17 March, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षाची स्थापना

• जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्ष व त्यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन हिंगोली (जिमाका), दि. 17 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षाचे व महसूल विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, तहसीलदार आश्विनकुमार माने यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षामार्फत आपले सरकार सेवा केंद्र तसेच आरटीएसवर प्राप्त अर्जाचा नियमित आढावा घेऊन संबंधित विभागाकडून प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी तसेच त्यांनी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्ष व महसूल विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाची पाहणी करुन योग्य त्या सूचना केल्या. ******

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : देशातील युवकांना कंपनी, आस्थापनेमध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या योजनेंतर्गत विविध शासकीय मंत्रालये, विभाग व सार्वजनिक क्षेत्रातील उमक्रमामध्ये इंटर्नशिपासाठी अर्ज स्वीकारले जातात. इंटर्नशिप मोहिमेचा कालावधी साधारणपणे 12 महिन्यापर्यंत असतो. या कालावधीत इंटर्न्सना त्यांच्या कामाच्या क्षेत्राशी संबंधित विविध कार्ये पार पाडायला दिली जातात. यामुळे ते प्रत्यक्ष शासनाच्या कार्यपध्दती, धोरण आणि विकास योजनांबद्दल सखोल ज्ञान मिळवू शकतात. यासाठी उमेदवार हा 21 ते 24 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. उमेदवारांने किमान दहावी, बारावी, आयटीआय, पदवी असणे आवश्यक आहे. कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत नसावा. योजनेचे फायदे : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची संधी मिळते. ज्यामुळे त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होतात. इंटर्नशिपद्वारे इंटर्न्सना सरकारच्या कामकाजाची सखोल माहिती मिळते. भविष्यात सरकारी क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त नेटवर्कींग साधता येते. इंटर्नशिप पूर्ण केल्यावर काही प्रमाणात मानधन देखील दिले जाते. त्यामुळे आर्थिक दृष्टीने ही योजना अधिक आकर्षक ठरते. इंटर्नशिपचे माध्यम विद्यार्थ्यांना शासकीय योजनांमध्ये नवीन आणि ताज्या विचारांची माहिती देते. यामुळे त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. असा करा अर्ज ... या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी. त्यानंतर विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना देशाच्या तरुणांना एक सुवर्णसंधी देऊन त्यांना शासनाच्या कार्यप्रणालीशी जोडते. त्यामुळे त्यांचा भविष्यकाळ उज्वल होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन भारताच्या आगामी पिढीला अधिक सक्षम बनविण्याचे उदि्दष्ट आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी दि. 31 मार्च, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. *******

सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी • 20 मार्च रोजी भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली आणि शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे गुरुवार(दि. 20) रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोली, वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि.हिंगोली, शिऊर साखर कारखाना वाकोडी, स्वतंत्र मायक्रो फायनान्स वाशिम, सिध्दनाथ नागनाथ ॲग्रोवेच फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.हिंगोली, फूजन मायक्रो फायनान्स प्रा.लि.हिंगोली, भास्कर सर्व्हीस ॲन्ड सप्लायर प्रा.लि.पुणे, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. हिंगोली, भारत फायनान्स लि.हिंगोली, सॉपिओ आनेलिटिक्स नोडल एजन्सी हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली इत्यादी कंपनी सहभागी होणार आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल या रोजगार मेळाव्यात लावण्यात येणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 400 पेक्षा अधिक रिक्त पदे कौशल्य विकास विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in, www.rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पदाची खात्री करुन खासगी क्षेत्रात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत आणि स्वतः मूळ कागदपत्रांसह दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे अवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. *****

13 March, 2025

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सर्वत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश • आरोग्य विभाग सतर्क : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा हिंगोली (जिमाका), दि. 13 : सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्षात रूग्णांना सेवा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. उष्माघात होण्याची कारणे : शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो. लक्षणे : मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इत्यादी लक्षणे आहेत. अति जोखमीच्या व्यक्ती बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार अशा व्यक्तींना अति जोखीम आहे. प्रतिबंधात्मक उपाय : वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. उपचार : रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा, अशी माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे यांनी दिली आहे. ***

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे मार्च, 2025 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 17 मार्च) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******

जिल्ह्यात दूध उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज - अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी आढावा बैठकीत केले. जिल्ह्यातील दूध संकलनाचे प्रमाण व वितरण वाढविण्यासाठी तसेच दुधातील भेसळ थांबविण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी शिवाजी गिनगिने, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पुणे, सहायक आयुक्त डॉ. कल्यापूरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री. चौधरी यांची उपस्थिती होती. दूध उत्पादनात वाढ करणे, उत्पादित होणारे सर्व दूध संकलीत करणे. ज्या गावात दूध संकलन केंद्र नाहीत त्या गावामध्ये दूध संकलन केंद्र सुरु करावेत. दूध संकलन केंद्रामुळे त्या गावात उत्पादित होणाऱ्या दुधास बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करुन त्यांना योजनेतून दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या गायी-म्हशीचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना जंतनाशकाचे महत्व, चाऱ्याचे नियोजन व विनियोजनाबाबत मार्गदर्शन करावे. जनावरांना खुराक देण्याविषयी मार्गदर्शन करावे. दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी दुग्ध विकास विभाग व बँकेच्या समन्वयातून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करावे. तसेच बचत गटांच्या महिलांनाही दुधाळ जनावराचे वाटप करावेत. दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक गावात शिबिरे घेऊन प्रबोधन करावेत. दुधाळ जनावरांचे खाद्य, दूध उत्पादन आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. माचेवाड यांनी यावेळी दिल्या. तसेच दूध, पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागांनी समन्वयाने काम करावे. आगामी येणाऱ्या रमजान ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर दुधाची आवश्यकता भासते. याप्रसंगी दुधात कुठलीही भेसळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. दूध भेसळ थांबविण्यासाठी पथक नेमून धाडी टाकावेत. दुधाचे नमुने घ्यावेत. जे नमुने भेसळयुक्त आढळून येतील त्यांच्यावर कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. या बैठकीस खाजगी दूध संकलन केंद्र हेरिटेज डेअरी, साई डेअरी, विजापुरी दूध डेअरी यांचे संचालक, जिल्ह्यातील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. बुचाले, डॉ. निश्चल, डॉ. राठोड, डॉ. मुस्तरे, डॉ. ऊके तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ.इंगोले, डॉ. पारवेकर, डॉ. देवकर, डॉ.नरवाडे व डॉ. नाईक उपस्थित होते. ******

12 March, 2025

पाणलोट व वृक्ष लागवड चळवळ काळाची गरज- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका), दि.12: जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट उपचार पध्दतीचा अवलंब करून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवला पाहिजे. यासाठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राची कामे करावीत. तसेच गावांच्या लोकसंख्येनुसार ग्रामस्थांनी प्रती व्यक्ती दोन झाडे लावावीत. पाणलोट विकास चळवळ व वृक्ष लावगड करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोटविषयक कामाचे महत्त्व विशद करून या कामात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती व प्रसिध्दी करण्यासाठी मंगळवारी सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे केंद्र शासनामार्फत वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी श्री. गोयल बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम म्हणाले की, भविष्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ हा शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय मिळू शकणार नाही. यासाठी गावातील 100 टक्के शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावीत, असे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांनी जमिनीची माती तपासणी करून घ्यावी. यामुळे जमिनीला कोणत्या घटकाची आवश्यकता आहे याची माहिती मिळू शकेल व त्यानुसार पीक पध्दतीमध्ये बदल करता येईल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेनगावचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी केले. या वॉटरशेड यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वॉटरशेड सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गावामध्ये पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या जलयोध्दा व धारिणीताई यांनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणत्राचे वितरण करण्यात आले . ग्रामस्थांना पाणलोट विषय कामाची माहिती मिळण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेल्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पाणलोटविषयक चित्रफित दाखविण्यात आली तसेच ग्रामस्थांना मृद व जलसंवर्धनाची कामे करावी, यासाठी मृद व जलसंवर्धनाची शपथ दिली. ‘पाणी की पाठशाला’मध्ये पाणलोटावर शाहीर धम्मानंद इंगोले यांनी विविध गिते व पथनाट्य सादर केले. शाळेतील मुलांनी पाणलोटावर पथनाट्याचे सादरीकरणे केले. तसेच गावातील महिलांनी पारंपारिक वेषभूषेत गिताच्या माध्यमातून लोककलेचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाच्या औचित्याने पाणलोट क्षेत्राशी संबंधित काही नवीन कामाचे भूमीपूजन व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मुरलीधर राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला महंत नेहरू महाराज (पोहरादेवी तीर्थक्षेत्र), सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच विलास ससेदे, उपविभागीय कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, गट विकास अधिकारी सेनगाव, जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, जलसंधारण अधिकारी विठ्ठल काळबांडे, जलसंधारण अधिकारी श्री. बारहत्ते कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पाणलोट विकास पथक सदस्य व कृषि विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ******