06 January, 2022

हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहीर

 

हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहीर

 

        हिंगोली दि.6 (जिमाका) : राज्य शासनाच्या दि. 6 जानेवारी , 1958 व 29 जून, 1982 रोजीच्या  शासन  निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सन-2022 या वर्षाकरीता हिंगोली जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

            दिनांक 4 मार्च, 2022 रोजी ( शुक्रवार) रथोत्सव यात्रा औंढा ना.,दिनांक 25 एप्रिल 202 (सोमवार) रोजी हजरत चिरागसाह बाबा उर्स उत्सव आणि दिनांक 25 ऑक्टोबर 2022 (मंगळवार) रोजी अश्विन अमावस्या (दर्श अमावस्थ्या अभ्यंग स्नान (दिपावली) निमित्त स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व  खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

00000

 

 

 


आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांची आरोग्य तपासणी

अभिनंदनीय आणि स्तूत्य उपक्रम

                                      -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 :  पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरीच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे, हा उपक्रम अभिनंदनीय आणि स्तूत्य आहे, असे सांगून पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुभेच्छा दिल्या .

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज येथील अग्रसेन चौकातील श्री गणेश इन येथे जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्यापारी महासंघ, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, कार्याध्यक्ष वसंत भट्ट, हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले, व्यापारी महासंघाचे अनिल नैनवाणी, दिलीप चव्हाण, गजेंद्र बियाणी, सुमित चौधरी, माहिती सहायक  चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक आशाताई बंडगर, पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, सध्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. पाझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणे प्रलंबित असलेले एक लाख नागरिक आहेत. त्या सर्वांनी लवकरात लवकर दुसरा डोस घेऊन स्वत:ला संरक्षित करावे. कोरोनाच्या नियमाचे सर्वांनी पालन करावे, मास्कचा वापर करुन सुरक्षित रहावे, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

 


पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 :  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माहिती सहायक  चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक आशाताई बंडगर, लिपिक कैलास लांडगे, चंद्रकांत गोधने आदी उपस्थित होते.

****

05 January, 2022

 

महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुद्याबाबत

हरकती, सूचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक  संबंध संहिता 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये 3 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. हा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली  प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसाच्या आत हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त,  महाराष्ट्र राज्य, कामगार भवन,       सी-20, ब्लॉक-ई, वांद्रा कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com या ई-मेल वर स्वीकारण्यात येतील.

या अधिसूचनेवर नमूद केलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेकडून आक्षेप किंवा सूचना मागविण्यात आल्या आहेत. जे प्राप्त होणारे आक्षेप किंवा सूचना राज्य शासनामार्फत विचारात घेण्यात येतील, असे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

****

 

पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या गोळीबार सरावासाठी

मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 01 जानेवारी ते 15 जानेवारी, 2022 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्र.12, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील गटातील ए व बी कंपनीतील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना नक्षल बंदोबस्त गोळीबाराचा सराव व वार्षिक शिट रिमार्क गोळीबार सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी

 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी

 

हिंगोली, दि.5 (जिमाका):- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे.

            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने शासनाच्या WWW.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या  dgipr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन , जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

 

लोकाभिमुख प्रशासन

 

विशेष लेख क्र. 9                                                                             दिनांक : 5  जानेवारी, 2022

 

लोकाभिमुख प्रशासन

 

 

हिंगोली, दि.5 (जिमाका) : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे होत आहेत. जवळपास पावणेदोन वर्षां पासून अस्मानी संकट आणि कोविड-19 या आपत्तींशी लढा देत प्राधान्याने आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत. गेले काही महिने प्रशासन न थकता अविरत काम करत आहे.महसूल प्रशासन लोकाभिमुख   गतिमान करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत.

 

                                                                                         बाळासाहेब थोरात

                                                                                 मंत्री, महसूल

राज्याच्या विकासात आजपर्यंत महसूल विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून, या पुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवण्यात पुढे राहील. काही महिन्यां पूर्वी रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि या मध्ये मोठी  जीवितहानी  झाली. या आपत्ति काळात महसूल यंत्रणा अहोरात्र काम करत होती. या काळात नुकसानीचे पंचनामे करण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कृती दलाबरोबर आवश्यक तो समन्वय साधणे, आपत्तिग्रस्तांसाठी तात्पुरत्या सुविधा निर्माण करणे, साथीचे रोग या काळात पसरू नये याची काळजी घेणे अशी अनेक कामे महसूल विभाग करत असतो.

