03 July, 2020

बाहेरील जिल्ह्यातून ये-जा करणा-या अधिकारी-कर्मचाऱ्याकरीता प्रतिबंधात्मक आदेश जारी

हिंगोली,दि.3: राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार (कोव्हिड-19) नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याने त्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005, साथरोग प्रतिबंध कायदा-1897 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता-1973 कलम 144 लागू असल्याने शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तसेच साथरोग कायदा लागू असल्याने नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील काही अधिकारी-कर्मचारी हे बाहेर जिल्ह्यातून दैनंदिन हिंगोली येथे कामावर ये-जा करत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रुचेश जयवंशी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच खाजगी कार्यालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारी जे बाहेर जिल्ह्यातून दैनंदिन हिंगोली येथे कामावर येतात अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंध करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या संबंधीतावर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना नियम-2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही देखील प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

****


No comments: