08 February, 2019

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा संस्थांना विनानिविदा कामे देण्यात यावे - श्री एच.पी.तुम्मोड


सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा संस्थांना विनानिविदा कामे देण्यात यावे
                                                        - श्री एच.पी.तुम्मोड

        हिंगोली, दि.8: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा संस्थांना रू.3 लाखापर्यंत मर्यादेतील कामे विना निविदा देण्यात यावे असे आवाहन जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.
        सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा संस्थांना काम वाटप समितीची बैठक दि. 29 जानेवारी संपन्न झाली. या बैठकीत जि.प. (बांधकाम विभाग) यांच्याकडून प्राप्त झालेले जिल्हा परिषद इमारत व परिसराची दैनंदिन स्वच्छता करणे बाबतचे काम संत भगवान बाबा सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेला देण्यात आले. बैठकीत काम वाटप समितीच्या सदस्य सचिव श्रीमती रेणुका तम्मलवार सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडे उपलब्ध असलेली मोठ्या प्रमाणातील रू. 3 लाखापेक्षा कमी किंमतीची कामे विविध सेवा संस्थेला उपलब्ध करून देता येतात. यामध्ये स्वच्छता, साफसफाई, सुशोभिकरण, रंगरंगोटी, दुरूस्ती, सुरक्षा रक्षक, धोबीकाम, माळीकाम, प्रचार प्रसिध्दी व जनजागृती विषयक काम,इ. प्रकारची कामे जिल्ह्यातील विविध शासकीय/निमशासकीय/महामंडळे इ. कार्यालयाकडे उपलब्ध असल्यास ती त्वरीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांना कळवावीत. जेणेकरून सहकारी सेवा सोसायट्या/लोक सेवा केंद्रांना आर्थिकदृष्ट्या बळकट करून स्वयंरोजगारास वाव असलेल्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या बेरोजगारांच्या सहकारी सोसायट्या/लोक सेवा केंद्रे यांच्या मार्फत ग्रामीण तसेच शहरी जनतेला दैनंदिन गरजेच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश सफल होईल. तरी कार्यालयांनी रू. 3 लाखापर्यंतची कामे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाकडे कळवावीत असे आवाहन ही अध्यक्ष काम वाटप समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. हिंगोली व श्रीमती रेणुका तम्मलवार सदस्य सचिव काम वाटप समिती तथा सहायक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

****



माविममार्फत कापडी पिशव्या उत्पादनाचे युनिट सुरु होणार


माविममार्फत कापडी पिशव्या उत्पादनाचे युनिट सुरु होणार

हिंगोली, दि.8: प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मुबलक प्रमाणावर कापड पिशव्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळने युनिट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून 20 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, या युनिटद्वारे रोज बचत गटातील शिवणकाम करणाऱ्या महिलांकडून 1200 कापडी पिशव्याचे उत्पादन होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी लागू झाल्याने कापडी पिशव्याची मागणी वाढलेली आहे. परभणी व नांदेड जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्यांना मोठी मागणी आहे.
या महिलांचे शिवण कौशल्य पाहून खाजगी दुकानदारही त्यांच्याकडून आता शाळेचे गणवेशष शिवून घेत आहेत. कापडी पिशव्याची असलेली गरज आणि खरेदीसाठीचा वाव याचा विचार करता प्रत्येक जिल्ह्यात अशा पध्दतीने पिशव्या शिवण्याचे युनिट उभारण्याची योजना महामंडळाने आखली आहे. त्यानुसार आता हे 30 महिलांचे युनिट तयार होणार असून, यातील 20 महिला आप-आपल्या घरी बसून पिशव्याची शिवण काम करतील. ज्या महिला मशीन खरेदीची करु शकत नाही, अशा महिलां उत्पादन केंद्रामध्ये जाऊन शिलाईचे काम करणार आहे.
यानंतर या शिवलेल्या पिशव्यांवर एकत्रित छपाई करण्यात येईल. या कामातून प्रत्येक महिलेला दिवसाकाठी किमान 300 रुपये मिळणार असून, दरमहा एका महिलेस सुमारे रु. 7,500 प्रतिमहा उत्पन्न मिळू शकणार असून हिंगोली येथे एक युनिट सुरु करण्यासाठी एकूण 30 महिलांच्या एक युनिट साठी जिल्हा नियोजन समितीकडून 20 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. शहरी भागातील बचत गटातील महिलांना आर्थिक पाठबळाअभावी स्वत:चा व्यवसाय सुरु करता येत नाही त्या सर्वांपर्यंत काम पोहचत नाही . म्हणूनच या युनिटच्या माध्यमातून काही महिलांना रोज काम देण्यात येईल.
000


07 February, 2019

अटल महाआरोग्य शिबीराच्या पूर्वतपासणीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद 46 हजाराहून अधिक रुग्णांनी करुन घेतली पूर्वतपासणी




अटल महाआरोग्य शिबीराच्या पूर्वतपासणीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

·   46 हजाराहून अधिक रुग्णांनी करुन घेतली पूर्वतपासणी

हिंगोली,दि.7: येणाऱ्या 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी हिंगोली रेल्वे स्थानकाजवळील जागेची निवड करण्यात आली आहे. या महाआरोग्य शिबिरासाठी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची 3 फेब्रूवारी पासून पूर्व तपासणी सुरु झाली असून यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हिंगोली तालूक्यातील 10 हजार तर औंढा 7 हजार, कळमनुरी 12 हजार, वसमत 9 हजार आणि सेनगाव तालूक्यात 8 हजार असे एकुण 46 हजारहून अधिक रुग्णांनी पूर्व तपासणी करुन घेतली आहे. सदर पूर्व तपासणी ही 9 फेब्रूवारी पर्यंत सुरु आहे. या महाआरोग्य शिबीरात  सुमारे एक ते सव्वा लाखाहून अधिक रुग्ण उपचाराकरीता सहभागी होण्याची शक्यता असून या दृष्टीने सर्व आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.
या महाआरोग्य शिबीरात डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. यात ॲन्जिओप्लास्टी, बायपास, सांधेरोपणापासून अन्य सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील नामांकित अशा सुमारे 500 डॉक्टर्स या महाआरोग्य शिबीरात उपस्थित राहून उपचार करणार आहेत. रुग्णांसाठी शिबिरात अत्याधुनिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. महाअरोग्य शिबीर आयोजनाची पुर्वतयारीचे काम गतीने चालू असून यासाठी आवश्यक मंडप उभारणीसह व रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याचे कामे सुरु झाली आहेत. आवश्यक औषधी तसेच यंत्र सामुग्रीची देखील व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या रुग्णांसाठी विनामुल्य जेवण, पिण्याचे पाणी आणि वाहतूकीची देखील व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी 9 फेब्रूवारीपर्यंत पूर्वतपासणी करुन घेणे आवश्यक असून, जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अटल महाआरोग्य शिबीर समन्वय समिती मार्फत करण्यात आले आहे.

****


06 February, 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणेचा स्त्रोत-मुख्यमंत्री







छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक
प्रेरणेचा स्त्रोत-मुख्यमंत्री

        हिंगोली,दि.6: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            हिंगोली नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण  मुख्यमंत्री फडणवीस  यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या अनावरण समारंभास पालकमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते, आमदार विक्रम काळे, आमदार संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील,  माजी खासदार सुभाष वानखेडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण  आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
            शिवरायांच्या भव्य स्मारकाचे अनावरण करण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, सर्वसामान्यांना अत्याचाराच्या जोखडातून दूर सारुन स्वराज्याची  संकल्पना रुढ केली. अशा महापुरुषांचे स्मारक आपल्या सर्वांना सदोदीत प्रेरणा देत राहिल. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व महान होते. त्यांनी छोट्या छोट्या विखुरलेल्या लोकांना एकत्र आणून स्वराज्यासाठी लढा दिला. स्वराज्यातून सुराज्याकडे वाटचाल करीत परिवर्तन घडवले. समाजातील जातीभेद, भेदभाव दूर करुन सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला. त्या शिवरायांच्या राज्याची संकल्पना त्यांच्याच अशिर्वादाने राज्य सरकार काम करीत आहे. शेवटच्या माणसापर्यंत काम करीत वेगवेगळे निर्णय घेत हे सरकार वाटचाल करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हिंगोली येथील शिवाजी महाराजांचा हा पुतळा अत्यंत तेजस्वी असल्याचे सांगत आयोजकांचे अभिनंदन केले.
            प्रारंभी पुतळ्याचे रिमोटद्वारे अनावरण करुन मुख्यमंत्री व मान्यवरांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रास्ताविकात नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी माहिती दिली. हिंगोली नगर पालिकेने शासनाच्या मान्यतेने पुतळ्यासाठी विश्रामगृहा शेजारची  6200 चौ. फु. जागा 41 लाख 26 हजार रुपयांना खरेदी केली व त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य  अश्वारुढ पुतळा उभारला. यासाठी व सुशोभिकरणाच्या कामांसाठी विविध योजनेतून 76 लाख 19 हजार रुपये खर्च करण्यात आला. या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
            यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वागत केले.
            या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार , यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

05 February, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली जिल्हा दौरा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली दि. 5 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार दि. 6 फेब्रुवारी, 2019 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवार दि. 6 फेब्रुवारी, 2019 रोजी हिंगोली येथील पोलीस कवायत मैदान येथे हेलिकॉप्टरने दुपारी 01.45 वाजता आगमन होईल. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहतील. (स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह परिसर, हिंगोली), दुपारी 02.00 वाजता शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. (स्थळ : रामलिला मैदान, हिंगोली) आणि दुपारी 3.00 वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील.
*****

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू




जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.5: जिल्ह्यात  दिनांक 4 ते 7 फेब्रुवारी 2019 पर्यंत म्हैसासूर मर्दीनी देवी यात्रा मौ.मोरवड येथे चालणार आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोस्टे अंतर्गत मौ. जांब  येथे कान्होबा यात्रा दिनांक 9 ते 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत चालणार आहे व पोस्टे हट्टा अंतर्गत बाराशिव येथे दिनांक 15 ते 25 फेब्रुवारी 2019 पर्यंत हनुमान यात्रा उत्सव चालणार आहे. तसेच दिनांक 15 फेब्रुवारी रोजी  संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे व दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत आहे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी वॅलेंटाईन डे आहे. वॅलेंटाईनला  सर्वच धार्मिक संघटनांचा विरोध आहे. तसेच मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांचा दिनांक 6 फेबुवारी रोजी संभाव्य हिंगोली जिल्हा दौरा आहे.

            विविध  संघटनेतर्फे त्याचे मागणी संबंधाने मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 20 फेब्रुवारी, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****




राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा जिल्हा दौरा


 राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.5: राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पाशा पटेल हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 5 फेब्रुवारी, 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता हिंगोली येथे मा. मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमास उपस्थित व सोईनुसार लातूर कडे प्रयाण.
****