01 July, 2022

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे

बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

हिंगोली (जिमाका),  दि. 01 :  प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी  करण्यासाठी  विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मे, 2022  पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

सद्यस्थितीत दि. 2 जून, 2022 अखेर राज्यातील आधार प्रमाणित 106.68 लाख लाभार्थ्यांपैकी 57.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 49.14 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता दि. 31 जुलै, 2022 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  

प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ई-केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

******

 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान, बिजभांडवल योजनेसाठी

कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 20 लाभार्थी व बीज भांडवल योजनेअंतर्गत 16 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात दि. 1 जुलै ते 31 जुलै,2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे स्वीकारले जातील. 

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत वरील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत. 

लाभार्थ्यांनी कर्ज प्रस्ताव अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरण राउत यांनी केले आहे.

*****

 

जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप क्रीडा स्पर्धेचे

12 व 13 जुलै रोजी आयोजन

 

                हिंगोली (जिमाका), दि. 01 :  सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस् एजन्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली व्दारा सन 2022-23 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 61 व्या आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप (सबज्युनिअर / ज्युनिअर) क्रीडा स्पर्धेचे दि. 01 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे.

येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2022-23 या वर्षात जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल कप स्पर्धेचे आयोजन आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे दिनांक 12 व 13 जुलै, 2022 रोजी करण्यात आले आहे. जे संघ सुब्रतो मुखर्जी फुटबॅाल स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर दि. 09 जुलै, 2022 पर्यंत खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 14 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म दि. 04 जानेवारी, 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्यूनिअर) या वयोगटातील खेळाडूंचा जन्म दि. 01 जानेवारी, 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील खेळाडू व संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  कलीमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.

******

 

बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बकरी ईद हा मुस्लीम धर्मियांचा सण साजरा होणार आहे. बकरी ईद या सणानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्‍त लावण्यात येतो. परंतु या सणाचे काळात शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशा अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते.

त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 10 जुलै, 2022 रोजी उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सर्व 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे. 

वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची , हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिता वडवळकर, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसील तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जीवक कांबळे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 10 जुलै, 2022 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.                                                

*****

 जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 01 :  जिल्ह्यात  नागरिकांच्या वतीने, विविध धार्मिक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच शेतकरी संघटना, केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ भरतीपूर्वी प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने, सद्यस्थितीत राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने विविध पक्ष, संघटना त्यांच्या मागणी संदर्भाने समर्थनार्थ अथवा विरोध प्रकट करण्यासाठी  मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे  तसेच इतर प्रकारच्या निषेध आंदोलने करीत आहेत. तसेच दि. 10 जुलै, 2022 रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी येत आहे. दि. 13 जुलै, 2022 रोजी गुरु पोर्णिमा आहे. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 01 जुलै, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 15 जुलै, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

**** 

 

कृषि दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

·   जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘मियावाकी’ पध्दतीने होणार 12 हजार वृक्षाची लागवड

 




हिंगोली (जिमाका), दि. 01 : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘मियावाकी’ पध्दतीने 12 हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीमुळे परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे सुशोभिकरण व्हावे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.    

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंगोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने घनवन वृक्ष लागवड करुन करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची चळवळ ही संपूर्ण जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.

या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच येथील नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

****

 

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रंजना कोठाळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

******