24 March, 2021

ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी औंढा येथे तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 


                                      

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत असलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी औढा (ना.) येथे आज तालुकानिहाय ग्राम बाल संरक्षण समिती  प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले.

हे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृह औंढा (ना.) येथे आज आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नैना पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. मुंढे,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बालसंरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य ) जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पठाण, रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट, बाह्य क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत इत्यादींनी या प्रशिक्षण कार्यशाळेत बालसंरक्षणाच्या दृष्टीने असलेले विविध कायदे व गाव बाल संरक्षण समितीच्या जबाबदाऱ्या तसेच बालकांच्या सुरक्षिततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कामकाज या बाबत माहिती दिली तर बालकांचे हक्क व अधिकार या विषयी समुपदेशक सचिन पठाडे यांनी माहिती दिली. बाल विवाह बद्दलची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे यांनी दिली. बाल लैंगिक या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाण यांनी  दिली. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज विषयक चित्रफितीचे प्रदर्शन समुपदेशक सचिन पठाडे यांनी केले. सदर प्रशिक्षणाचे आयोजन श्री. व्ही.जी.शिंदे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

*****

 

 

‘मार्जिन मनी योजनेसाठी’ प्रस्ताव सादर करावेत

                                      

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरे करीत असताना यामध्ये केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना  एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्यशासनामार्फत देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी खालील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

अटी व शर्ती : या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांने आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजूरी पत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र असावे .

हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी तसेच इच्छुक पात्र व्यक्तींनी  दि. 27 मार्च, 2021 पर्यंत विहित नमुन्यात तीन प्रतीत प्रस्ताव  सहाय्यक आयुक्, समाज कल्याण हिंगोली या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

******

23 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 109 रुग्ण ; तर 90 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  489 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णांचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 109 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 28 व्यक्ती, कळमनुरी परिसर 11 व्यक्ती, वसमत परिसर 19 व्यक्ती, औंढा परिसर 05 व्यक्ती व सेनगाव परिसर 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 29 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती  व कळमनुरी परिसर 10 व्यक्ती असे एकूण 109 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 90 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 45 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 05 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 50 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 5 हजार 498 रुग्ण झाले असून, त्यापैकी  4 हजार 934 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 489 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 75 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांचे आदेश

 


                                      

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या तपासणीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पत्राद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या तपासणीच्या अनुष्ंगाने कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.

या पथकामध्ये महसूल व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच या पथकात पथक प्रमुख (तपासणी अधिकारी) म्हणून महसूल, आरोग्य, पंचायत समिती विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तर सदस्य म्हणून महसूल, आरोग्य, पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे. 

स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रातील सूचनानुसार जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या तपासणीबाबत कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल अपर जिल्हाधिकारी यांना सादर करावे, असे आदेश दिले आहेत.

 

******

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.    

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसीलदार  राजेंद्र जोशी तसेच विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.  

00000

 

शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा 31 मार्च रोजी रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश

 



हिंगोली, (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमाक 409 अन्वये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हिंगोली, बसमत, कळमनुरी , सेनगाव व औंढा नागनाथ येथील शाखा दि. 31 मार्च, 2021 रोजी उशीरापर्यंत म्हणजे रात्रीचे 11.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

****

हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रे कंटेनमेंट झोन घोषित

 


 

        हिंगोली, दि.23 :  हिंगोली शहरातील तलाब कट्टा, रिसाला बाजार, पेन्शनपुरा, अष्टविनायक नगर, मारवाडी गल्ली, गवळी पुरा, मंगळवारा, पोळा मारोती, नाईक नगर, एन.टी.सी., कासारवाडा, सरस्वती नगर, सराफ बाजार, आजम कॉलनी, भोईपुरा, गाडीपूरा, न.प.कॉनली, जिजामाता नगर, आर.के.कॉलनी, तोफखाना, तिरुपती नगर, बियानी नगर,  हिलटॉप कॉलनी, सावरकर नगर, बांगर नगर, अंबिका नगर, रेल्वे स्टेशन, श्रीनगर, नेहरु नगर, तिरुपती नगर, महाविर नगर तसेच हिंगोली ग्रामीण क्षेत्रातील डिग्रस क-हाळे, नर्सी ना., उमरा, गंगानगर, भांडेगाव, ईसापूर रमणा, माळहिवरा, अकोला बायपास, सिरसम, सावरखेडा, अंतुले नगर, बोरी शिकारी, सुराणा नगर, डिग्रस वाणी येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा  नगर परिषद / ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

 

****