03 November, 2023

 

अल्पसंख्यांक समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनी शासकीय वस्तीगृहाताचा लाभ घ्यावा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : वसमत येथे उपलब्ध असलेल्या शासकीय अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहामध्ये सन 2023-24 या वर्षाकरिता प्रवेश देणे चालू आहे. या वस्तीगृहामध्ये वसमत व परिसरातील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्रता धारक सर्व गरजू मुलींसाठी 70 टक्के व इतर समाजातील 30 टक्के प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.

या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी शासनाने भोजन भत्ता सुद्धा देऊ केलेले आहे. वसतिगृहातील प्रवेशासाठी व इतर माहितीसाठी संस्थेतील गणित चित्रकला निदेशक डी. के. बुंदेले संपर्क क्र. 8421685623 यांच्याशी सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.30 पर्यंत संपर्क साधून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत जि.हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव यांनी केले आहे.

*****

02 November, 2023

 



कुणबी जातीच्या पहिल्या प्रमाणपत्राचे

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वितरण

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : कुणबी जातीच्या पहिल्या प्रमाणपत्राचे हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील सुनील रामचंद्र गायकवाड यांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार नवनाथ वगवाड  यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जुन्या निजामकालीन नोंदीची तपासणी केली असता सन 1882 ते 1890 च्या कालावधीतील 3 हजार 30 नोंदी सापडलेल्या आहेत. या सर्व नोंदीची स्कॅनिंग करून जिल्ह्यातील मराठा कुणबी समाजातील नागरिकांसाठी जिल्ह्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या नोंदीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करून जात प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील बांधवांनी  कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

*****

 

01 November, 2023

 

औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतीसाठी

फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

6 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

  

हिंगोली, (जिमाका) दि. 01  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने विशेष घटक योजनेंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील युवक, युवतीसाठी फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 08 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 06 नोव्हेंबर, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

***** 

 

समान व असमान निधी योजनांसाठी

शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी. अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात.

सन 2023-24 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.

समान निधी योजना (Matching Schemes ) सन 2023-24 : 1) इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना 25 लाख रुपये देय आहे. या योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.

        असमान निधी योजना (Non Matching Schemes)  सन 2022-23 :  1) ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी  अर्थसहाय्य देय आहे. फर्निचर खरेदीसाठी 4 लाख रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रुपये अनुदान देय आहे. 2) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान "ज्ञान कोपरा’’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य 2.50 लाख व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणसाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. 3) महोत्सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125, 150 वर्ष साजरे करण्यासाठी 6.20 लाख रुपये अर्थसहाय्य व इमारत विस्तारासाठी 10 लाख रुपये अनुदान देय आहे. 4) राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी 1.50 लाख, 2.50 लाख, 3 लाख याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 5) बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन’’ करण्यासाठी 6.80 लाख रुपये अर्थसहाय्य

अनुज्ञेय आहे.

उपरोक्त योजनेसाठी करावयाचा अर्ज :- वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर, 2023 पर्यत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन दत्तात्रेय आ. क्षीरसागर, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.

 

****  

 

मराठा आरक्षण आंदोलन कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी

 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  जिल्ह्यात दि. 25 ऑक्टोबर, 2023 पासून सकल  मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी विविध ठिकाणी उपोषण, साखळी उपोषण, रॅली, निवेदन व इतर विविध प्रकारची आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात येतो. परंतु आंदोलनाच्या काळात शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते.

अशाप्रकारे अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता आहे. 

त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 25 ऑक्टोबर, 2023 ते मराठा आरक्षण आंदोलन कालावधी पर्यंतच्या काळात उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे. 

हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी,  नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार नकुल पोळेकर, वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विठ्ठल परळीकर यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सखाराम मांडवगडे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 25 ऑक्टोबर ते मराठा आरक्षण आंदोलन काळात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत. 

*****

 

31 October, 2023

 

महास्वयंम वेबपोर्टलवरील नोंदणी असलेल्या आस्थापनांनी

प्रोफाईल अद्यावत करण्याचे आवाहन

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 31 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत www.mahaswayam.gov.in या महास्वयंम् वेबपोर्टलवर मान्यता प्राप्त नोंदणीकृत खाजगी आस्थापनांची आयुक्तालयाच्या रोजगार पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवारी सुरु आहे. उद्योजक, नियोक्ते यांचा डाटा एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना उद्योजक, नियोक्ते यांचा डाटा एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असतांना उद्योजक, नियोक्ते यांच्या डाटामध्ये इंडस्ट्री सेक्टर, फर्स्ट नेम, नेचर ऑफ वर्क आयडी, ऑर्ग्नायझेशन पॅन/टॅन, सीटी आयडी, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याबाबत तांत्रिक तंत्रज्ञ, महास्वयम वेबपोर्टल यांनी कळविले आहे. याबाबतची  बहुतांश उद्योजक, नियोक्ते यांची अपूर्ण माहिती असल्याने एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना अडचण येत आहे.

            आपणास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाने दिलेल्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या आस्थापनाची माहिती अद्यावत, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

            या वेबपोर्टलबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, हिंगोली यांच्या मो. क्र. 7385924589 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****