27 July, 2020

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाचे पालन करुन बकरी ईद साजरी करावी - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

        हिंगोली, दि.27: सद्यस्थितीत कोरोनाचा (कोवीड-19) प्रादूर्भाव अधिक प्रमाणात पसरत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच काही जणांचा या संसर्गामुळे मृत्यू देखील झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897  दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच शासनाने दि. 17 एप्रिल,2020 रोजीच्या आदेशान्वये एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सूचना देखील निर्गमीत केल्या आहेत.

            सद्या कोरोना संसर्गामुळे वाढत असलेल्या रुग्णाची संख्या लक्षात घेता मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण जवळ आला असून मुस्लीम बांधव दरवर्षी हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात. बकरी ईदच्या निमित्ताने मूस्लीम बांधव हे मोठ्या संख्येने मशीदमध्ये एकत्र येवून सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. परंतू सद्य परिस्थितीचा विचार करता एका ठिकाणी अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होवून मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकरीता कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मूस्लीम बांधवाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हिताचे नाही. त्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. या सूचनाचे पालन करुन आपण आपले व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याचे रक्षण करत बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा.

            कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बकरी ईदची नमाज मशीद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. तसेच कुर्बानीसाठी मुस्लीम बांधवांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता प्रतिबंधीत क्षेत्रातील मुस्लीम बांधवांनी आपल्या नावांने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करुन घ्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र येवू नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नमाज पठण करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रमासाठी एकत्रित येवू नये.  तसेच महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नये, घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखावे तसेच वेळोवेळी हात धुणे आदी नियमाचे पालन बकरी ईद सणाच्या दिवशी कटाक्षाने करावे. सर्व मूस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नमाज पठण आदी धार्मीक कार्य पार पाडावे. कोरोना (कोवीड-19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे.

            करोनाची साथ झपाट्याने वाढत असून जिल्हा प्रशासनाकडून ती रोखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न आपण करीत आहोत. मागील 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण नियमाचे पालन करुन मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने नियमांचे पालन करून साजरी व्हावी', अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.

****


No comments: