28 July, 2023

 खरीप हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 

राज्यांतर्गत पिकस्पर्धेचे आयोजन 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत  प्रोत्साहन देऊन गौरव  केल्यास त्यांचे  मनोबल  वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील.  

स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर)  क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची  आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : 

विहित नमुन्यातील अर्जासोबत (प्रपत्र-अ)  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),  पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. 

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरुप : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे बक्षीस 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये आहे. 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. 

*****

26 July, 2023

 

आरओ इलेक्ट्रीशियन ॲन्ड मेंटेनन्स या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

4 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने हिंगोली तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतीसाठी आरओ इलेक्ट्रीशियन ॲन्ड मेंटेनन्स या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 8 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 4 ऑगस्ट, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

*****

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचे

दि. 27 जुलै रोजी पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

वेबकास्ट लिंकचा वापर करुन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे.

दिनांक 27 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजन (PMKISAN) अंतर्गत चौदाव्या हप्त्यातील (एप्रिल, 2023 ते जुलै, 2023) देय्य लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे. या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर,  केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या समारंभामध्ये कृषि विज्ञान केंद्रावर (KVK) https://pmindiawebcast.nic.in या लिंक चा वापर करुन परिसरातील शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी https://pmevents.ncog.gov.in या वेबकास्ट लिंकचाही वापर करता येईल. या कार्यक्रमास राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल वरुन ऑनलाईन सहभागी व्हावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौदाव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे . 

माहे फेब्रुवारी, 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत दिनांक 25 जुलै, 2023 अखेर 110.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 23731.81 कोटी रक्कमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे.

दि. 27 जुलै, 2023 रोजीच्या समारंभात दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 जुलै, 2023 या कालावधीकरिता देय्य चौदाव्याप्त्यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकू85.66 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण 1866.40 कोटी रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. खरीप, 2023 हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी चौदाव्या हप्त्याचा हा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरुन कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.  

या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 88.92 लाख लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थी यांनी PM KISAN योजनेचा लाभ जमा होण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी संबंधित बँकेत जाऊन आवश्यक अर्ज बँकेत सादर करुन आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

****

 

खरीप हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी

राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत  प्रोत्साहन देऊन गौरव  केल्यास त्यांचे  मनोबल  वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :

·         पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे.

·         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. 

·         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

·         पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर)  क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

·         पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची  आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

विहित नमुन्यातील अर्जासोबत (प्रपत्र-अ)  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),  पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरु : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये, तिसरे 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे बक्षीस 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये आहे.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन सुनील चव्हाण, आयुक्त कृषी यांनी केले आहे.

*****

 

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाची ट्रुप कॅरिअर वाहन लिलावाद्वारे विक्रीसाठी

निविदा सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे शासकीय वाहन ट्रुप कॅरिअर क्रमांक एमएच-01-एल-5832 मॉडेल-सन 2008 या वाहनाची जाहीर निविदा मागवून विक्री करण्यात येणार आहे.  इच्छुकांना हे वाहन जुने पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली आहे त्या स्थितीत सकाळी 10.45 ते सांय. 6.45 या वेळेत पाहता येईल. निविदा धारकांनी वाहनाची पाहणी केल्यानंतर अपेक्षित मूल्य आपल्या निविदेत नमूद करावी. निविदा पाठवितांना पॉकेट सिलबंद असावे. त्या सिलंबद पॉकिटावर सुवाच्च हस्ताक्षरात गाडीची निविदा तसेच पाठविणाऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा. अपूर्ण निविदा पाठविण्यात येऊ नये.

निविदा स्वीकारणे, नाकारणे, रद्द करणे, मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार लिलाव समितीचे अध्यक्षांनी राखून ठेवला आहे. प्राप्त निविदा समिती समक्ष उघडण्यात येतील. निविदा वर्तमानपत्रात बातमी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत जिल्हा समादेशक होमगार्ड, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली या पत्त्यावर पोहचतील या बेताने पाठविण्यात याव्यात. जी निविदा मंजूर झालेली आहे त्यांच्या पत्यावर कळविण्यात येईल. यासाठी पत्रव्यवहार करण्यात येऊ नये, असे जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

*****

 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 365 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 364.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 45.87 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 26 जुलै, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 5.20 (425) मि.मी., कळमनुरी 3.80 (388.20) मि.मी., वसमत 16.30 (340.10) मि.मी., औंढा नागनाथ 34 (382.50) मि.मी, सेनगांव 13.20 (289.60) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 364.80 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

माजी सैनिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 




 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केले.   

यावेळी  बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, कारगील युध्दात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कारगील दिवसा साजरा करण्यात येत असल्याचे सांगून माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे सांगितले. तसेच येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य शिबीर घेऊन जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश आग्रेकर, सहायक नियोजन अधिकारी  सुधाकर जाधव, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, माजी सैनिक बसरुध्दीन शेख, बी.बी.चव्हाण, दत्तराव लेकुळे, अरविंद कुलकर्णी, केशव भडंगे, जी.एम. पाटील, आनंदराव पडघन, रमेश इंगोले, केशव जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुरेश भालेराव, कल्याण संघटक उत्तमराम लेकुळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली. तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*****