05 September, 2022

गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी, ख्रिसमस व 31 डिसेंबर या दिवसासाठी

ध्वनीची विहित मर्यादा राखून वेळेची सवलत जाहीर

 

             हिंगोली (जिमाका), दि. 05 : ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व  ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6.00 वाजल्यापासून  ते रात्रीचे 12.00 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी  संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने प्राधिकृत केले आहे.

            तसेच सन 2022 या वर्षासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या 15 दिवसांपैकी आतापर्यंत 5 दिवसांची सूट राज्यभर उपयोगात आलेली असल्याने  सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी उत्सव कालावधी लक्षात घेता सन 2022 साठी उरलेले 10 दिवस घोषित करण्याबाबत सूचित केले आहे.

            त्यामुळे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आगामी उत्सव कालावधी लक्षात घेता गणेशोत्सव दुसरा व पाचवा दिवस, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी (दि. 9 सप्टेंबर, 2022), नवरात्री उत्सव दोन दिवस (दि. 29 सप्टेंबर, 2022 व 05 ऑक्टोबर, 2022),  दिवाळी  एक दिवस (दि. 24 ऑक्टोबर, 2022), ख्रिसमस एक दिवस (25 डिसेंबर, 2022) व  31 डिसेंबर एक दिवस (31 डिसेंबर, 2022) अशा उरलेल्या एकूण 10 दिवसासाठी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजल्यापासून रात्री 12.00 वाजेपर्यंत वेळेची सवलत हिंगोली जिल्ह्यासाठी निश्चित करुन जाहीर केले आहेत.

            या आदेशाची अंमलबजावणी या जिल्ह्याच्या हद्दीपुरती मर्यादित राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. 

**** 

 

केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : केंद्रशासनाच्या पत्रान्वये उप सचिव, भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांसाठी), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जून अवार्ड-2022 च्या पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 20 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्रशासनास सादर करावा. तसेच विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे नमुद केलेले आहे. तसेच या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांना स्वतः फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास dbtyas-sports.gov.in   या संकेतस्थळावर सादर करावे, असे सुचित केले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section-sp4-moyas@gov.in, किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करता येईल, तसेच केंद्रशासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहित नमुना अर्ज http://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, क्रीडा शिक्षकांनी वरील संकेतस्थळावरील नियमावली व विहित अर्जाचा नमुन्याचे अवलोकन करुन मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळोमध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठासाठी), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जून अवार्ड-2022 साठी नामांकने दि. 20 सप्टेंबर, 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 755 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 8.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 755.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 87.85  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 05 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 9.30 (799) मि.मी., कळमनुरी 3.80 (827.70) मि.मी., वसमत 6.20 (738.30) मि.मी., औंढा नागनाथ 16.60 (722.30) मि.मी, सेनगांव 7.90 (674.70) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 755.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

04 September, 2022

 

प्रत्येक कुटुंबांनी लखपती होण्यासाठी मग्रारोहयोची मदत घ्यावी

-- अपर मुख्य सचिव नंदकुमार

 




हिंगोली (जिमाका), दि. 04 : प्रत्येक कुटुंबाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काम देता येणार असून आपल्या कौशल्यानुसार आवश्यक ती कामाची मागणी नोंदवावी आणि प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी मग्रारोहयोची मदत घ्यावी. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःची प्रगती करावी, असे आवाहन अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले आहे.

हिंगोली तालुक्यातील दिग्रस वाणी येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमात गाव सभेमध्ये अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चित्राताई कुर्हे होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड,  शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, तालुका कृषी अधिकारी बालाजी गाडगे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन मत्ता निर्मिती करावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास विविध यंत्रणांचे अधिकारी, मंडळ अधिकारी सय्यद अयुब, तलाठी वामन राठोड, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी भोजे यांनी केले आहे.

*******

03 September, 2022

 

राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 03 : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी समाजामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पोषण आदीबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील 1 ते 30 सप्टेंबर, 2022 या कालावधीत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या पूर्व शालेय शिक्षण, आहार विषयक जनजागृती, स्वस्थ बालक स्पर्धा या संकल्पनावर आधारित राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येणार आहे.

