23 December, 2021




 कोविड लसीकरण व पाणी वाचवा या विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती

           

हिंगोली (जिमाका), दि. 23 : - नेहरु युवा केंद्र तथा युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने जिल्ह्यातील अनेक खेड्यात ठिकठिकाणी जाऊन पथनाट्याद्वारे लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी व लसीकरण केल्यास आपण कसे सुरक्षित राहू शकतो, तसेच आपल्या देशाला कोरोनाच्या महामारीतून बाहेर कसे काढावे आणि प्रत्येकाला लसीकरण घेणे जरुरी आहे यासह आता पण कोरोनाचा धोका टळला नाही म्हणून घरातून बाहेर निघताना मास्क लावणे, दोन व्यक्तीमधील अंतर बाळगणे, सॅनिटायझरचा वापर करणे या विषयावर जनजागृती करण्यात आली .

तसेच पाणी वाचवा या विषयावर पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी कसे वापरले पाहिजे, पाण्याची बचत कशी केली पाहिजे या विषयी व पाणी अडवा, पाणी जिरवा, मागेल त्याला शेततळे अशा विविध विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली .   

ही मोहिम जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी नेहरु युवा क्रीडा मंडळ खरबी, पंचशील बहुउद्देशीय सांस्कृतिक कला मंडळ, नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयक नामदेव फरकंडे, संदीप शिंदे, सिंधू केंद्रे व गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, आरोगय सेविका, नागरिक उपस्थित होते.

 

****

 

हिंगोली जिल्ह्यात पंधरा दिवसात पाच बालविवाह रोखण्यात यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली आणि चाईल्ड लाईन (1098) यांच्या समनव्याने जिल्ह्यात पंधरा दिवसात पाच बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

सध्या देशात मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे व मुलाच्या लग्नाचे वय हे 21 वर्ष आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बाल वयातच मुलीचे लग्न लाऊन देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण देखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. यामुळे मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक व ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात 15 दिवसात कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे 01, हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथे 01, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे 02 आणि वसमत तालुक्यातील पिंपळा (चौरे) येथे 01 असे एकूण 05 बालविवाह रोखण्यात आले आहेत.

संबंधित बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व ग्रावसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी आणि संबंधित गावातील ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य , अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबियाचे समुपदेशन करुन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.     

सध्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार करता बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु मुलींच्या हक्कांचे संरक्षण करुन त्यांना बालविवाहास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. जर आपल्या गावात अथवा इतर कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असल्यास तात्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री  क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन बालविवाह प्रतिबंध समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. तर बालविवाह रोखण्यासाठी समाजातील कोणताही नागरिक तसेच स्वत: बालक किंवा बालिका व स्वयंसेवी संस्थेने बालविवाह होत असल्यास किंवा बालकांसोबत गैरकृत्य होत असल्यास चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.

*****




 सराफ हॉस्पिटल व माऊली डायग्नॉस्टीक सेंटरच्या सोनोग्राफी केंद्राला

पीसीपीएनडीच्या बैठकीत मान्यता

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : - आज झालेल्या पीसीपीएनडीटीच्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत हिंगोली येथील सराफ हॉस्पिटल आणि वसमत येथील माऊली डायग्नॉस्टीक सेंटरच्या सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देण्यात आली. तर कळमनुरी येथील उर्मिला सोनोग्राफी सेंटर व हिंगोली येथील लक्ष्मी हॉस्पिटल या दोन नवीन सोनोग्राफी केंद्रांना मान्यता देण्यासाठी त्याची पथकाद्वारे तपासणी करुन मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिले.

येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली पीसीपीएनडीटीच्या जिल्हा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. मंगेश टेहरे, बालरोग तज्ञ डॉ. नागेश बांगर, डॉ. आनंद मेने, सामाजिक कार्यकर्ते अलका रणवीर, भास्कर घोडके, विधी समुपदेशक ॲड. सुकेशिनी ढवळे यांची उपस्थिती होती. 

या बैठकीत सोनोग्राफी केंद्राची सद्यस्थिती, सील करण्यात आलेली सोनोग्राफी केंद्रे, विनंतीवरुन सील करण्यात आलेली सोनोग्राफी केंद्रे, कार्यरत सोनोग्राफी केंद्रे, इतर सोनोग्राफी केंद्रे, गर्भपात केंद्राची सद्यस्थिती, न्यायालयीन प्रकरणे याचा आढावा घेण्यात आला.

*****

 

ज्येठ नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांचया समस्यांचे निवारण करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण , हिगोली यांच्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

            जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी  सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाशी संपर्क साधून आपले लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

22 December, 2021

 

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेशासाठी

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 : - महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 पासून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवारा, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इत्यादी सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर (केवळ धनगर जातीतील विद्यार्थ्यांसाठी) समाजाचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा रुपये एक लाख इतकी असावी. सन 2021-22 या वर्षात विद्यार्थी इयत्ता पहिली किंवा दुसरीमध्ये प्रवेशास पात्र असावा.

हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा जि. हिंगोली या संस्थेच्या कै. एल.एस. नाईक इंग्लीश स्कूल, कोळसा, जि. हिंगोली  आणि देवर्षी ग्रामीण व शहरी विकास प्रतिष्ठान हिंगोली या संस्थेच्या केंब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स , कळमनुरी ता. कळमनुरी  जि. हिंगोली या दोन शाळेची निवड करण्यात आली आहे.

कै. एल.एस. नाईक इंग्लीश स्कूल, कोळसा, जि. हिंगोली या शाळेमध्ये शासनाकडून 100 विद्यार्थी संख्या मंजूर केली आहे. या शाळेत प्रवेशासाठी श्रीमती अभिलाषा बेंगाळ (मो. 9834855210) यांच्याशी संपर्क साधावा. तर केंब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स , कळमनुरी ता. कळमनुरी  जि. हिंगोली या शाळेमध्ये शासनाकडून 50 विद्यार्थी संख्या मंजूर केली आहे. या शाळेत प्रवेशासाठी डॉ.संतोष कल्याणकर (मो. 9422192362, 9922118894) यांच्याशी संपर्क साधावा.

या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, पहिला मजला, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली या कार्यालयात दि. 25 डिसेंबर, 2021 ते 03 जानेवारी, 2022 पर्यंत  सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन शिवानंद मिनगीरे,सहायक आयुक्त,समाज कल्याण,हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

*****

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 

लाळखुरकत  रोगप्रतिबंधक लसीकरण  शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी

कार्यालयनिहाय जबाबदारी निश्चित

 

हिंगोली, दि. 22 (जिमाका) : देशात लाळखुरकत रोगामुळे खुप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. देश पातळीवर एकाच वेळी नियमित फेरीचे आयोजन करुन सन 2015 पर्यंत या  रोगावर नियंत्रण मिळविणे व सन 2030 अखेर रोगाचे समुळ उच्चाटन करण्याचे लक्ष केंद्र शासनाने निर्धारित केले आहे. लाळखुरकुत नियंत्रण  कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शंभर टक्के गाय वर्गीय व म्हैस वर्गीय जनावरांना  6 महिन्यातील  अंतराने वर्षातून 2 वेळा सर्व शेतकऱ्यांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने त्यांच्या  पशुधनास  टॅगिंग करुन लसीकरण करुन घेणे बंधनकारक  केले आहे व तीची  नोंद ऑनलाईन आयएनएपीएच प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. लसीकरण कामकाजासाठी  सक्षम प्राधिकृत  अधिकारी, कर्मचारी  यांना त्यांचे प्रत्यक्ष  कर्तव्य बजावत  असताना अडथळा आणल्यास अधिनियमातील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या  दोषी व्यक्तीस एक हजार रुपयापर्यंतची दंडात्मक कारवाई करण्याची  किंवा दंड न भरल्यास एक महिन्यापर्यंत कारावास  अशाप्रकारे  शिक्षेची तरतूद केली आहे.

या योजनेची राज्यात प्रभावीपणे संनियंत्रण करण्यासाठी विविध संनियंत्रण समित्यांचे गठन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय  संनियंत्रण  समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत व तहसीलदार हे तालुकास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत.

 लाळखुरकत  रोगप्रतिबंधक लसीकरण  फेरीसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ग्रामपंचायतीने गावातील रहिवाशांचे  आरोग्य  ज्यायोगे  प्रवर्धन होऊ शकेल असे कोणतेही काम किंवा उपाययोजना गावात पार पाडण्याची तरतूद  करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली जिल्ह्यात या योजनेच्या  अनुषंगाने शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे  कार्यालयनिहाय  जबाबदारी निश्चित केली आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, हिंगोली यांच्यावर लसीकरण करण्यासाठी खाजगी पशुवैद्यक, डेअरी डिप्लोमा धारक यांना आदेश देणे,  लसीकरण व टॅगिंगसाठी साधन  सामुग्री पुरवठा करणे, योजनेच्या आर्थिक व तांत्रिक हिशोब ठेवणे या बाबीची जबाबदारी सोपविली आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांना लसीकरण व टॅगिंगसाठी साधन  सामुग्री पुरवठा करणे, लसीकरण व आयएनएपीएच पोर्टलवर ऑनलाईन नोंदीचा प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेणे, लोकप्रतिनिधींची मदत घेऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे ही जबाबदारी सोपविली आहे.

तहसीलदार (सर्व) तथा अध्यक्ष  तालुकास्तरीय संनियंत्रण समिती यांच्याकडे तालुक्यातील लसीकरण मोहिम अंमलबजावणी बाबत आढावा घेऊन येणाऱ्या सर्व अडचणींवर  योग्य ते मार्गदर्शन करुन प्रसंगी आवश्यक ते आदेश इतर विभागांना  निर्गमित करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

गट विकास अधिकारी पंचायत समिती (सर्व) यांच्याकडे या योजनेची माहिती व महत्व  लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत  यांना अवगत करुन देणे, पशुसंवर्धन विभागास  आवश्यकतेनुसार ऑनलाईन नोंदणी  करण्यासाठी इतर विभागातील  कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय (सर्व), पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सर्व यांच्याकडे लसीकरण करण्यासाठी आवश्यक  असणाऱ्या सर्व बाबी पशुवैद्यकीय दवाखान्यात  उपलब्ध  करुन देणे, झालेल्या  प्रगतीक कामाचा अहवाल  प्रत्येक सोमवारी ऑनलाईन व ऑफलाईन  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात  कळविणे, योजनेसंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना, पत्र सर्वांना अवगत करुन देणे, आयएनएपीएच पोर्टलवर  ऑनलाईन नोंदणी  करण्यासाठी प्रशिक्षण देणे, तालुक्यातील  शंभर टक्के  लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्व विभागाशी समन्वय ठेऊन काम पूर्ण  करुन घेण्याची जबाबदारी सोपविली आहे.   

पशुधन  विकास अधिकारी (गट अ व ब), सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन  पर्यवेक्षक (सर्व) यांच्याकडे खाजगी व्यक्ती, खाजगी पशुवैद्यक, पशु मित्र, दुध संस्था, पोलीस पाटील, सरपंच यांची मदत घेऊन सर्व पात्र पशुधनास टॅगिंग व लसीकरण करणे, आयएनएपीएच पोर्टलवर ऑनलाईन नोंदी करण्यासाठी आवश्यकतेनुसार  ग्रामपंचायत  कार्यालयाशी संपर्क करुन सर्व नोंदणी  पूर्ण करुन घेणे, लसीकरण करण्यास अडथळा  आणणाऱ्या  पशुपालकांची यादी ग्रामपंचायतीस सादर करणे, निवड  केलेल्या गावातील लसीकरण करण्यापूर्वी  व लसीकरणानंतर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नमुने गोळा करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

सरपंच/ ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक पंचायत समिती (सर्व) यांच्याकडे या योजनेबाबत गावात प्रचार व प्रसिध्दी करणे, आयएनएपीएच पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्याकडून  करुन घेणे, आवश्यकता असल्यास पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करुन पोलीस संरक्षणात लसीकरण कार्य करुन घेणे, शंभर टक्के टॅगिंग व लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पोलीस पाटील (सर्व) यांच्यावर प्राण्यांमधील  संक्रामक  व सांसर्गिक  रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 दिनांक 20 मार्च, 2009 नुसार  अंमलबजावणी करणे, पोलीस कर्मचारी यांच्या सहकाऱ्याने गावात शंभर टक्के  टॅगिंग व लसीकरण  करुन घेणे, लसीकरण  करणाऱ्यास अडथळा आणणाऱ्या पशुपालकावर शासकीय कामात अडथळा आणणाऱ्याविरुध्द  गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

सचिव कृषि  उत्पन्न बाजार समिती (सर्व) यांच्यावर गाय, बैल व म्हैस या पशुधनास कानात टॅग असल्याखेरीज खरेदी विक्री न करणे ही जबाबदारी सोपविली आहे.

पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन (सर्व) यांच्यावर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार टॅगिंग व लसीकरण  करण्यास पोलीस संरक्षण देणे, टॅगिंग व लसीकरण करुन घेणे, लसीकरण करणाऱ्यास अडथळा आणणाऱ्या पशुपालकावर शासकीय कामात अडथळा आणणे व पोलीस पाटील यांना गुन्हा  दाखल करण्यास  सहकार्य करणे, लसीकरण फेरी पूर्ण झाल्यावर गाय, बैल व म्हैस या पशुधनाची कानात टॅग असल्याखेरीज  वाहतुक  करताना आढळल्यास हे चोरी केलेली आहे असे समजून  त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

मा. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम योजनेच्या सचिव सचिवस्तरीय  दैनंदिन आढावा घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील  लाळखुरकत रोग नियंत्रण करण्यासाठी गावनिहाय नियोजन करुन पुढील 30 ते 45 दिवसात  लसीकरण पूर्ण करण्यात यावे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणीही हयगय  करु नये, असे आदेश जिल्हास्तरीय  संनियंत्रण  समिती राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत.

****