26 July, 2023

 

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

माजी सैनिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 




 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केले.   

यावेळी  बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, कारगील युध्दात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कारगील दिवसा साजरा करण्यात येत असल्याचे सांगून माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे सांगितले. तसेच येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य शिबीर घेऊन जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश आग्रेकर, सहायक नियोजन अधिकारी  सुधाकर जाधव, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, माजी सैनिक बसरुध्दीन शेख, बी.बी.चव्हाण, दत्तराव लेकुळे, अरविंद कुलकर्णी, केशव भडंगे, जी.एम. पाटील, आनंदराव पडघन, रमेश इंगोले, केशव जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुरेश भालेराव, कल्याण संघटक उत्तमराम लेकुळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली. तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*****

25 July, 2023

 

हिंगोली तालुक्यात कोतवालांच्या 19 पदासाठी भरती

7 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  जिल्हाधिकारी यांच्या 19 जुलै, 2023 च्या पत्रानुसार हिंगोली तालुक्यातील कोतवाल पदाच्या रिक्त 19 जागांची पदभरती राबविण्यात येत आहे. या पदासाठी 7 ऑगस्ट, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत हिंगोली तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे.

            कोतवाल पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र, अपात्र उमेदवारांची यादी दि. 10 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून दि. 24 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. लेखी परीक्षा दि. 27 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. प्राथमिक उत्तरतालिका दि. 29 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रसिध्द केलेल्या उत्तर तालिकेवर दि. 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आक्षेप, हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. अंतिम उत्तरतालिका दि. 1 सप्टेंबर, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. लेखी परिक्षेतील गुणानुसार गुणवत्ता यादी दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येऊन दि. 8 सप्टेंबर, 2023 रोजी अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन नवनाथ वगवाड, तहसीलदार तथा सदस्य सचिव, तालुका निवड समिती, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

*****

 

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 17.70 मिमी पावसाची नोंद

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 17.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 351.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 44.16  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 25 जुलै, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली 25.60 (419.70) मि.मी., कळमनुरी 22.90 (384.50) मि.मी., वसमत 14.40 (323.90) मि.मी., औंढा नागनाथ 18.20 (348.10) मि.मी, सेनगांव 6.80 (273.80) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 351.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

24 July, 2023

 

शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत नॅशनल करिअर सर्व्हिस वेबपोर्टलची

माहिती व रोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत शासन आपल्या दारी या मोहिमेंतर्गत नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) वेबपोर्टलची माहिती व रोजगाराच्या संधी या विषयावर दि. 28 जुलै, 2023 रोजी दुपारी 11.30 ते 12.30 वाजता या वेळेत https://meet.google.com/chp-cfeh-ovc या लिंकवर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये नवनाथ टोनपे, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://meet.google.com/chp-cfeh-ovc या ऑनलाईन लिंकवर (meeting URL)  क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

****

 

मधमाशा पालन योजनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान

लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा सरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत.

1. वैयक्तिक मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

2. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

3. केंद्र चालक संस्था : योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नांवे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली संस्था असावी.

वरील योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्स राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी  प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-11, नांदेड रोड, हिंगोली मो.नं. 9860537538, ई-मेल पत्ता- dviohingoli@rediffmail.com आणि संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5 महाबळेश्वर, जि. सातारा पिन-412806 (दूरध्वनी – 02168-260264) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

 

वसमत तालुक्यात कोतवाल पदासाठी भरती

25 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्हाधिकारी यांच्या 19 जुलै, 2023 च्या पत्रानुसार वसमत तालुक्यातील कोतवाल पदाच्या रिक्त जागांची पदभरती राबविण्यात येत आहे. या पदासाठी 25 जुलै. 2023 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत वसमत तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव, तालुका निवड समिती  तथा तहसीलदार, वसमत यांनी केले आहे.

            कोतवाल पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र, अपात्र उमेदवारांची यादी दि. 10 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून दि. 24 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. लेखी परीक्षा दि. 27 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. प्राथमिक उत्तरतालिका दि. 29 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रसिध्द केलेल्या उत्तर तालिकेवर दि. 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आक्षेप, हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. अंतिम उत्तरतालिका दि. 1 सप्टेंबर, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. लेखी परिक्षेतील गुणानुसार गुणवत्ता यादी दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येऊन दि. 8 सप्टेंबर, 2023 रोजी अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, वसमत येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार तथा सदस्य सचिव, तालुका निवड समिती, वसमत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

 

*****

 

क्षेत्रीय अधिकारी तथा तंत्र सहाय्यक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हास्तरावर कृषि व अन्न प्रक्रिया संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी एक क्षेत्रीय अधिकारी (एफएलओ) तथा तंत्र सहाय्यक (कृषि प्रक्रिया) या पदासाठी कंत्राटी तत्वावर 11 महिन्याच्या कालावधीसाठी मनुष्यबळ सेवा पुरवठादार संस्थेमार्फत उपलब्ध करुन घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे पात्र उमेदवारांकडून विहित अटी शर्तीनुसार दि. 28 जुलै, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्यासाठी  बीएसस्सी (ॲग्री/हॉर्टीकलचर), बी-टेक (फूड/ॲग्री) ही पदवी असणे अनिवार्य आहे.  एमबीए (अनुक्रमे प्राधान्य फायनांस/प्रोडेक्शन मॅनेजर/बिझनेस), एम-टेक (फूड), एमएससी (ॲग्री/हॉर्टी/फूड) या पदव्यूत्तर उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. एमएससीआयटी अनिवार्य असून संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक आहे. इंग्रजी, मराठी टंकलेखन आवश्यक आहे. किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. यासाठी एकत्रित मासिक मानधन 28,800/- रुपये अनुज्ञेय आहे. पात्र उमेदवारांनी दि. 28 जुलै, 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****