01 July, 2020

जिल्ह्यातील केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी

जिल्ह्यातील केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी

 

हिंगोली,दि.1 : कोरोनाच्या प्रादूर्भाव वाढू नये याकरीता सुरक्षेच्या कारणास्तव ताळेबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील केश कर्तनालय बंद ठेवण्यात आले होते. परंतू आता जिल्ह्यातील केश कर्तनालय दुकानांना पुढील अटी व शर्तींच्या आधारे दररोज सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.

केश कर्तनालय दुकानाची सुरुवात करतांना संबंधीतांनी संपूर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करणे आवश्यक आहे. केश कर्तनालय सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी केवळ केस कापण्यास (कटींग) परवानगी देण्यात आली आहे. परंतू त्वचेशी संबंधित सेवांना सध्या परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती दुकानात स्पष्टपणे दर्शविणे आवश्यक असणार आहे. तसेच केश कर्तनालय दूकानात सेवा देतांना कर्मचाऱ्यांनी हातमोजे, ॲप्रॉन आणि मास्क इत्यादी संरक्षक साधने वापरणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ, निर्जंतुक करुनच दुकानातील संपूर्ण क्षेत्र आणि जमीन, पृष्ठभाग, फरशी प्रत्येक दोन तासांनी स्वच्छ व निर्जंतुक करणे आवश्यक आहे. टॉवेल्स, नॅपकीन्स यांचा वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावता येईल अशा प्रकारच्या टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करण्यात यावा, अथवा ग्राहकांना स्वत: टॉवेल्स, नॅपकीन्स स्वत:सोबत घेऊन येण्याबाबत कळवावे. तसेच वापरुन झाल्यावर विल्हेवाट न लावता येण्याजोग्या उपकरणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सेवा देणारा आणि सेवा घेणारा सोडून इतर व्यक्ती मध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच मास्क, रुमाल नाका तोंडाला झाकून ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे. दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅडवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक राहील. ग्राहकांना केवळ अपॉईंमेंट घेऊनच येण्यास कळवावे. तसेच ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही यांची सलून मालकांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी वरीलप्रमाणे घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावण्यात यावी.

या अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकरी, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

 

 


No comments: