27 July, 2020

जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


        हिंगोली, दि.27:  राज्यात कोविड-19 सारखी आपत्तीची परिस्थिती असतांना देखील पणन विभागामार्फत राज्यात विक्रमी सुमारे 219.49 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दूप्पटीने कापूस खरेदी झाली असल्याची पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

           राज्यात मागील 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य 11, 776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,0289.47 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा देखील करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषीत केले आहे.

            हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या आपत्तीजन्य कालावधीत काही दिवस खरेदी बंद होती. परंतु नंतर खरेदी सुरू करण्यात आली व आगाऊ नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यात आला.  जिल्ह्यात यावर्षी 1 हजार 804 शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी केली होती. अद्यापपर्यंत जिल्ह्यात 17 हजार 960 शेतकरी बांधवांचा 4 लाख 20 हजार 852.55 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये कापूस पणन महासंघामार्फत 2 हजार 713 शेतकऱ्यांची 56 हजार 370 क्विटंल तर सी.सी.आय. मार्फत 9 हजार 826 शेतकऱ्यांची 2 लाख 67 हजार 870.45 क्विंटल, खाजगी बाजार मार्फत 2 हजार 367 शेतकऱ्यांची 49 हजार 742.10 क्विंटल तर बाजार समितीतील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यामार्फत 3 हजार 055 शेतकऱ्यांची 46 हजार 870 क्विंटल अशी एकुण 17 हजार 960 शेतकरी बांधवांचा 4 लाख 20 हजार 852.55 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याची माहिती उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.

****


No comments: