27 July, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मार्गदर्शक नियमावली


·      बँक खाते धारकांना ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.27: जिल्ह्यातील बँकामध्ये विविध शासकीय योजनाचे तसेच वैयक्तिक कारणांसाठी रक्कम काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूीवर व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांची पैसे काढण्याची (Cash Withdrawal) सुविधा बंद करण्याबाबत दि. 22 जूलै, 2020 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु काही बँक व्यवस्थापक आणि APMC, मोठे उद्योग व मोठे व्यापारी वर्गामार्फत आलेल्या निवेदनानुसार बँकामध्ये संस्थात्मक पैसे काढण्याला (Cash Withdrawal) मुभा देण्यात आली होती.

            परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन-धन खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून महिलांच्या खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीची रक्कम जमा झाली आहे. तसेच पीक विमा आणि पीक कर्ज काढण्यासाठी किंवा इतर अर्थिक व्यवहारासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिक बँक आणि एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी करत असून याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.            पैसे काढण्याची (Cash Withdrawal) सुविधा बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे नियोजन केले असून यापूढे या नियमाचे पालन करुनच नागरिकांना बँकेतून पैसे काढता येणार आहे.

            ज्या क्षेत्रात तसेच गावांमध्ये बँकांचे Business Correspondent (BC) तसेच Customer Service Center (CSC) केंद्र आहेत अशा ठिकाणी Business Correspondent (BC) तसेच Customer Service Center (CSC) च्या माध्यमातून रक्कमेचे वाटप करण्यात यावे. या दरम्यान ग्राहक सेवा केंद्रात सामाजिक अंतर राखुन मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. ज्या क्षेत्रात किंवा गावात BC/CSC मार्फत रोख वाटप करणे शक्य नाही अशा ठिकाणी ग्रामसेवकामार्फत पुढीलप्रमाणे नियोजनाने रोख वितरण करण्यात येणार आहे. बँकांना जी गावे दत्तक देण्यात आली आहेत असे गावनिहाय रक्कम वाटप करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे. तसेच सदरचे वेळापत्रक पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती तसेच संबंधीत ग्रामपंचायतीना कळवावे. ग्रामसेवक यांनी गावामध्ये ज्या नागरिकांना रोख रक्कम काढावयाची आहे अशा नागरिकांना पैसे काढण्याची (Withdrawal) स्लीप देऊन स्लीप भरून घ्यावी. ग्रामसेवक यांनी वेळापत्रकानुसार रक्कम वाटप करावयाच्या एक दिवस अगोदर Withdrawal स्लीप संबंधीत बँकांमध्ये जमा करावी. वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या गावात जातांना सोबत पोलीस विभागाचे पथक घेऊन जावे. रक्कम वाटप करतेवेळी पथकाने संबंधीत नागरिकाची ओळख पटण्यासाठी त्याचे आवश्यक कागदपत्रे/पुरावे याची तपासणी करून रक्कम वाटप करावी. निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गावात जाण्याची तसेच रक्कम वाटप करते वेळी पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. रक्कम वाटप करते वेळी संबंधितांनी शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा वापर व हातांची स्वच्छता करावी. यानुसार सदरील आदेशाची अंमलबजावणी दि. 27 जूलै, 2020 रोजीपासून करण्यात यावी. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकांचे व्यवस्थापक, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, Business Correspondent (BC) / Customer Service Center (CSC) केंद्रांचे समन्वयक तसेच व्यवस्थापक यांची असणार आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यावर नियंत्रण ठेवणार आहेत.

            खातेधारकांनी जिल्हा प्रशासनाने वरील प्रमाणे ठरवुन दिलेल्या अंतराच्या निमयावलीचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजीक अंतर) पालन करावे. परंतू शक्यतो जिल्ह्यातील नागरिकांनी बँकेत किंवा एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्रातून खात्यावरील पैसे काढण्याऐवजी ऑनलाईन किंवा ए.टी.एम.द्वारे आपले अर्थ‍िक व्यवहार करावे असे अवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

            सदर आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल आणि संदर्भीय कायद्यानुसार संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 


1 comment:

BoSs said...

Transparency must