25 August, 2023

 वार्षिक कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष आज्ञावलीमध्ये

माहिती नोंदविण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2023 तयार करण्याचे काम  जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरु आहे.  जिल्ह्यातील  सर्व  राज्य  शासकीय  कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दि. 01 जुलै 2023 या संदर्भ दिनांकास अनुसरुन माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे बंधनकारक आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahades.maharashtra.gov.in/CGE या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची माहिती अद्ययावत करावयाची आहे.  ही माहिती ऑनलाईन आज्ञावलीत नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली यांचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर, 2023 ची वेतन देयके कोषागार कार्यालयामार्फत स्वीकारण्यात येणार नाहीत. याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एस. एम. रचावाड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 

अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नये

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : शेजारच्या गुजरात राज्याकडून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात , कररहीत स्वरुपात महाराष्ट्र राज्यात विकले जात आहे. त्यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक , दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होत आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महसूल सुध्दा बुडत आहे, अशी तक्रार प्राप्त झाली असल्याचे राज्याचे नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कळविले आहे.

तसेच चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्याची सुध्दा राज्यात कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या वजन काट्यांना राज्य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. हे वजन काटे अप्रमाणित असल्याने ग्राहक हित हानी होत आहे. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टीकर लावून त्यांची विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूलावर परिणाम होत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वजन काटे उपयोगकर्त्यांनी अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नये, असे आवाहन उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, परभणी व हिंगोली जिल्हा यांनी केले आहे.

****

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार दि. 29 ऑगस्ट, 2023 हा दिवस हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्या येतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने दि. 29 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मैदानी क्रीडा स्पर्धा या हिंगोली तालुका क्रीडा संकुलावर तर बॅडमिंटन व कुस्ती स्पर्धा या जिल्हा क्रीडा संकलामध्ये घेण्यात येणार आहेत. मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी संपर्क प्रमुख म्हणून क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, बॅडमिंटन स्पर्धेसाठी संपर्क प्रमुख म्हणून क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, कुस्ती स्पर्धेसाठी खेलो इंडिया सेंटरचे प्रशिक्षक नफीस पैलवान हे काम पाहणार आहेत.

वरील कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन क्रीडा दिन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी आपली प्रवेशिका दि. 28 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.

****

 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषि पायाभूत निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी

जवळा बाजार येथील कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील स्वस्तिक फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी पायाभूत निधी (AIF) योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रचार-प्रसार व लाभार्थी नोंदणीसाठी कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अंमलबजावणी  नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, मूल्य साखळी तज्ञ गणेश कच्छवे, MIS तज्ञ बालाजी मोडे, CBO संचालक मंगेश बुलाके यांनी कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) योजने अंतर्गत वेब पोर्टलवर अर्ज कसा करावा, कोणत्या व्यवसायासाठी लाभ घेता येतो याची माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 3 टक्के व्याज सवलतीचा लाभ कसा मिळतो याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.          

या कार्यशाळेसाठी उपस्थित स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे  अध्यक्ष नारायण बुलाखे, सभासद शेतकरी मोहन दशरथे, शकुराव कदम, मारोती अस्वार, मारोती चव्हाण, नारायण बुलाखे, संभाजी चव्हाण आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

****

 

शासनाने दिलेल्या आराखड्यानुसार

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी अभियान प्रभावीपणे राबवावा

-- उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीद लोकांची आठवण म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शासनाने जिल्हानिहाय कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून दिली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून व योग्य नियोजन करुन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी  यावेळी दिल्या.  

            मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 25 ऑगस्ट, 2023 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुशिल आग्रेकर, सहायक नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. मंगेश टेहरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. पोत्रे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेश एडके, सर्व गटविकास अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी श्री. मोरे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नाटिका, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करुन मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. तसेच आयोजित कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांला बोलावून त्यांचा सन्मान करावा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर्शनी बोर्ड तयार करावेत. तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे फलक लावावेत. ज्येष्ठ नागरिंकाची आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. यासाठी सर्व विभागांनी आपण राबवित असलेल्या कार्यक्रमाचा आराखडा सादर करावा, अशा सूचनाही उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी दिल्या .  

*******

24 August, 2023

 हिंगोली तालुका कोतवाल पदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरण सुरु

 

हिंगोली (जिमाका),  दि. 24 : हिंगोली  तालुक्यातील कोतवाल पदभरती 2023 करिता लेखी परीक्षा दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार असून त्यासाठीचे प्रवेशपत्र वितरण प्रक्रिया सुरु आहे. ज्या उमेदवारांना अद्याप लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नाही त्यांना दि. 24 ऑगस्ट व 25 ऑगस्ट, 2023 या दिवशी तहसील कार्यालय हिंगोली येथे प्रवेश पत्र वितरित करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या https://hingoli.nic.in अधिकृत वेबसाईटवर देखील प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आले असून उमेदवारांना या वेबसाईटवरुन ते डाऊनलोड करुन घेता येतील, असे तहसीलदार, हिंगोली यांनी कळविले आहे.  

*****  

 

कोतवाल भरती परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत कोतवाल भरती परीक्षा-2023 ही हिंगोली जिल्हा मुख्यालयी दि.27 ऑगस्ट,2023 रोजी स. 11.00 ते दु. 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे.

            ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-अ, आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-ब, पोदार इंटर नॅशनल  स्कूल अकोला रोड, हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल शास्त्रीनगर हिंगोली, शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा एमआयडीसी, हिंगोली,  जिल्हा परिषद कन्या प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, श्री संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय अकोला रोड हिंगोली, कै.बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अकोला रोड हिंगोली, अनुसया मंदिर खकाळी बायपास हिंगोली, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र अकोला रोड हिंगोली या 12 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या 12 केंद्रावर 2 हजार 621 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

हिंगोली उपविभागातील वरील परीक्षा केंद्र परिसरात दि. 27 ऑगस्ट, 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****