13 March, 2020

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू


जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

             हिंगोली,दि.13: कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हिंगोली शहर आणि पूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 13 ते 27 मार्च, 2020 या कालावधीत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.
जिल्ह्यात उच्च माध्यमिक (12 वी) परीक्षा दिनांक 18 मार्च पर्यंत चालणार आहेत तर माध्यमिक (10 वी) परीक्षा 23 मार्च पर्यंत चालणार आहेत, 25 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण, श्री संत शिरोमनी नामदेव महाराज यात्रा तसेच विविध संघटने तर्फे त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चा, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक जन्य बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे गोळा करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****



12 March, 2020

महिला लोकशाही दिनाचे 16 मार्च रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 16 मार्च  रोजी आयोजन

        हिंगोली, दि.12: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 16 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे.
ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.
00000


11 March, 2020

नोव्हेल करोना विषाणूंबाबत समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अशास्त्रीय अफवांकडे दुर्लक्ष करावे


नोव्हेल करोना विषाणूंबाबत समाज माध्यमांवर पसरत
 असलेल्या अशास्त्रीय अफवांकडे दुर्लक्ष करावे
·         कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल करोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही

हिंगोली, दि.11 : चीन व जगातील इतर देशांमध्ये नोव्हेल करोना विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. नोव्हेल करोना विषाणू हा सांसर्गिक आजार असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. तथापि कुक्कुट पक्ष्यांकडून मानवामध्ये हा आजार संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत.  मांस व मांस उत्पादने ही उकळवून व शिजवून सेवन केल्या जाते  व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.
महराष्ट्र राज्यात कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केल्या जात असून या व्यवसायाशी अनेक शेतकऱ्यांचे चरितार्थ व आर्थिक  हित जोडलेले आहे, पर्यायाने हा व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. खोट्या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय हा आर्थिक संकटात सापडला असून या व्यवसायाशी निगडीत लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर (सोशल मिडिया- फेसबुक व व्हॉट्सॲप द्वारे)  भारतात व महाराष्ट्रात कुक्कुट मांस व अंडी यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत. कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल करोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नसून ते मानवीय आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अशास्त्रीय अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली आणि पशुसंवर्धन विभाग, हिंगोली यांच्याकडून करण्यात आले आहे.
000000


सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार


सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार 

हिंगोली, दि.11: मार्च महिन्यातील दिनांक 25 मार्च रोजी गुढीपाडवा हा उत्सव तसेच दिनांक 21,22 मार्च व 28, 29 मार्च रोजी येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. सदर दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा  मिळावा तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली  वरील सर्व तारखांना सुरु राहणार आहेत. त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार आहे.
 सर्व वाहन विक्रेते तसेच वाहन खरेदी करणारे यांनी सदर दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे वाहन नोंदणी व कर भरणा करण्याचे कामकाज करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

वन स्टॉप सेंटर अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


वन स्टॉप सेंटर अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

हिंगोली, दि.11: जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या वतीने केंद्र पुरस्कृत वन स्टॉप सेंटर अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम हॉटेल गणेश इन येथे संपन्न झाला . या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची उपस्थिती होती.
वन स्टॉप सेंटरची जिल्ह्यातील आवश्यकता, वन स्टॉप सेंटरमार्फत महिलाना  करण्यात येणारी मदत, वन स्टॉप सेंटरसाठी कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देऊन जिल्ह्यात पूर्ण ताकदीने केंद्र कार्यान्वित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी दिली.
या प्रशिक्षणात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, अधिनियमांच्या अनुषंगाने नोंदण्यात येणारे गुन्हे, शिक्षा व अधिनियमातील तरतुदी, वैद्यकीय सेवा, महिला व बालकांचे आरोग्य याबाबत डॉ. गोपाल कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच समुपदेशन करण्याच्या पध्दती, समुपदेशना दरम्यान समुपदेशकांचा  दृष्टीकोन याविषयी प्रशिक्षण देण्यात आले, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  विठ्ठल शिंदे यांनी कळविले आहे.
00000

महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) सुधारणा नियम संकेतस्थळावर उपलब्ध


महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे)
सुधारणा नियम संकेतस्थळावर उपलब्ध

हिंगोली, दि.11: महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या, नियम 11 मध्ये सुधारणा करण्यात आली असून दि. 14 फेब्रुवारी, 2020 च्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. सदर नियमातील सुधारणांच्या सुलभ संदर्भाकरीता अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील प्रसिध्द करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
0000
    



03 March, 2020

बी.एस. चार मानकांच्या वाहनांची नोंदणी बंद होणार


बी.एस. चार मानकांच्या वाहनांची नोंदणी बंद होणार

            हिंगोली, दि.03: वाहनांसाठीची प्रदुषण मानके बी.एस. चार ची नोंदणी दिनांक 31 मार्च 2020 नंतर बंद केली जातील.  बी. एस. चार वाहन काही कारणास्तव नोंदणी करावयाचे प्रलंबित असले जसे की, वित्तदात्याकडील थकीत प्रकरण वाहन मालकाचे आजारपण, वाहन मालकाचा अपघात इत्यादी तर अशा वाहनाची नोंदणी दिनांक 20 मार्च 2020 पूर्वी पूर्ण करुन घ्यावी, संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31 मार्च 2020 नंतर फक्त बी.एस. सहा मानकांच्या वाहनांची नोंदणी करता येणार आहे.
            दिनांक 25 मार्च रोजी गुढी पाडवा आहे तत्पूर्वी किमान 6 ते 7 दिवस अगोदर  वाहनाची सर्व पूर्तता  जसे शुल्क, कर इत्यादी भरणा  पूर्ण करुन घ्यावी जेणे करुन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर वाहन डिलिव्हरी देऊ शकेल.
            मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाहता व संगणकीय प्रणालीतील बदल पाहता वाहन वितरक व वाहन मालक याची कोणत्याही प्रकारची बी.एस. चार मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000