30 July, 2020

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ

 

हिंगोली,दि.30: अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या उज्वला योजना राबवू इच्छिणाऱ्या व उज्वला योजनेचा लाभ घेण्याकरीता संस्थाना दि. 25 जुलै, 2020 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदर प्रस्ताव मागविण्याच्या दिनांकात मुदतवाढ करण्यात आली असून प्रस्ताव मागविण्याची अंतिम दिनांक 24 ऑगस्ट, 2020 करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे.

त्यासाठी पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान महिलाकरीता सुविधा उपलब्ध असावी. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयातील किमान पाच वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी. संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान वीस लाख रुपयांचा असावा. संस्थेच्या नांवे किमान 15 लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे. योजना राबविण्याकरिता इच्छूक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी सदर संस्थेचे कायमस्वरुपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालय त्याच जिल्ह्यात असणे आवश्यक आहे, संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा. तसेच योजना राबविण्याचे निकष दि. 27 मार्च, 2018 मधील शासन निर्णयानुसार असावेत. फक्त प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविणाऱ्या संस्थांना योजनेअंतर्गत मान्यता देण्यात येणार नाही. उज्वला योजनेच्या प्रस्तावासोबत द्यावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र-ब) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली कार्यालयास दि. 24 ऑगस्ट, 2020 पूर्वी संपर्क साधून कागदपत्रांसाठीची प्रपत्र-ब ची यादी प्राप्त करुन द्यावी. तसेच परिपूर्ण प्रस्ताव दि. 24 ऑगस्ट, 2020 पर्यंत सादर करावेत.

****


No comments: