर्शन केले.
प्रारंभी उद्घाटन समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी काही यशस्वी बचत गटातील महिलांनी आपल्या बचत गटांच्या वाटचाली विषयी सविस्तर माहिती दिली.
सदरील प्रदर्शनामध्ये जिल्हातील दारिद्रय रेषेखालील एकूण 110 बचत गटांनी सहभाग नोंदविला असून यामध्ये त्यांच्या मार्फत रानमेवा, विविध प्रकारच्या दाळी, रसायण विरहित गुळ, तुप, खवा, बुरुड पासून तयार केलेल्या वस्तु, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तु, रुद्राक्षांच्या माळी, पुजेच्या वस्तु, फोटो फ्रेम, बेंटेक्स ज्वेलरी,वनऔषधी, हर्बल सौंदर्य प्रसाधने, डिंक, बिबा, विविध प्रकारचे लोणचे इत्यादी वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
****


02 March, 2019

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना



प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  
           हिंगोली, दि. 2 :- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याचा प्रयत्न होत असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले.
            या योजनेअंतर्गत बचत गटातील महिला, आशा वर्कर, अंगणावाडी सेविका, मदतनिस घरामधून व्यवसाय चालविणारे , फेरीवाले दुकानदार, ड्रायव्हर, प्लंबर, शिंपी, गिरणी कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरा जमा करणारे, बीडी कामगार, गिरणी कामगार, मोची, शेती कामगार, धोबी इत्यादी पात्र आहेत. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना लाभ मिळेल. यामध्ये 55 रुपये लाभार्थी  प्रतिमहिना व 55 रुपये केंद्र शासन त्यांच्या खात्यावर भरणार आहे. त्यासाठी त्यांचे वैयक्तीक बँकखाते असणे आवश्यक आहे. हे सॉफ्टवेअर आपले सेवा केंद्राकडे उपलब्ध झाले आहे. तर आधार कार्ड व मोबाईल नंबर घेऊन संबंधित लाभार्थ्यांने गावातील आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडे जाऊन नाव नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी केले आहे.
00000


01 March, 2019

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2018 साठी प्रवेशिका पाठविण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ


उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2018 साठी
प्रवेशिका पाठविण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

हिंगोली, दि. 1 :-  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2019 असा होता. तथापि या प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी या स्पर्धेत जिल्हयातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय,हिंगोली च्या  वतीने करण्यात येत आहे.
 जिल्हयातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने  dgipr.maharashtra.gov.in  किंवा  www.maharashtra.gov.in  तसेच  www.mahanews.gov.in  येथेही उपलब्ध आहेत.  

****

नाव नोंदणीसाठी 2 व 3 मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन · जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन



नाव नोंदणीसाठी 2 व 3 मार्च रोजी
   विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन  
·        जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

  
           हिंगोली, दि. 01 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने वंचित न राहो कोणी मतदार या उद्दीष्‍टाखाली जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट करण्‍यासाठी नागरीकांनी 2 व 3 मार्च 2019 रोजी आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ यांचेकडे आपले नाव नोंदणी अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी  यांनी केले आहे.
               भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. सर्व मतदारांनी या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्‍थळ अथवा जिल्‍हास्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या मतदार मदत केंद्राचा टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधुन करता येईल. तसेच संबंधित तहसील कार्यालय,उपविभागीय कार्यालय, जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊन करता येईल.
          आगामी लोकसभा निवडणूक 2019 विचारात घेऊन मतदार नोंदणीपासून वंचित राहीलेल्‍या नागरीकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी यासाठी हिंगोली जिल्‍हयाच्‍या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. मात्र तरीही ज्‍यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरीकांसाठी मुख्‍य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानूसार पुन्‍हा एकदा दिनांक 2 व 3 मार्च 2019 रोजी  विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या विशेष मोहिमेच्‍या दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन नागरीकांचे नाव नोंदणीबाबतचे अर्ज स्विकारणार आहेत. तसेच मतदार म्‍हणून नाव नोंदविणे करणेबाबत https://www.nvsp.in/ या ऑनलाईन पोर्टलद्वारेदेखील अर्ज भरू शकतात.
                आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 2 व रविवार 3 मार्च 2019 रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
000000