20 December, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात कॅशलेस पेमेंट विषयक कार्यशाळा संपन्न
            हिंगोली,दि.20: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात व्यापारी आणि महाऑनलाईन केंद्र संचालक ‘कॅशलेस पेमेंट’ विषयक आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत बँक कार्ड, युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएसच्या माध्यमातून कशाप्रकारे आर्थिक व्यवहार करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात नागरिक, व्यापारी आणि इतर सेवा देणाऱ्यांच्या मोबाईल मधील एप्लीकेशन द्वारे कशाप्रकारे आर्थिक देवाण-घेवाण करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना कॅशलेस पेमेंट विषयक सक्षम करून दोन यशस्वीरित्या आर्थिक व्यवहार केल्यास दहा रुपये आणि व्यापाऱ्यांना कॅशलेस पेमेंट बाबतीत सक्षम केल्यास महाऑनलाईन केंद्र संचालकांना शंभर रुपये प्रोत्साहन पर भत्ता देण्यात येणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी मागर्दर्शन करताना म्हणाले की ‘कॅशलेस पेमेंट’ चा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे. दैनंदिन व्यवहारात कॅशलेस पेमेंटचा वापरासाठी बँकांनी मोबाईल ॲप तयार केले असून, या ॲपच्या साह्याने कॅशलेस व्यवहार करण्यास मदत होणार आहे. सर्व महाऑनलाईन धारकांनी आपल्या क्षेत्रातील नागरिक आणि व्यापारी यांचे बँक खाते हे आधारशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे. तसेच बँक कार्ड , युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएस या सुविधांद्वारे कॅशलेस पेमेंटद्वारे दैनंदिन व्यवहार करता येईल याची माहिती दिली.
            कार्यशाळेत महाऑनलाईनचे जिल्हा समन्वयक सागर भूतडा यांनी कॅशलेस पेमेंट विषयक सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाऑनलाईन केंद्र संचालकांना 121 पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान तसेच जिल्ह्यातील व्यापारी आणि महाऑनलाईन केंद्र संचालक यांची उपस्थिती  होती.

*****

No comments: