22 December, 2016

मुद्रा बँक योजनेतंर्गत विद्यार्थी-विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज तात्काळ मंजूर करावे

*जिल्ह्यातील  1265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख कर्ज वितरण*
                                                                                        ---जिल्हाधिकारी अनिल भंडारी
            हिंगोली, दि.22: केंद्र शासनाने सुरु केलेल्या मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या भविष्याचा विचार संवेदनशीलरित्या करुन सर्व बँक व्यवस्थापकांनी तात्काळ शैक्षणिक कर्ज मंजूर करण्याच्या सूचना मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.
             येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार रामराव वडकुते, जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईमोद्दील कुरेशी, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश मदान आणि जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.    
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु-30,                                           किशोर -20 व तरुण-10 याप्रमाणे गटनिहाय मुद्रा बँक योजनातंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून, काही बँकानी यामध्ये चांगले काम केल आहे. इतर बँकांनी देखील त्यांना ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देखील मुद्रा बँक योजनेतंर्गत समावेश करण्यात आला असून त्यांनी देखील कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करावे.
            तसेच मुद्रा बँक अंतर्गत बँकांनी लाभार्थ्यांचे नामंजूर केलेल्या अर्जाबाबतची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक यांच्यामार्फत समितीकडे सादर करावीत. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देवून नवीन उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयन्त करावा अशा सूचना ही श्री. भंडारी यांनी यावेळी दिल्या.
         जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा बँक योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील  शिशु , किशोर आणि तरुण या गटातील एकूण 1 हजार 265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख रुपय कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश मदान यांनी यावेळी दिली.
            अलाहाबाद बँक -24 लाभार्थ्यांना 34 लाख  , बँक ऑफ बडोदा -37 लाभार्थ्यांना 35 लाख , बँक ऑफ इंडिया -93 लाभार्थ्यांना 48 लाख , बँक ऑफ महाराष्ट्र - 76 लाभार्थ्यांना 83 लाख,  कॅनडा बँक 24 लाभार्थ्यांना 48 लाख,   सेंट्रल बँक ऑफ इंडिया -10 लाभार्थ्यांना 5 लाख, देना बँक -02 लाभार्थ्यांना 1 लाख, आयडीबीआय बँक - 18 लाभार्थ्यांना 60 लाख, ओरियटंल बँक ऑफ कॉमर्स-03 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल बँक-01 लाभार्थ्यांना 05 लाख,   स्टेट बँक ऑफ हैद्राबाद-481 लाभार्थ्यांना 966 लाख,  स्टेट बँक ऑफ इंडिया-162 लाभार्थ्यांना 246 लाख,   सिंडिकेट बँक -57 लाभार्थ्यांना 72 लाख, युको बँक - 09 लाभार्थ्यांना 10 लाख,  युनियन बँक ऑफ इंडिया -70 लाभार्थ्यांना 56 लाख, ॲक्सिस बँक -09 लाभार्थ्यांना 2 लाख,  महाराष्ट्र ग्रामीण बँक- 188 लाभार्थ्यांना 296 लाख, असे एकूण 1265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख 29 हजार रुपये मुद्रा बँक योजनेतंर्गत या बँकांना कर्ज वितरण केले आहे.    
            यावेळी बैठकीस समितीचे शासकीय अशासकीय सदस्यांसह बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती .
***
सामाजिक न्याय विभगातील बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांनी नवोउपक्रम म्हणुन बाहयस्त्रोत कर्मचारी यांची कार्यशाळा 21 डिसेंबर, 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथील सभागृहामध्ये संपन्न झाली.
सदर कार्यशाळेस सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. सी. के. कुलाल, विशेष अधिकारी, (शा.नि.शा.) श्रीमती जी. डी. गुठ्ठे, समाज कल्याण निरीक्षक टी. डी. भराड व विभागीय व्यवस्थापक श्री. कदम, बोराडे व चंदनशिवे तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासीशाळेतील येथील बाह्यस्त्रोतद्वारे नियुक्त बी. व्हि. जी. आणि क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी  उपस्थित होते.  
या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच वस्तीगृहात निर्माण होणाऱ्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांचेकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच सदर कर्मचाऱ्यांना व्यक्तीमत्व विकास व कौशल्य विकास या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

*****
राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 22 :- राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार - 2016 करिता, 30 वर्षाखालील ज्या उद्योजकांनी आपला उद्योग उत्कृष्टपणे चालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेण्यासाठी, उद्योजकांनी पुरस्कार मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज www.neas.in पोर्टलवर दि. 25डिसेंबर, 2016 पूर्वी करण्यात यावे, याकरिता पात्र व इच्छूक उद्योजकांकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                                                                    *****  

21 December, 2016

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी व्हावे
                                                                                           --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली,दि.21:- मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपुजन व भूमिपुजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. 24 डिसेंबर 2016 रोजी होणार आहे. या जलपुजन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.  
            जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, राज्य शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला होता. त्याअनुषंगाने मुंबई येथील राजभवना लगतच्या अरबी समुद्रातील सुमारे 15.96 हेक्टर बेटावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या जलपुजन आणि भूमिपुजन सोहळ्यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरील पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
            या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे होणार आहे. या कामात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी, सुरक्षा विषयक व्यवस्था, आदीचा याबत समावेश असणार आहे. येत्या तीन वर्षात स्मारक पुर्ण करण्याचे शासनाचे नियोजन असून ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचे जीवनमुल्य प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्र, पर्यटकांसाठी पर्यटनस्थळचा देखील समावेश स्मारकात असणार आहे.  
            महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असणार आहे. या स्मारकमुळे महाराष्ट्राची तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब नागरिकांना अनुभवता येणार आहे.


****
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत
 प्रतिनियुक्तीवर अर्ज करण्याचे आवाहन
            हिंगोली,दि.21: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दि. 17 ऑक्टोबर, 2016 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, हिंगोली (DIECPD)  पुर्वीचे DIET येथे निवड समितीव्दारे प्रतिनियुक्तीने जागा  भरल्या जाणार आहेत.
            तरी इच्छूक शिक्षक (प्राथमिक व माध्यमिक) , केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी (गट-क) यांच्याकडून www.tinyurl.com/applydiecpd या लिंक वर अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी दि. 30 डिसेंबर, 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, हिंगोलीचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक
            हिंगोली,दि.21: भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात दि. 29 डिसेंबर, 2016 रोजी दु. 12.00 वाजता जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित केलेली असून सदर बैठकीमध्ये सन 2016-17 च्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेचा महाविद्यालयनिहाय भरलेल्या अर्जांचा तसेच सन 2014-15 व 2015-16 च्या प्रलंबित प्रकरणाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असलेली संपुर्ण माहिती देण्यात येऊन महाविद्यालयनिहाय असलेल्या अडचणी लेखी स्वरूपात स्विकारण्यात येणार आहेत. आणि सन 2015-16 पर्यंत मंजूर झालेल्या शिष्यवृत्ती व शिक्षण फी व परीक्षा फी या योजनांच्या या कार्यालयामध्ये असलेल्या अर्जांच्या मुळ प्रती महाविद्यालयास हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
            तरी दि. 29 डिसेंबर, 2016 रोजी दु. 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे बैठकीसाठी ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शिष्यवृत्ती संदर्भात काम पहाणारे कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

20 December, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात कॅशलेस पेमेंट विषयक कार्यशाळा संपन्न
            हिंगोली,दि.20: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात व्यापारी आणि महाऑनलाईन केंद्र संचालक ‘कॅशलेस पेमेंट’ विषयक आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बँक कार्ड, युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएसच्या माध्यमातून कशाप्रकारे आर्थिक व्यवहार करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात नागरिक, व्यापारी आणि इतर सेवा देणाऱ्यांच्या मोबाईल मधील एप्लीकेशन द्वारे कशाप्रकारे आर्थिक देवाण-घेवाण करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना कॅशलेस पेमेंट विषयक सक्षम करून दोन यशस्वीरित्या आर्थिक व्यवहार केल्यास दहा रुपये आणि व्यापाऱ्यांना कॅशलेस पेमेंट बाबतीत सक्षम केल्यास महाऑनलाईन केंद्र संचालकांना शंभर रुपये प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी मागर्दर्शन करताना म्हणाले की ‘कॅशलेस पेमेंट’ चा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे. दैनंदिन व्यवहारात कॅशलेस पेमेंटचा वापरासाठी बँकांनी मोबाईल ॲप तयार केले असून, या ॲपच्या साह्याने कॅशलेस व्यवहार करण्यास मदत होणार आहे. सर्व महाऑनलाईन धारकांनी आपल्या क्षेत्रातील नागरिक आणि व्यापारी यांचे बँक खाते हे आधारशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे. तसेच बँक कार्ड , युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएस या सुविधांद्वारे कॅशलेस पेमेंटद्वारे दैनंदिन व्यवहार करता येईल याची माहिती दिली.
            कार्यशाळेत महाऑनलाईनचे जिल्हा समन्वयक सागर भूतडा यांनी कॅशलेस पेमेंट विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाऑनलाईन केंद्र संचालकांना 121 पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान तसेच जिल्ह्यातील व्यापारी आणि महाऑनलाईन केंद्र संचालक यांची उपस्थिती  होती.

*****