घरपोचमोफतसातबारा

महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व शेतकर्‍यांना घरी जाऊन सातबारा उतारे देणे, फेरफार निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे, फेरफार अदालतींचे आयोजन करणे, भू-संपादनाची गाव पातळी वरील पत्रके अद्ययावत करणे या सह आठ बाबींचा समावेश करण्यात आला आहे. जमीन धारण करताना सुधारित नमुन्यातील मोफत सातबारा घरपोच वाटप करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या नुसार राज्यातील तीन कोटी शेतकरी खातेदारांना मोफत सातबारा मिळणार आहे. सातबारा संगणकीकरण करण्याच्या ई-फेरफार प्रकल्पामध्ये राज्यातील अडीच कोटीं हून अधिक सातबारांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. मोफत सातबारा वितरण मोहिमेमुळे राज्यातील सर्वच खातेदारांना त्यांचा संगणकीकृत सातबारा घरपोच मिळणार आहे.

 

राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना

या योजनेंतर्गत राज्यात महिलेच्या नावावर सदनिका/ घर / प्लॅट / रो-हाऊस / बंगला खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्क्याची  सवलत  देण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिलांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यास हात भार लागणार आहे.

ई-पीकपाहणी

महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या 7/12 वर जलद व सुलभरीतीने पीक पाहणी नोंदवण्यात खातेदारांचा प्रत्यक्ष सहभाग शक्य करणारी ई-पीक पाहणी सुविधा 15 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत 85 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी केली आहे.

सुधारितनमुना

शेतजमीन  व शेतजमीन विषयक कागदपत्रे आजही सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गाव नमुना नं. 7 हा या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा नमुना आहे. जमिनीच्या नोंदींमुळे उद्भवणारे वाद-विवाद कमी करण्याच्या दृष्टीने या नमुन्यात सुधारणा करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने हा नमुना सुधारित करण्यात आलेला असून त्यामुळे हा नमुना अधिक सुटसुटीत, सुलभ व पारदर्शक झाला आहे. हा नमुना वाचताना व समजून घेताना सुलभता येऊन माहितीचे आकलन न झाल्याने निर्माण होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे. हा नमुना ऑनलाईन उपलब्ध होणार असून त्यावर असणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या लोगो व वॉटर मार्कमुळे या नुमन्याच्या प्रतींचा खरेपणा सिद्ध होणार आहे. त्यामुळेबनावट कागद पत्रांमुळे होणारी  फसवणूक टाळता येणारआहे.

डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा

महाभूमी पोर्टलवर उपलब्ध संगणकीकृत अभिलेखापैकी 8-अ हा संबंधितांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा सोबत आवश्यक असल्यामुळे सदर खाते उतारा देखील तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.सध्या हा डिजिटल स्वाक्षरीत 8-अ सर्व सामान्य जनतेला महा भूमीपोर्टल वरून (ही:// वळसळींर श्रीरींलरीर .रहरल र्हीळ.र्सेीं.ळप/ऊडङठ) सदरची नक्कल रुपये 15/- प्रत्येकी ऑनलाईन शुल्क भरून डाऊनलोड करण्यासाठी  उपलब्ध आहे.

 

मुद्रांक शुल्कात दिलासा

मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग आणि शिवडी येथील मुंबई विकास विभागाच्या (बीडीडी) एकूण 207 चाळीं मधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृह निर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत रहिवाशांना निवासी युनिट देण्यात येणार आहेत. या रहिवाशांना आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क कमी करून केवळ 1 हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे बीडीडी चाळीत राहणार्‍या रहिवाशांना स्वत:चे घर मिळवण्याचे  स्वप्न पूर्ण करण्यात मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आजी-माजी सैनिकांना सवलत