            त्यादृष्टीने गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतीला पोषणमाह मधील उपक्रमांचा मुख्य आधार / कणा बनवून जनआंदोलनात लोकसहभागात रुपांतर करणे तसेच ग्रामपंचायती व ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषणासाठी लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने कार्य करणे अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण माह अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत विविध उपक्रम व बालक बालिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने माहे सप्टेंबर 2022 हा महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा करण्यासाठी केंद्र शासनाने कळविल्यानुसार दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, 2022 या कालावधीत पोषण रॅली, गणेशोत्सव देखाव्यामध्ये बॅनर लावणे, पोषण वाटिका तयार करणे, स्क्रिनिंग राबविणे, घरोघरी योग-कुटुंबासोबत योग अभियान, गरोदर स्त्रियांची ॲनिमिया तपासणी, पूरक पोषण आहाराबाबत माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करणे, गरोदर स्तनदा, 6 वर्षाखालील बालकांसाठी व किशोरी मुलींसाठी ॲनिमिया चेक अप कॅम्प आयोजित करणे, आहाराबाबत समुपदेशन व प्रात्यक्षिके आयोजित करणे, पाणी व स्वच्छतेच्या अभावाने होणारे आजार याबाबत मार्गदर्शन, कुपोषण रोखण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन, हात धुणे व वैयक्तीक स्वच्छता, पोष्टिक आहार पाककृती प्रदर्शन, जिवनशैली बदलांच्या अनुषंगाने आजारापासून बचावाबाबत मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीसंदर्भात मार्गदर्शन, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी स्तनपान संदर्भात मार्गदर्शन शिबीर,शाळा आधारित कार्यक्रमाचे आयोजन, स्वस्थ बालक स्पर्धा , मुलींच्या जन्माचे स्वागत , महिला बचत गटाची सभा, गृहभेटी, लसीकरण आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय पोषण अभियान अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी, अंगणवाडी ताई, मदतनीस आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी केले आहे.

****

 

लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष

लंपी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच पशुपालकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

                हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्यात सन 2022-23 मध्ये जळगाव, अकोला, पुणे, नगर, औरंगाबाद, लातूर व बीड जिल्हयात गाय व म्हैस वर्गीय जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात लंपी चर्म रोगास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

                लंपी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गाई व म्हशीमध्ये आढळून येतो. सर्व वयोगटातील नर व मादी जांनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. उष्ण व दमट हवामान (कीटकांची वाढ जास्त प्रमाणात ) रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावर अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. वेळीच उपाययोजना नाही केल्यास मरतुक होते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा (स्टोमोकसिस ) , डास (एडीस), गोचीड, चिलटे (क्यूलीक्वाईड्स) यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होतो. बाधित जनावरामध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2-5 आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. सुरुवातीस भरपूर ताप येतो. चारा खाणे, पानी पिणे बंद होते. त्वचेवर हळूहळू 10-15 मिमी व्यासाच्या गाठी येतात. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह व स्तनदाह आजाराची बाधा पशुमध्ये होऊ शकते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. तापीच्या कालावधीमध्येच जनावरास उपचार होणे अत्यावश्यक आहे.

                या आजाराच्या प्रभावी रोग नियंत्रणासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. कीटकनाशक औषधीचा जनावरांच्या अंगावर व गोठ्यात फवारा मारावा. बाधित जनावरास वेगळे ठेवावे, त्याचा निरोगी जनावराशी संपर्क येऊ देऊ नये. प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने-आण, वाहतूक बंदी आणावी. तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवावेत.

                लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व शंकाचे निरसन करणे यासाठी जिल्हास्तरीय  नियंत्रण कक्ष, तसेच तालुक्यामध्ये पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती सर्व तालुके यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

                जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये संपर्कासाठी सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.दिनेश टाकळीकर (मो. 9881480083), पशुधन विकास अधिकारी डॉ.जी.जे. खान (मो. 9922722994), पशुधन विकास अधिकारी डॉ.सिध्दार्थ इंगोले (मो.9960034358) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

                तालुकास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये हिंगोली तालुक्यासाठी डॉ.सिध्दार्थ इंगोले, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो.9960034358) यांची, वसमत तालुक्यासाठी डॉ. संजय सावंत, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9552767896), कळमनुरी तालुक्यासाठी डॉ.नंदकिशोर जाधव, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9960784664), औंढा नागनाथ तालुक्यासाठी डॉ.संदीप नरवाडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9595758512) व सेनगाव तालुक्यासाठी डॉ.संजय सावंत, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9552767896) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

                लंपी स्कीन या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश्वर कदम यांनी केले आहे.

****

 

प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी

7 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

 

            हिंगोली (जिमाका), दि. 03 : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया 7 सप्टेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीत ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.

त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर (website) जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा पीएम किसान (pmkisan) मोबाईल ॲपमध्ये OTP द्वारे मोफत ई-केवायसी करता येईल किंवा नजिकच्या सीएससी (CSC) केंद्राशी संपर्क साधून आपली ई-केवायसी तात्काळ करुन घ्यावी. ई-केवायसी करण्यासाठी https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx ही लिंक दिली आहे.

अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी  तसेच तलाठी आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,  हिंगोली  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

 

****