आजी / माजी सैनिकांना शासकीय जमीन प्रदान करण्या संदर्भात उत्पन्नाची विहीत वार्षिक मर्यादा यापूर्वी एक लाख रुपये एवढी होती. ही आर्थिक मर्यादा अत्यंत जुनी होती. दरम्यानच्या काळात आजी – माजी सैनिकांच्या वेतनात व निवृत्ति वेतनात झालेल्या वाढीमुळे आजी – माजी सैनिकांना शासकीय जमीन प्रदान करताना अडचणी निर्माण होत होत्या. या बाबींचा विचार करून आजी-माजी सैनिकांना शासकीय जमीन प्रदान करण्या संदर्भात उत्पन्नाची  विहित  वार्षिक मर्यादा आठ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

लीव्ह अ‍ॅण्ड लायसन्स प्रक्रियेत सुलभता

शासकीय जमिनीवरील सहकारी गृह निर्माण संस्थां मधील सदनिका लीव्ह अ‍ॅण्ड लायसन्सच्या कराराने वापरण्यास दिल्यामुळे संबंधित सदनिकेच्या मालकीचे तसेच भाडेपट्ट्याचे हस्तांतरण होत नाही. अशा लीव्ह अ‍ॅण्ड लायसन्सच्या करारामुळे केवळ संबंधित सदनिकेच्या वापराचा अधिकार संबंधित व्यक्तीला दिला जातो. यास्तव, शासकीय जमिनींवरील सहकारी गृह निर्माण संस्थांमधील सदनिका लीव्ह अ‍ॅण्ड लायसन्स या तत्त्वावर वापरण्यासाठी देताना, जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक नाही, किंवा त्यांना याबाबत अवगत करण्याची गरज नाही, तसेच याकरिता कोणतीही अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याची अथवा वसूल करण्याची गरज नाही. असे स्पष्टीकरणात्मक दिशानिर्देश क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आले. त्यामुळे सदनिका लीव्ह अ‍ॅण्ड लायसन्स तत्त्वावर देण्याच्या प्रक्रिये मध्ये सुलभता आली.

दस्त ऐवजांसाठीच्या कमाल मर्यादेत वाढ

राज्यातील कंपनी एकत्रीकरण किंवा पुनर्रचने संदर्भातील दस्तऐवजांवर देय असलेल्या मुद्रांक शुल्कासाठी 2002 पासून 25 कोटी रुपये इतकी कमाल मर्यादा विहित केली होती. ही मर्यादा विहित करून सुमारे 18 वर्षांचा कालावधी झाला आहे. दरम्यानच्या काळात कंपन्यांच्या मालमत्तेचे व भागांचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही कमाल मर्यादा आता 25 कोटी रुपयांवरून 50 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार आहे. या बदलामुळे 1 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत कोविड-19 मुळे लॉकडाऊन असतानाही राज्य शासनास 155 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

कृषी विज्ञान संकुलासाठी जमीन

राज्याच्या दृष्टीने कृषी व कृषी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठास मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुल स्थापन करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 250 हेक्टर जमीन प्रदान केली आहे.

मुद्रांक शुल्क कपात

कोविड-19

महामारीच्या काळात राज्याच्या अर्थ व्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम या निर्णयाने केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था करामध्ये देखील 100 टक्के सवलत दिल्याने सर्व सामान्य, शेतकरी वर्गयांच्या सहघर आणि स्थावर मालमत्ता खरेदी करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे. या कालावधीत राज्यातील  दस्तनोंदणीत लक्षणीय अशी 39 टक्क्यांनी वाढली आहे. 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन टक्क्याने आणि उर्वरित महाराष्ट्र राज्यात दोन टक्क्याने मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली आहे.ही सूट मुळ मुद्रांक शुल्काच्या 50 टक्के आहे. 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधी करिता मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन टक्क्याने आणि उर्वरित महाराष्ट्र राज्यात दीड टक्क्याने मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली. या निर्णयामुळे खरेदी विक्री व्यवहारात गेल्यावर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 39 टक्के एवढी भरघोस वाढ झालेली आहे. या व्यवहारांमुळे शासनास 1 सप्टेंबर 2020 ते 19 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4693.07 कोटी रुपये एवढा महसूल प्राप्त झालेला आहे.संकटातून संधी निर्माण करत आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा कायम राखेल आणि नवीन वर्षात सर्व सामान्यांसाठी अधिक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आघाडीवर असेल, या बद्दल मला विश्वास वाटतो.

 

शब्दांकन :वर्षा फडके-आंधळे,

                                                                                                            विभागीय संपर्क अधिकारी

 

*****